esakal | ‘चंद्रभागे’चे तीर्थ पिऊन मिरासदारांची अखेर
sakal

बोलून बातमी शोधा

‘चंद्रभागे’चे तीर्थ पिऊन मिरासदारांची अखेर

‘चंद्रभागे’चे तीर्थ पिऊन मिरासदारांची अखेर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : प्रख्यात साहित्यिक द.मा.मिरासदार यांना शेवटच्या क्षणी पंढरीच्या चंद्रभागेचे तीर्थ प्राशन करण्याचे भाग्य लाभले. मूळचे पंढरपूरचे असलेले ‘द. मा.’ यांचे पुण्यात शनिवारी रात्री निधन झाले. मिरासदार यांचे बंधू वि.मा.मिरासदार यांच्या कन्या माजी मुख्याध्यापिका रोहिणी कोर्टीकर या वडील वि.मा. मिरासदार आणि अन्य नातेवाईकांसह शनिवारी सायंकाळी पाच वाजता पंढरपूरहून पुण्यात पोचल्या. द.मा. यांनी सर्वांना डोळे उघडून बघितले. पंढरपूरमधील घरातून आणलेले चंद्रभागेचे तीर्थ रोहिणी कोर्टीकर यांनी त्यांचे काका द.मा. यांच्या तोंडात सोडले आणि अवघ्या काही मिनिटानी इंदिरा एकादशी च्या दिवशी त्यांची प्राण ज्योत मालवली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, पंढरपूरचे भूषण, प्रसिध्द विनोदी साहित्यिक द.मा.मिरासदार यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर पंढपूरकरांनी हळहळ व्यक्त केली. मिरासदार यांचे बालपण पंढपुरात गेले. त्यांचे बंधू आणि अन्य नातेवाईक आजही पंढरपूरला रहात असल्याने दरवर्षी ते पंढरपूरला काही दिवस राहण्यासाठी आवर्जुन येत असत. जुन्या मित्रांना बोलवून चुरमुऱ्याच्या चिवड्यासह त्यांच्या मित्रांसोबत गप्पांच्या मैफली रंगत असत.

(कै.) मिरासदार यांचे वडील वकील होते. पंढपुरातील भजनदास चौकातील नगरकर वाड्यात मिरासदार लहानाचे मोठे झाले. लोकमान्य विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुढे महाविद्यालयातून एम.ए. झाल्यानंतर पंढरपूर मधील कवठेकर प्रशालेत त्यांनी काही वर्षे शिक्षक म्हणून काम केले. पुढे औरंगाबाद आणि नंतर पुण्यात स्थायिक झाल्यावर देखील दरवर्षी ते हुरडा खाण्याच्या निमित्ताने पंढरपूरला आवर्जुन येत असत. पंढरपूर विषयी त्यांना कमालीचा जिव्हाळा होता.

वयोमानामुळे गेल्या काही वर्षात ते थकले होते परंतु त्यांची पंढरपूरला येण्याची ओढ कायम होती. पंढरपूर मधील कोणीही अबालवृध्द त्यांना कुठेही भेटला की त्यांना मनापासून आनंद होत असे. बालपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. नदीकाठावरील नगर वाचन मंदिरात ते तासनतास पुस्तके वाचत असत. एकदा नगर वाचन मंदिरात ते वाचत बसलेले असताना ग्रंथपालाच्या लक्षात न आल्याने तो कुलूप लावून निघून गेला अन मिरासदार वाचनालयात अडकून पडले अशा अनेक बालपणातील गंमतीशीर आठवणींना त्यांनी त्यांच्या लेखनातून उजाळा दिला होता. त्यांची निरीक्षणशैली अफाट होती. ते केवळ विनोदी लेखक नव्हते तर एक चतुरस्त्र लेखक होते. ते पुस्तके जसे वाचत तसेच ते माणसे देखील वाचत. वडिलांकडे येणाऱ्या ग्रामीण भागातील अशिलांचे ते निरीक्षण करत. त्यांच्या विषयी तसेच गावातील निवांत जगणारे पंढरपूरकर, दुकानांच्या फळ्यांवर रात्री उशीरापर्यंत रंगणाऱ्या फळीवरच्या गप्पांचे रंजकशैलीत त्यांनी विविध कथांमध्ये वर्णन केले आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याच्या निमित्ताने पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने त्यांचा कवठेकर प्रशालेत जाहीर सत्कार करण्यात आला होता.

निखळ, नितळ, निकोप आणि स्वच्छ अशा प्रकारच्या दर्जेदार विनोदांची द.मा. मिरासदार यांनी मराठीला अनमोल देणगी दिली. प्रासंगिक विनोद, शब्दनिष्ठ विनोद, व्यक्तीनिष्ठ विनोद यांचे सुंदर चित्रण त्यांच्या विनोदी साहित्यातून झाले. त्यांनी एका पिढीला अनेक वर्षे सतत खळखळून हसायला शिकवले.

- डॉ.द.ता.भोसले, ज्येष्ठ साहित्यिक, पंढरपूर

द.मा. मिरासदार यांनी कवठेकर प्रशालेत काही वर्षे शिक्षक म्हणून काम केले होते. त्यामुळे कवठेकर प्रशाले विषयी त्यांना प्रेम होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पंढरपूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी द.मा. मिरासदार यांनी अटलजींना कवठेकर प्रशालेत आवर्जुन आणले होते.

- ना.बा.रत्नपारखी, माजी मुख्याध्यापक, कवठेकर प्रशाला, पंढरपूर

loading image
go to top