esakal | नागपुरात कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न
sakal

बोलून बातमी शोधा

Tukaram Mundhe pattern of corona control in Nagpur

ते कोणाचं ऐकत नाहीत, ते स्वतः ची मनमानी करतात, लोकप्रतिनिधींची अवहेलना करतात यासह ढीगभर आरोप झेलत महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत तुकाराम मुंढे यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्याचे वेगळेपण दाखवून दिले आहे. जगातील बहुतांश देश, देशातील बहुतांश राज्य आज कोरोनासोबत झगडत आहेत. कोरोनाला आटोक्यात आणायचे कसे? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. या सर्व प्रश्नांना नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या कर्तुत्वाने, इच्छाशक्ती आणि कल्पकतेने महाराष्ट्राला कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न दिला आहे. 

नागपुरात कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : ते कोणाचं ऐकत नाहीत, ते स्वतः ची मनमानी करतात, लोकप्रतिनिधींची अवहेलना करतात यासह ढीगभर आरोप झेलत महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत तुकाराम मुंढे यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्याचे वेगळेपण दाखवून दिले आहे. जगातील बहुतांश देश, देशातील बहुतांश राज्य आज कोरोनासोबत झगडत आहेत. कोरोनाला आटोक्यात आणायचे कसे? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. या सर्व प्रश्नांना नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या कर्तुत्वाने, इच्छाशक्ती आणि कल्पकतेने महाराष्ट्राला कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न दिला आहे. 
जालना, सोलापूर, पुणे, नवी मुंबई यासह राज्याच्या विविध जिल्ह्यात तुकाराम मुंढे यांची कारकीर्द प्रचंड गाजली आहे. राज्याची उपराजधानी व जवळपास 27 लाख लोकसंख्येचे शहर असलेल्या नागपूरमधील कोरोना नियंत्रणात ठेवण्यात नागपूर महापालिकेला आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मुळे यश मिळाले आहे. एवढ्या मोठ्या शहरात सध्या अवघे 396 कोरोनाबाधित रुग्ण असून फक्त सात जणांचा मृत्यू झाला आहे. शंभर रुग्ण उपचार घेत असून उर्वरित कोरोनामुक्त झाले आहेत.  कोरोनामुळे मृत पावण्याचे प्रामाण अत्यल्प आहे. मुंबई परिसरातील महापालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव, सोलापूर या शहरातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. अशा स्थितीत नागपुरमधील कोरोना नियंत्रणात राहिल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर राज्य सरकारने कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी व संबंधित महापालिकेच्या आयुक्त यांना सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित केले. सक्षम प्राधिकृत अधिकारी या शब्दाचा अर्थ काय असतो? याचा प्रत्यय तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्राला दाखवून दिला आहे. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्याने मिळालेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करणारे तुकाराम मुंढे हे राज्यातील पहिले महापालिका आयुक्त ठरले आहेत. उर्वरित ठिकाणी कोरोनाची स्थिती जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला व्यक्ती घरी थांबत नाही, तो परिसरातच फिरतो त्यामुळे आयुक्त मुंढे यांनी नागपूर शहरात होम क्वारंटाइन ही संकल्पनाच रद्द केली. संशयित व्यक्तींना थेट इन्स्टिट्यूशन क्वारंटाइन केले जाते. याशिवाय मास इन्स्टिट्यूशन क्वारंटाइन ही देखील महत्त्वाची संकल्पना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपुरात राबविल्याने तेथील कोरोना नियंत्रणात राहिला आहे. जीवनावश्यक वस्तूसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी देखिल आयुक्त मुंढे यांनी चांगली पध्दत राबविली. शासनाचा एकही रुपया खर्च न करता आतापर्यंत १५ लाख फुड पॅकेटचे वाटप एनजीओच्या माध्यमातून झाले आहे हे विशेष. प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्तींच्या फुप्फुसातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जात आहे. नागपूरसाठी स्वतंत्र मोबाईल ॲपही तयार करण्यात आले आहे.

सतरंजीपुरा, मोमीनपुरा हॉटस्पॉट
राज्यातील ज्या महापालिका शहरात कोरोनाबाधित रुग्ण आहेत तो परिसर झोपडपट्टी व दाट लोकसंख्येचा परिसर असल्याचे समोर आले आहे. नागपुरातील सतरंजीपुरा व मोमिनपुरा हे देखील कोरोनाचे हॉट स्पॉट होते. 96 टक्के केसेस या भागात आढळल्या आहेत. या भागातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी मोमीन पुऱ्यातील अडीच हजार जणांना तर सतरंजी पुऱ्यातील आठराशे जणाना  इन्स्टिट्यूशन क्वारंटाइन करण्यात आले. मास इन्स्टिट्यूट क्वारंटाइनचा प्रभावी परिणाम दिसला. तबलिकी, गरोदर महिलांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण वेळीच आढळल्याने नागपुरमधील कोरोना रोखण्यात यश आले असल्याची माहिती आयुक्त मुंढे यांनी दिली.

सर्व्हेमधून मिळाली महत्त्वाची माहिती
नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी आढळा. त्यानंतर संपूर्ण शहराचा हाय रिस्क पॉप्युलेशन सर्व्हे करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक, रक्तदाब, उच्च रक्तदाब, शुगर, टीबी यासह इतर आजार असलेल्या व्यक्तींची माहिती, त्यांचे संपर्क क्रमांक संकलित करण्यात आले. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळला त्या भागात सलग चौथा दिवस महापालिकेच्या वतीने सर्व्हे करण्यात आला. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींना वेळीच इन्स्टिट्यूशन क्वारनटाइन  करण्यात आले.

ट्रेसिंगचा सुटला तिढा
शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोना आला कसा? त्या व्यक्तीच्या संपर्कात कोण- कोण आले? याचा शोध कोणी घ्यायचा? महापालिका, आरोग्य विभाग की पोलिस यंत्रणा? हा प्रश्न राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे होत नसल्याचे समोर आले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया पूर्ण केली जाते. महापालिकेच्या मनुष्यबलातून जवळपास सात प्रकारच्या विविध टीम तयार केल्या आहेत. प्रत्येक प्रभागासाठी रॅपिड ऍक्शन टीम, रुग्णांसाठी अन्न, पाणी, वाहतूक करणारी टिम,  मेडिसिन टीम, प्रतिबंधितक्षेत्र निश्चित करणारी टीम तयार असल्याने रुग्ण सापडल्यानंतर अवघ्या काही तासात प्रत्येक टीमच्या माध्यमातून सर्व यंत्रणा व्यवस्थितपणे काम करते.

मुंढे यांच्या विरोधात दहा याचिका
नागपूर शहरातील खासगी हॉस्पिटल, दारू विक्रीचा, महापालिका आयुक्तांना हे अधिकार आहेत का? यासह इतर मुद्यावर आधारित तब्बल दहा याचिका आयुक्त मुंढे यांच्या विरोधात दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकाना तोंड देत आयुक्त मुंडे यांनी नागपूर शहरातील कोरोना नियंत्रित ठेवला आहे. कोरोना बाधित रुग्णाची माहिती लपविली म्हणून आतापर्यंत पाच एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. फक्त महापालिकेची यंत्रणा वापरून कोरोना नियंत्रित करु शकतो हे आयुक्त मुंढे यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.

महापालिकेचे स्वतः चे रुग्णालय
नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग फक्त घनकचरा या पुरताच मर्यादित होता. कोव्हिडच्या संकटात नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे रुपडेच बदलले आहे. महापालिकेचे पाच हॉस्पिटल सुसज्ज झाले असून याठिकाणी कोव्हिडच्या उपचारासाठी ऑक्सिजन असलेले साडेचारशे बेड तयार करण्यात आले आहेत. 50 आयसीयु बेडचाही त्यामध्ये समावेश आहे. मे अखेरपर्यंत हे पाचही हॉस्पिटल कार्यान्वित होतील, अशी माहिती आयुक्त मुंडे यांनी दिली. या शिवाय पाच हजार बेडचे कोव्हिड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. 

सर्वांप्रमाणे माझ्यासाठी देखील कोरोनाचे संकट हे नवीन होते.  संपूर्ण शहराचा केलेला सर्व्हे,  वेळेवर निदान, उपचार, आयसोलेशन यामुळे नागपूर शहरातील कोरोना नियंत्रित राहिला. कोव्हिड वॉर रूमच्या माध्यमातूनही आम्हाला मोठी मदत झाली. सकाळी आठ ते अकरा या वेळेत मी रोज नागपूर शहरातील विविध भागात स्वतः फिरतो विविध उपाययोजना स्वतः पाहतो. त्यानंतर अकरा वाजता कार्यालयात जातो. 
- तुकाराम मुंढे, आयुक्त नागपूर महापालिका