esakal | बार्शीच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऍक्‍सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू? प्रशासनाने फेटाळले आरोप

बोलून बातमी शोधा

Cancer Hospital
बार्शीच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू? प्रशासनाने फेटाळले आरोप
sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : शहरातील नर्गिस दत्त मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल येथील कोव्हिड सेंटरमधील दोन महिलांचा ऑक्‍सिजनअभावी मृत्यू झाला असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाइकांनी प्रशासनाविरोधात केली आहे. तर दोन्ही रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती, ऑक्‍सिजन पुरवठा योग्यरीतीने, व्यवस्थितपणे सुरू होता, ऑक्‍सिजनमुळे रुग्णांचा मृत्यू झाला नाही, असा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.

अश्रूबाई लक्ष्मण सांगळे (वय 65, रा. चुंब, ता. बार्शी), जनाबाई मधुकर बंडगर (रा. गणेशनगर, सोलापूर) असे मृत झालेल्या महिलांची नावे आहेत. मृतांच्या नातेवाइकांनी, ऑक्‍सिजन संपला होता त्यामुळेच रुग्ण दगावले असून, नातेवाइकांना पूर्वसूचना का दिली नाही, असा दावा प्रशासनाविरोधात केला आहे.

चुंब येथील सांगळे यांची मुलगी भागाबाई ढाकणे यांनी सांगितले की, आई अश्रूबाई हीस श्वासाचा त्रास जाणवल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथून त्यांनी 17 एप्रिल रोजी कॅन्सर हॉस्पिटल येथे दाखल करण्यासाठी पाठवले. दोनच दिवसांपूर्वी आई निगेटिव्ह आली होती. जेवण व्यवस्थित जात होते. चांगले बोलत होती. काहीही त्रास होत नाही, असे सांगत होती. पाचवे इंजेक्‍शन दिल्याने ऑक्‍सिजनवर ठेवण्यात आले होते. रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून रूममधील ऑक्‍सिजनचा सिलिंडर कर्मचाऱ्यांनी उभा करून ठेवला होता. आम्ही चार-पाच जण सुशिक्षित आहोत, ऑक्‍सिजन कमी मिळतो आहे हे लक्षात आले होते. साडेतीन वाजता तर पूर्ण ऑक्‍सिजन संपला होता, असे लक्षात आले. उशिरा प्रशासनाने धावपळ करून ऑक्‍सिजन पुरवठा सुरू केला पण आमच्या आईचा जीव गेला होता, असे स्पष्ट केले.

रुग्णालयातील मनोहर कर्णीकर (वय 70, रा. यशनगर, सोलापूर) रुग्णाचा मृत्यू सकाळी साडेदहा वाजता झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असून, रविवारी दुपारी अडीचच्या दरम्यान गंभीर अवस्थेत रुग्ण दाखल झाला होता, असे सांगितले.

प्रशासनातील संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीप सोपल व संचालक बन्सीधर शुक्‍ला यांनी पत्रकार परिषद घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. अश्रूबाई सांगळे, जनाबाई बंडगर या दोन्ही रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. दररोज डॉक्‍टर रुग्णांची तपासणी करून उपचार करीत होते. दुःखाच्या आवेगात मृतांचे नातेवाईक आरोप करीत आहेत. दिवस-रात्र रुग्णांची काळजी घेतली जात होती. ऑक्‍सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही. खासगी हॉस्पिटल, खासगी प्लान्ट असणारे मुलगे, पठाण यांच्याकडून सिलिंडर उपलब्ध करून रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवठा सुरू केला होता.

माजी मंत्री दिलीप सोपल म्हणाले, की पालकमंत्र्यांच्या बैठकीतच सांगितले होते की, बार्शीच्या रुग्णालयात नेक टू नेक ऑक्‍सिजन पुरवठा होत आहे. ऑक्‍सिजन संपत येत असताना मिळतो. प्रांताधिकारी यांना याबाबत वारंवार सूचना, लेखी मेसेज पाठवले होते तरीपण रविवारी सोलापूर येथे ऑक्‍सिजन मिळाला नाही. लोणंद येथे बिघाड झाल्याने उपलब्ध झाला नाही, तर फलटण येथे शेकडो वाहने ऑक्‍सिजनसाठी थांबली होती. तेथूनही उपलब्ध झाला नसताना ऑक्‍सिजन उपलब्ध करून रुग्णांना सेवा दिली आहे. रुग्णालयात 38 रुग्ण आहेत, त्यापैकी 20 जणांना ऑक्‍सिजन सुरू आहे तर 13 जणांना ऑक्‍सिजनची गरज नाही, तीनजण पायपॅप मशिनवर आहेत. दोघांचा मृत्यू झाला. इतर रुग्णांनाही ऑक्‍सिजन मिळाला नाही म्हणून त्रास झाला असता, असे म्हणत प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, तहसीलदार सुनील शेरखाने, नगरपरिषदेच्या आरोग्य विभागप्रमुख ज्योती मोरे यांनी रुग्णालयास भेट दिली.