पदवीधरच्या उमेदवारीत डावललेले उमेश पाटील म्हणतात, पवारांनी संधी दिली नसती तर मी महाराष्ट्राला माहीतही झालो नसतो 

logo
logo

सोलापूर : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादीतर्फे निवडणुक लढविण्यास प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील ईच्छुक होते. तुम्हाला उमेदवारी का मिळू शकली नाही ? असा प्रश्‍न विचारला असता उमेश पाटील म्हणाले, शरद पवार यांना प्रश्न विचारावा एवढी माझी लायकी नाही. माझ्यासह माझ्यापेक्षा जास्तीची अनेक वर्ष अरुण लाड हे पवार यांच्या सोबत आहेत. अरूण लाड हे देखील मागील 18 वर्षापासून पुणे पदवीधर निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक होते. पक्षाने मला उमेदवारी दिली नसली तरी मी नाराज नाही. सार्वजनिक जीवणामध्ये यश अपयश गृहीत धरून खिलाडू वृत्तीने स्पर्धा करणे अपेक्षीत असल्याचेही उमेश पाटील यांनी सांगितले. 

मला उमेदवारी मिळाली नसली तरी पक्षाने श्री.अरूण लाड यांना उमेदवारी देऊन अनेक वर्ष पक्षाची सेवा करणाऱ्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील पक्षाच्या जुन्या निष्ठावंत सहकाऱ्याला उमेदवारी देऊन त्यांच्यावर अनेक वर्षापासून झालेला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उमेश पाटील म्हणाले. शरद पवार यांनी मला युवक प्रदेशाध्यक्ष, प्रदेश प्रवक्ता, प्रदेश सरचिटणीस, जिल्हा प्रभारी, जि. प. सदस्य यासारख्या पदांवर संधी दिली. म्हणून मला सार्वजनिक जीवनात जनतेमध्ये जाऊन काम करण्याची संधी मिळाली. या विविध जबाबदाऱ्या पवार यांनी दिल्या नसत्या तर उमेश पाटील महाराष्ट्राला माहितही झाला नसता. सातत्यपुर्वक निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला आज ना उद्या संधी मिळू शकते. त्या साठी जबाबदार कार्यकर्त्यांमध्ये उचीत संयम असायला हवा असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पक्षाने किंवा पक्ष नेतृत्वाने योग्य विचार करूनच सन्माननीय अरूण लाड यांना उमेदवारी दिली आहे. त्या निर्णयाचा आपण सर्वांनी सन्मान करायला हवा. आपल्या पेक्षा पक्ष मोठा असतो व पक्षामुळे आपण मोठे असतो हे लक्षात ठेऊनच सार्वजनिक जीवनात काम करत राहणे, यातच पक्षाचे हीत व नेतृत्वाबद्धलचा आदर सामावलेला असतो. गैरसोयीचा निर्णय आपल्यासाठी कटू असला तरी, नेतृत्वाला सुद्धा तसा निर्णय घेताना आनंद होत नसतो.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व निर्णय प्रक्रियेतील सर्व पक्षश्रेष्ठींनी माझ्या उमेदवारी संदर्भात शेवटच्या दिवसापर्यंत गंभीरपुर्वक विचार केला, शरद पवारांनी स्वतः: फोन करून जवळपास 15 मिनिट माझ्या सोबत आत्मियतेने संवाद साधला ही माझ्यासाठी सन्मानाची व समाधानाची बाब असल्याचेही उमेश पाटील यांनी सांगितले. माझ्या सहकाऱ्यांनी, माझ्यासाठी नोंदणी केलेल्या व इतरही सर्व पदवीधर मतदारांनी, आपण सर्वजन मिळून पुरोगामी विचार व पवार यांचे नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अरूण लाड यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे व महाराष्ट्र विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात पाठवावे असे आवाहनही उमेश पाटील यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com