मंदिर समितीच्या 'या' निर्णयामुळे झाले फुलांचे भाव मातीमोल! Pandharpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंदिर समितीच्या 'या' निर्णयामुळे झाले फुलांचे भाव मातीमोल!
मंदिर समितीच्या 'या' निर्णयामुळे झाले फुलांचे भाव मातीमोल!

मंदिर समितीच्या 'या' निर्णयामुळे झाले फुलांचे भाव मातीमोल!

sakal_logo
By
राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : शहरातील संतपेठ भागातील फूल बाजारातील (Flower market) लिलावामध्ये शनिवारी (ता. 13) झेंडूच्या फुलांना अवघा दोन रुपये किलो दर मिळाला. ऐन कार्तिक वारीच्या कालावधीमध्ये झेंडू फुलांना मातीमोल भाव मिळाल्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

श्री विठ्ठल मंदिर समितीने कोरोनामुळे भाविकांनी फुले व हार घेऊन मंदिरात प्रवेश करू नये, अशी सूचना केली आहे. समितीच्या वतीने तसे सूचना फलक मंदिर परिसरात जागोजागी लावण्यात आले आहेत. पूर्वी मंदिरात जाण्यापूर्वी भाविक मंदिर परिसरातील हार विक्रेत्यांकडून तुळशीची माळ व फुलांचा हार घेऊन मंदिरात प्रवेश करीत होते. मात्र आता मंदिर समितीने भाविकांना हार व फुले मंदिरात नेण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे फूल विक्रेत्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. भाविक हार खरेदी करत नसल्यामुळे येथील फूल बाजारातील फुलांची मागणी अत्यंत कमी झाली आहे, याचा परिणाम म्हणून फुलांचे दर पडले असून फुलांना मातीमोल भाव मिळत आहे. ऐन कार्तिकी यात्रा कालावधीमध्ये फुलांना अपेक्षित दर मिळत नसल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा: एसटी महामंडळ विलिनीकरणात 'हे' अडथळे! निर्णयाची उत्सुकता

कार्तिकी यात्रा काळात चांगला दर मिळेल या आशेवर मी अर्धा एकर झेंडू लावला आहे. मी आज दहा क्रेट झेंडू फुले बाजारात घेऊन आलो होतो. मात्र सध्या फुलांचा उठाव होत नसून, पाच किलो झेंडू फुलांच्या एका क्रेटला जेथे शंभर ते दीडशे रुपये भाव मिळायला हवा तो फक्त दहा रुपये मिळाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तर सोडाच पण फुलं तोडायची मजुरीही निघत नाहीये

- नाना कचरे, फुले उत्पादक शेतकरी, पेहे, ता. पंढरपूर

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून आमचा फुले व हार विक्रीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. आता कार्तिकी यात्रेमध्ये चांगला व्यवसाय होईल या आशेवर बसलो होतो; मात्र मंदिर समितीने भाविकांना मंदिरात फुले व हार नेण्यास मनाई केल्यामुळे आमची विक्री ठप्प झाली आहे.

- ज्योतिराम ढोपे, फूल विक्रेता, पंढरपूर

loading image
go to top