esakal | हिंगणी प्रकल्पातून सोडले पाणी ! पिकांना जीवदान; उन्हाळ्यात पाणी सुटल्याने हतबल शेतकरी झाला समाधान

बोलून बातमी शोधा

Hingani Project.

हिंगणी धरण क्षेत्र परिसरात ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन वर्षांनंतर प्रथमच हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन भोगावती नदीला महापूर आला. हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याचे पाहून परिसरातील बळिराजा सुखावला. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती.

हिंगणी प्रकल्पातून सोडले पाणी ! पिकांना जीवदान; उन्हाळ्यात पाणी सुटल्याने हतबल शेतकरी झाला समाधान

sakal_logo
By
शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : "धरण उशाला अन्‌ कोरड घशाला' अशी अवस्था बार्शी तालुक्‍यातील हिंगणी धरण क्षेत्र व कॅनॉल क्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांची झाली होती. मात्र पाटबंधारे विभागाने वेळीच शेतकऱ्यांच्या व्यथा व मागण्या जाणून घेत हिंगणी प्रकल्पातून पाण्याचे पहिले आवर्तन सोडून पिकांना नवसंजीवनी दिली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कॅनॉलला पाणी सोडल्यामुळे बळिराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

हिंगणी धरण क्षेत्र परिसरात ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन वर्षांनंतर प्रथमच हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन भोगावती नदीला महापूर आला. हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याचे पाहून परिसरातील बळिराजा सुखावला. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. कारण, विविध ठिकाणी कॅनॉलची झालेली दुरवस्था, वाढलेले गवत, झालेल्या अतिवृष्टीत हिंगणी, पिंपरी, घाणेगाव, मानेगाव येथे फुटलेला कॅनॉल यामुळे बळिराजा मात्र हतबल झाला होता. "मुबलक पाणीसाठा असूनही लाभक्षेत्र तहानलेलेच' व "हिंगणी प्रकल्पाच्या कॅनॉलची दुरवस्था' असे वृत्त "सकाळ'मधून प्रकाशित करून निराश व हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा व मागण्या पाटबंधारे विभागापर्यंत पोचवण्याचे काम करण्यात आले. 

सोलापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एम. टी. जाधवर व बार्शीचे उपविभागीय अभियंता आर. एस. कुलकर्णी यांनी "सकाळ'च्या बातमीची तत्काळ दखल घेत कॅनॉलची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या भावनांना व पाण्याला वाट मोकळी केली. 

हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो होताच धरण क्षेत्र व कॅनॉल परिसरात ऊस, द्राक्ष, सीताफळ, भुईमूग या पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र सततच्या वाढत्या उन्हामुळे विहिरी, बोअर व नदीची पाणीपातळी खोल गेली आहे. शेतात उभी असलेली पिके सुकू लागली. जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे हिंगणी प्रकल्पाचा कॅनॉल सोडण्याची मागणी हिंगणी, पिंपरी, घाणेगाव, काळेगाव, मानेगाव, इर्ले, इर्लेवाडी, ढोराळे येथील शेतकऱ्यांमधून केली जात होती. संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या मागण्या विचारात घेत हिंगणी प्रकल्पातून पहिले आवर्तन सोडून पिकांना नवसंजीवनी दिली. 

ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे कॅनॉलची दुरवस्था झाली होती. सध्या तात्पुरत्या स्वरूपात कॅनॉलची दुरुस्ती केली असून पुढे कॅनॉलचा परिसर स्वच्छ करून मागणीनुसार आवर्तने सोडली जातील. 
- एम. टी. जाधवर, 
कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग 

हिंगणी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असून उन्हाची तीव्रता पाहता उभ्या पिकांना जीवदान देण्यासाठी एप्रिल व मे महिन्यात दोन ते तीन पाण्याची आवर्तने सोडून ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना आधार द्यावा. 
- औदुंबर मोटे, 
ऊस उत्पादक, मानेगाव 

संपादन : श्रीनिवास दुध्याल