महापालिकेला अनावृत्त पत्र

Solapur-Municipal.jpg
Solapur-Municipal.jpg

मा. महापौर / आयुक्त, 
सोलापूर महापालिका, 
सोलापूर 

स. न. वि. वि.
तसे हे पत्र आपल्यासोबत सर्व नगरसेवक, पदाधिकारी व अधिकारी यांनाही आहे. 
पत्रास कारण, नेहमीच्याच आपल्या सोलापूरकरांच्या नागरी समस्या संपणार की नाहीत? वर्षानुवर्षे त्याच त्या समस्या आम्ही मांडत आहोत, मग मनपा नक्की काय करतेय? असा सवाल आम्हाला पडला आहे. सत्ता बदलून काही उपयोग नाही, हेही सोलापूरकरांना कळत आहे. आम्हास नेहमीच एवढे गृहीत का धरले जातेय? वर्षानुवर्षे पाणीपुरवठ्याची बोंब... शहरात अनेक ठिकाणी ठाण मांडून बसलेली मोकाट जनावरे, कोव्हिड-19 ने स्पष्ट झालेल्या आरोग्य सोईंच्या मर्यादा, पावसात झालेली रस्त्यांची दैना, वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी, स्मार्ट सिटीच्या कामाचे खड्डे, अविकसित उद्याने... 

आता सविस्तर मुद्दा मांडतो : सोलापूरकरांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न वर्षाला 100 दिवसही पाणी न देता 365 दिवसांची पाणीपट्टी घेणारी महानगरपालिका म्हणून आपली ख्याती आहे. आम्ही आपले उजनीत पाणी आहे / नाही, औज बंधाऱ्यात पाणी पोचले... या बातम्या कान देऊन ऐकत असतो. आता उजनी धरण तुडूंब भरलेले असताना 2-3 दिवसांआड पाणी देण्यास काय अडचण आहे माहीत नाही. पण कोणी प्रयत्नही करताना दिसत नाही. पूर्वीचे सत्ताधिकारी कमीतकमी बंधाऱ्यात पाणी आले की अधिकाऱ्यांच्या मागे लागून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असत; पण आता कोणाचेच त्या पाणीपुरवठ्याशी देणे-घेणे नाही; कारण आता आम्हाला आठवड्यातून एकदा पाण्याची सवय झाली आहे. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी यावर मौन पाळले असून आजवर कोणीच प्रशासनाला धारेवर धरले नाही. आता तर पाण्याचे तिन्ही स्रोत उजनी धरण, औज बंधारा, हिप्परगा तलाव भरलेले असूनही तरी पाणी 2-3 दिवसातून एकदा याचे नियोजन करावे, असे आपणास का वाटत नाही? किंबहुना हे प्रशासनाचे कर्तव्य आहे असे आपणास का वाटत नाही? 

दुहेरी जलवाहिनीच्या बातम्या अधूनमधून वर्तमानपत्रात येत असतात एवढेच. याबाबत एन.टी.पी.सी.ची जलवाहिनी मिळणार होती त्याचे काय झाले माहीत नाही. आणि यापुढे दुहेरी जलवाहिनी कधी पूर्ण होईल सांगता येत नाही. आमच्या पुढल्या पिढीच्या तरी नशिबात दुहेरी जलवाहिनी आणि रोज पाणीपुरवठा असेल की नाही अशी शंका आहे... 

आम्हाला दाखवलेले आश्वासनांचे दुसरे स्वप्न म्हणजे उड्डाणपूल ! भले भले पुलांचे डिझाईन पाहूनच सोलापूरकर भारावून गेले होते. पण प्रशासकीय पातळीवर या गोष्टी घडवून आणणे किती अवघड आहे हे कळत आहे. त्यामुळे नियोजित दोन्ही उड्डाणपुले फक्त कागदावरच आणि निवडणूक जाहीरनाम्यापुरतेच राहणार असे दिसते. मुळात एवढ्या लांब पुलाची गरज आहे का? तर जवळपास सर्वजण एकाच स्वरात म्हणतील "नाही'. उड्डाणपुलाची गरज बस स्टॅंडसमोर आणि मार्केट यार्ड परिसरात तसेच अशोक चौक, आसरा चौक अशा गर्दीच्या ठिकाणी जास्त आहे. या रस्त्यांवर एक-एक उड्डाणपुलाचे नियोजन झाले असते तर हे काम लवकर झाले असते. कारण, त्यामानाने बजेट कमी लागते आणि शासनाची मदत होऊ शकते. मनपासुद्धा आपला छोटा हिस्सा देऊ शकते. औरंगाबादचा जालना रोड याचे उत्तम उदाहरण आहे. 9-10 किमीच्या या रस्त्यावर एक-एक करीत आज 4-5 उड्डाणपुले तयार होऊन वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच इथेही करता आले असते. एवढ्या मोठ्या प्रोजेक्‍टला ना शासन पैसा देते ना महापालिकेकडे आपला हिस्सा देण्यास निधी आहे. त्यामुळे रोज पाणी पुरवठ्याप्रमाणे उड्डाणपूलही सोलापूरकरांचे स्वप्नच राहणार असे दिसते. 

बरे मान्य आहे की वरील सर्व बाबींना पैसे लागतात; पण मोकाट जनावरांमुळे झालेली वाहतूक कोंडी?.. त्याचे काय? आज विजयपूर रोड, आयटीआय समोर, बस स्टॅंडसमोर, डी. आर. एम. ऑफिससमोर अशा अनेक ठिकाणी मोकाट जनावरे बसलेली असतात आणि वाहतुकीला अडथळा करतात. त्यामुळे रोज छोट्यामोठ्या अपघातांना कारणीभूत ठरतात. याकडे कोणीच लक्ष देत नाही. या रस्त्याने मनपाचे संबधित अधिकारी येत-जात असतील, त्यांनाही ही मोकाट जनावरे दिसत नसतील असे समजायचे का? बरं, यासाठी मनपाचा स्वतंत्र विभाग आहे, कोंडवाडा आहे; मग या जनावरांच्या मालकांना नोटिसा देऊन जनावरे कोंडवाड्यात भरती केल्या का जात नाहीत? 

भटक्‍या जनावरांसोबतच भटकी कुत्रीसुद्धा छोट्या-मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. सोलापूरइतकी भटकी कुत्री दुसऱ्या शहरात असतील असे वाटत नाही. विशेषतः जुळे सोलापूरकर त्रस्त झाले आहेत. एका छोट्याशा गल्लीत 15-20 कुत्री गटागटाने फिरत असतात आणि मोटारसायकल स्वारांच्या मागे लागतात किंवा गाडीच्या चाकाखाली येतात. विशेषतः रात्रीच्या वेळी मोटारसायकलस्वार पडून अपघात होत आहेत. कचरा गाड्यांमुळे या कुत्र्यांना उकिरड्यावरचे अन्न मिळत नसल्यामुळे अशी कुत्री रोगट होऊन सामाजिक आरोग्य बिघडवत आहेत. तसेच काही कुत्री हिंसक होत आहेत. मध्यंतरी असे वाचण्यात आले होते, की या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी लागणारी आर्थिक तरतूद ही अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांना काहीच करता येत नाही. मग लोकांच्या आरोग्याशी निगडित बाब असूनही यासाठी निधीचे प्रयोजन का होत नाही? असा प्रश्न प्रत्येक सोलापूरकर विचारतोय. 


खड्ड्यांचे तर विचारूच नका! पावसाने तर अजून रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यात छत्रपती संभाजी महाराज तलावाचा पूल बंद करून वाहतूक आसरामार्गे वळविण्यात आल्यामुळे जुळे सोलापूरकरांचे एक आठवडाभर अतोनात हाल झाले. याचा जाब प्रत्येक नगरिक या विभागातील नगरसेवकांकडे निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा निर्णय घेण्याअगोदर आसरा पूल आणि परिसरातील रस्त्यांची पाहणी करून त्यावरचे खड्डे का बुजवण्यात आले नाहीत? या रस्त्याचा सर्व्हे व्हायला हवा होता; परंतु या निर्णयाअगोदर कुठलीही पूर्वतयारी दिसून आली नाही. त्यातही सर्वच वाहतूक वळवल्यामुळे जास्त गर्दी झाली. आज जसे केले म्हणजे लहान वाहनांसाठी हा रास्ता खुला केला तसे सुरवातीपासून केले असते तर एवढा त्रास झाला नसता. यात कुठेतरी नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. 

भरीस भर म्हणून निम्म्या शहरातले रस्ते स्मार्ट शहराच्या कामासाठी खोदून ठेवले आहेत. सात रस्ता, व्हीआयपी रोड ते बाळी वेसपर्यंत प्रत्येक रस्ता खोदून ठेवला आहे. बरं, नक्की काय करत आहेत हे कोणालाच माहीत नाही, फक्त जमिनीखालून सर्व पाइप किंवा इतर इलेक्‍ट्रिक फोनचे केबल इतकाच याचा उद्देश आहे का? याबाबत मनपाने जनतेच्या मनातील प्रश्नांचे निरसन करणे गरजेचे आहे. स्मार्ट शहराकडे जर आवश्‍यक निधी असेल तर रस्त्याच्या कामापेक्षा (रस्त्याचे एका पावसामध्ये काय होते हे सर्वाना माहिती आहे) एखादा लक्षात राहील असा दीर्घकालीन प्रकल्प जसे जुळे सोलापूरमध्ये सार्वजनिक इस्पितळाची गरज आहे, नवी पेठ येथे पुणे-मुंबईच्या धर्तीवर वाहनतळ, हिप्परगा / संभाजी तलावाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास, इत्यादी केला असता तर सोलापूरकरांचा जास्त फायदा झाला असता. बरे, आता चालू असलेली कामे कधी संपणार हे जनतेला माहीतच नाही आणि कोणी सांगतही नाही. त्यामुळे रस्त्यावरचे धुळीचे प्रमाण इतके वाढले आहे, की सोलापूरचे धुळापूर झाले आहे. 

कोव्हिड-19 च्या महामारीने मनपाच्या आरोग्य विभागाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. पूर्ण सोलापूर सध्या सिव्हिल हॉस्पिटलवर अवलंबून आहे. त्याव्यतिरिक्त असणारी महापालिकेची आरोग्य व्यवस्था अगदीच तोकडी दिसून येते. एकाही रुग्णालयात पुरेसे डॉक्‍टर, औषधी, अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नाही. सिटी स्कॅन, एम.आर.आय. यासाठी खासगी रुग्णालयात भरमसाठ शुल्क लागते. ही अशी यंत्रसामग्री स्मार्ट सिटीच्या निधीतून उपलब्ध करता येऊ शकत नाही का? इतर अनेक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय किंवा सुसज्ज रुग्णालय चालवतात; मग सोलापूर महानगरपालिका याकडे का लक्ष देत नाही? 

उपलब्ध बरेचसे डॉक्‍टर्स कंत्राटी पद्धतीने तासिका तत्त्वावर भरती केले आहेत. अशा डॉक्‍टरांकडून अपेक्षित रुग्णसेवा कशी होऊ शकेल? त्यामुळे महापालिकेने सर्व वैद्यकीय डॉक्‍टर्स कायमस्वरूपी नेमल्यासच महापालिकेची वैद्यकीय सेवा सुधारू शकेल. जुळे सोलापुरातील वाढत्या वस्त्यांप्रमाणे एकही सार्वजनिक रुग्णालय नाही. त्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. 

सोलापुरात आयटी पार्क किंवा इतर मोठे प्रकल्प आणण्याची घोषणा निवडणुकीत अनेक पक्षांनी केली. परंतु आज चिंचोळी एमआयडीसीमध्ये बोटावर मोजण्या इतके कारखाने राहिले आहेत. त्यामुळे सोलापुरात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. सोलापुरातून शिकून बाहेर पडलेल्या कुठल्याही क्षेत्रातील मुलांना सोलापुरात नोकरी / रोजगार मिळत नाही. मग इंजिनिअर असो, एमबीए असो बीकॉम असो किंवा बीसीए किंवा बीएस्सी सर्वांना पुणे / मुंबईला पळावे लागते. त्यामुळे आज सोलापुरातील सर्व तरुण वर्ग पुणे, बंगळूर, हैदराबाद इत्यादी ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. त्यांना रोखण्याचे कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यात त्यांच्या पालकांनाही सोलापूर सोडावे लागत आहे. आज जुळे सोलापुरातील किती तरी बंगले रिकामे आहेत किंवा फक्त आईवडील राहतात. अशा कारणांमुळे सोलापुरातील मुलांना मुलगी मिळण्यासही अडचण येत आहे. अशा नवीनच सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. न शिकलेल्या किंवा कमी शिकलेल्या तरुण वर्गाला टमटम किंवा चहा टपरी किंवा भज्याची गाडी असेच पर्याय शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सोलापुरात टमटम आणि टपऱ्यांची संख्या वाजवीपेक्षा कितीतरी जास्त आहे. अशा बेरोजगारीमुळे भुरट्या चोरांची संख्या वाढत आहे. 

उद्याने, क्रीडांगणे याच्याबाबतीत तर विचारायच नको. नावाला अनेक उद्याने आहेत परंतु एकाही उद्यानात लहान मुलांची खेळणी (घसरगुंडी, झोके इत्यादी) सुस्थितीत नाहीत. स्वच्छता, शौचालय तर कुठेही दिसत नाही. मनात आणले तर किल्ला बाग, संभाजी तलाव खूप चांगल्या प्रकारे विकसित करू शकतो. या बागेत तर खेळणीसोबत इतर प्रकल्प जसे मिनी ट्रेन, ज्युरासिक पार्क, नाना-नानी पार्क केल्यास महापालिकेस उत्पन्नाचे एक साधन होऊ शकते. संभाजी तलावास कोल्हापूरच्या रंकाळा तलावाप्रमाणे विकसित करता येऊ शकते. आता कुठे त्यातील जलपर्णी काढायला सुरवात झाली आहे. पुढे पुढची कामे कधी होतील माहीत नाही. अशी कामे कंपन्यांच्या मदतीने किंवा बीओटी तत्त्वावर अगोदरच करता येणे शक्‍य होते. परंतु दुर्दैवाने कुठल्याच राजकीय पक्षामध्ये याविषयी इच्छाशक्ती दिसून येत नाही. 

तर माननीय महापौर, आयुक्त आणि मनपाशी निगडित सर्व पदाधिकारी, अधिकारी या सोलापूरकरांच्या मूलभूत प्रश्नांची दखल घेऊन परत सोलापूरला अच्छे दिवस आणतील, अशी आशा करतो. 

आपला 
प्रा. डॉ. राजेंद्र बिरंगणे, 
सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com