esakal | कोरोनामुळे दोघा खेळाडूबंधूंचे निधन! आट्यापाट्याच्या मैदानावरील मैत्री आली धावून
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

आट्यापाट्याच्या मैदानावरील मैत्री आली धावून !

sakal_logo
By
शांतिलाल काशीद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घरातील कर्ते पुरुष व महिला गेल्याने मुलं पोरकी होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अशीच दुःखद घटना पंढरपूर तालुक्‍यातील उंबरे (पागे) येथील हुबाले कुटुंबात घडली.

मळेगाव (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत घरातील कर्ते पुरुष व महिला गेल्याने मुलं पोरकी होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अशीच दुःखद घटना पंढरपूर (Pandharpur) तालुक्‍यातील उंबरे (पागे) येथील हुबाले कुटुंबात घडली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आट्यापाट्याचं मैदान गाजवलेले लोकप्रिय खेळाडू सुभाष हुबाले व त्यांचे बंधू मोहन हुबाले या दोन सख्ख्या भावांचे निधन झाले. त्यामुळे हुबाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे आपल्या मित्रांचे निधन झाले आहे, ही बातमी बार्शी तालुक्‍यातील मळेगाव येथील श्री शिवाजी तरुण कला व क्रीडा मंडळाचे संस्थापक व मुंबई येथे रेल्वेत सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेले बाळासाहेब माळी, रमेश डुबे, राजकुमार दळवे, श्रीमंत गडसिंग, बंडू पाडुळे, सचिन कानडे या माजी खेळाडूंना समजले. खेळाडूंनी सामजिक भान जपत शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या उंबरे (पागे) येथे जाऊन अकरा हजार रुपयाची मदत सुपूर्द करीत हुबाले कुटुंबाला आर्थिक व मानसिक आधार दिला. (Two family members died of corona, and their families were helped by friends)

हेही वाचा: पोलिसांच्या सतर्कतेमुळे फुटली खुनाला वाचा ! चितेवरील मृतदेह काढून पोस्टमॉर्टेम

1985 साली आट्यापाट्याच्या मैदानावर झालेली मैत्री सुभाष हुबाले यांच्या मृत्यूनंतरही तेवढीच घट्ट व अतूट आहे, हे मळेगावच्या माजी खेळाडूंनी दाखवून दिले आहे. ही मदत होताच समाजातून अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. गणेश आट्यापाट्या मंडळामार्फत सुभाष हुबाले यांच्या मुलीच्या नावे दरवर्षी दहा हजार रुपयांची मदत जमा केली जाणार आहे. बापावाचून पोरक्‍या झालेल्या लेकीचा शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च उचलण्याची जबाबदारी प्रहारचे पंढरपूर तालुका अध्यक्ष नानासाहेब इंगळे यांनी घेतली आहे.

हेही वाचा: "पीएसआय'ने स्वीकारली साडेसात लाखांची लाच! "लाचलुचपत'ने पकडले रंगेहाथ

खो-खो, कबड्डी, आट्यापाट्या, मलखांब हे मराठी मातीतील खेळ म्हणून लोकप्रिय आहेत. सुभाष हुबाले यांनी आट्यापाट्या खेळात वैयक्तिक चापल्ल्याच्या आधारे विविध जिल्ह्यांत लोकप्रियता मिळवली. प्रतिस्पर्धी संघाच्या मनात आपल्या खेळाद्वारे धडकी निर्माण करून संघाला एकहाती विजय मिळवून देण्याची किमया त्यांनी अनेकवेळा केली. "लाल चड्डी, खतरा धोका' हा डायलॉगच सुभाष यांच्यावरती तयार झाला. सुभाष हुबाले यांनी आट्यापाट्याच्या खेळात अत्यंत चपळतेने कोंडी फोडत प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवला. मात्र, कोरोनाच्या कोंडीत सापडलेल्या सुभाष हुबाले यांना कोरोनाची कोंडी फोडून कोरोनावर विजय मिळवता आला नाही. त्यांच्या जाण्याने आट्यापाट्या खेळातील आजी- माजी खेळाडू, क्रीडा रसिक यांच्यामधून हळहळ व्यक्त होत आहे.

loading image