Solapur News : वीट येथील उदय ढेरे यांच्या शेतात घडलं आक्रीत; ऐन दुष्काळात पाच फुटावरच लागले पाणी

शेतात एवढ्या वरती लागलेले पाणी पाहून आम्हालाही आश्चर्य वाटले आहे. त्या दिवशी मोटारने पाणी काढल्यानंतर पुन्हा पाणी येणार नाही असे वाटले होते.
Uday Dere farm at veet water found distance of five feet
Uday Dere farm at veet water found distance of five feetSakal

करमाळा : करमाळा तालुक्यात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर बसत आहेत. वाढलेली उष्णता आणि कमी झालेला पाऊस यामुळे विहिरी, कूपनलिका आटून गेल्या आहेत. अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत.

अशा परिस्थितीत मात्र वीट येथील उदय ढेरे यांच्या शेतात असलेले मोठे दगड काढत असताना झालेल्या खड्ड्यात पाणी लागल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यात दररोज दोन ते तीन तास पाच एचपी मोटार चालत आहे.

वीट (ता. करमाळा) येथून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर मोड व मोरवड रस्त्यांच्या बाजूला उदय ढेरे यांची शेती असून, या शेतात हे पाणी लागले आहे. दुष्काळी परिस्थितीत पाच फुटावर लागलेले पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.

विशेष म्हणजे या शेताजवळ आठ दहा किलोमीटरच्या परिसरात कोठेही तलाव किंवा अन्य पाण्याचा स्रोत नाही. या भागातील ६०० ते ७०० फुटापर्यंतचे बोअर कोरडे पडले आहेत, ७० ते ८० फुटापर्यंतच्या विहिरी आटल्या आहेत.

उदय ढेरे हे उन्हाळी दिवस असल्याने शेतातील दुरुस्तीची कामे करत आहेत. ही कामे करत असताना शेतात असलेले मोठे मोठे दगड काढून हे दगड बाहेर कोठे ठेवायचे, म्हणून शेतातच मोठा खड्डा घेऊन हे दगड त्यात गाडण्याचे काम करत असताना दगड काढण्यासाठी खड्डा खोदत असताना या खड्ड्यांमध्ये पाणी आले, सुरवातीला असे वाटले की हे पाणी तात्पुरते असेल.

मात्र जास्त पाणी आले. दोन दिवसानंतर या खड्ड्यात चार फूट पाणी आले. सर्वत्र लोक पाणी पाणी करत असताना एवढ्या वरती पाणी लागल्याने उदय ढेरे यांनी खड्ड्याची रुंदी वाढवली आणि थोडी खोली वाढवली. सर्वत्र विहिरी, बोअरचे पाणी आटले असताना पाच- सहा फुटावरती उदय ढेरे यांच्या शेतात लागलेले पाणी ही मोठी किमया मानली जात आहे.

आमची शेती दोन ठिकाणी आहे. मोरवडच्या बाजूकडील शेतात मोठे दगड आहेत हे दगड काढण्याचे काम सुरू होते. शेतात एवढ्या वरती लागलेले पाणी पाहून आम्हालाही आश्चर्य वाटले आहे. त्या दिवशी मोटारने पाणी काढल्यानंतर पुन्हा पाणी येणार नाही असे वाटले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेवढेच पाणी आले. दुष्काळी परिस्थितीत सहज म्हणून घेतलेल्या खड्ड्यात लागलेल्या पाण्याने आम्ही समाधानी झालो आहोत.

- उदय ढेरे, शेतकरी, वीट, ता. करमाळा

दोन महिन्यांपासून वीटला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहे. सर्वत्र विहिरी बोअर आटले आहेत अशा परिस्थितीत उदय ढेरे यांच्या शेतात खड्ड्यात पाणी लागले हे ऐकून आम्हाला सुरवातीला आश्चर्य वाटले आम्ही स्वतः जाऊन पाहिले तर खरोखरच उदय ढेरे यांच्या शेतात पाच ते सहा फुटावरती चांगले पाणी लागले आहे.

- अंकुश जगदाळे, वीट, ता. करमाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com