
विद्यापीठाची १५ जूनपासून ऑफलाइन परीक्षा! लिखाणाचा सराव मोडल्याने गुणवत्तेची कसोटी
सोलापूर : कोरोना काळात सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आल्या. त्यात सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) होते. एका तासात त्यांना तो पेपर सोडवावा लागला. त्यानंतर शिक्षणही ऑनलाइन मिळाले. लिखाणाचा सराव मोडलेल्या विद्यार्थ्यांना आता दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ऑफलाइन परीक्षा द्यावी लागत आहे. प्रत्येक तासाला १५ मिनिटांचा वेळ वाढवून दिला असला, तरीही विद्यार्थ्यांच्या गुणांवर त्याचा निश्चितपणे परिणाम होणार आहे.
हेही वाचा: चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरीच केला अभ्यास! दुसऱ्याच प्रयत्नात ‘युपीएससी’त पास
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने १५ जून ते ३१ जुलै या कालावधीत सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. तत्पूर्वी, विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांपैकी बहुतेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची परीक्षेपूर्वीची पूर्वतयारी म्हणून चाचणी घेतली. दहा गुणांच्या चाचणीसाठी त्यांना एक तासाची वेळ कमी पडल्याचा अनुभव प्राध्यापकांना आला. त्यामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या ऑफलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची कसोटी लागणार हे निश्चित आहे. ८० गुणांच्या परीक्षेत १५ गुणांचेच वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. उर्वरित प्रश्नांची सविस्तर उत्तरे विद्यार्थ्यांना लिहावी लागणार आहेत. दोन तासांच्या पेपरसाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. एक पेपर झाल्यानंतर दोन दिवसांनी दुसरा पेपर घ्यावा, असे अपेक्षित आहे. पण, विद्यापीठाचे वेळापत्रक पाहता तसे होईल की नाही, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे मानसिक तणावाखाली न वावरता लिखाणाचा सराव करून विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
हेही वाचा: शिक्षकांना ज्यादा तासाची अट! अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नवे नियम
परीक्षेबद्दल ठळक बाबी...
विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयातील ७० हजार विद्यार्थी देणार परीक्षा
विद्यापीठाच्या सत्र परीक्षेसाठी जिल्ह्यात ७१ केंद्रांचे नियोजन; यंदा परीक्षा ऑफलाइन
प्रत्येक तासासाठी मिळाणर १५ मिनिटे वाढीव; दोन पेपरमध्ये एका दिवसाचे असावे अंतर
१५ जून ते ३१ जुलै या काळात होईल परीक्षा; १ ऑगस्टपासून सुरु होईल नवे शैक्षणिक वर्ष
कॉपीमुक्त परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर; भरारी पथकांद्वारे होणार पडताळणी
सुरवातीला पारंपारिक अभ्यासक्रमाची तर शेवटी व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा
हेही वाचा: दोन टप्प्यात निवडणूका? महापालिका, नगरपालिकानंतर झेडपी, पंचायत समिती
नियोजन करून विद्यापीठ निवांत
कोरोना काळात तीन-चार सत्र परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आल्या. पण, दोन वर्षांनी आता ऑफलाइन परीक्षा होत आहेत. ही परीक्षा देण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव झाला आहे का, विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत का, याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाकडून काहीच ठोस पर्याय केला गेला नाही.
Web Title: University Offline Exams From June 15 Breaking The Practice Of Writing Is A Test Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..