esakal | ऑनलाइन शिक्षणात झाला व्हॉटसऍप ग्रुपचा फायदा 
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाइन शिक्षणात झाला व्हॉटसऍप ग्रुपचा फायदा 

शाळेत "राऊटर' बसविण्याची प्रक्रिया पूर्ण 
सध्या असे शिक्षण सुरू आहे, आता पुढचं कसं? शाळा सुरू कधी होणार? हे नेमके आता या परिस्थितीत तरी कोणी सांगू शकत नाही आणि जर असेच काही महिने शाळेत मुलांना न बोलावता शिक्षण चालू ठेवले तर अँड्रॉइड मोबाईल चालण्यासाठी इंटरनेट डाटा रिचार्ज करणे प्रत्येक पालकांना परवडणारे नाही. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली एक वर्षांसाठी फ्री इंटरनेटची सोय शाळेच्या मुलांना उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना या योजनेतून बीएसएनएल या कंपनीचे प्रति दिवस 30 जीबी डेटा देणारे "राऊटर' शाळेत बसवले जाणार आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ज्यामुळे 30 मीटर अंतरावर असलेल्या मोबाईलवर तो "राऊटर' जोडता येतो. याचा नक्कीच मुलांना फायदा होईल. 

ऑनलाइन शिक्षणात झाला व्हॉटसऍप ग्रुपचा फायदा 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाल्याने शाळा बंद ठेवाव्या लागल्या. पण, त्याही परिस्थितीत शिक्षण बंद ठेऊन चालत नव्हते. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी ऍन्ड्रॉईड मोबाईलने महत्वाची भूमिका बजावली. अशा विद्यार्थ्यांचे व्हॉटसऍप ग्रुप बनविले व त्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण सुरु केल्याचे पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सतीश राठोड सांगतात. सुरवातीला आलेल्या अडचणींवर मात करत ऑनलाइन शिक्षणाची सुरवात केली. त्याचा चांगला फायदा आजही विद्यार्थ्यांना होत असल्याने राठोड गुरुजी समाधानी आहेत. 

ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांच्या पालकाच्या मोबाइल फोनने शक्‍य झाले. पण, खेडेगावात असणाऱ्या प्रत्येक मुलांच्या घरात कुठे असतो अँड्रॉइड मोबाइल? त्यातील काही जणाकडे साधे मोबाइल फोन आहेत. ज्यांची परिस्थिती गरीब आहे ते तर मोबाइल वापरतच नाहीत. अशा परिस्थितीत शाळा बंद आणि शिक्षण चालू कसे ठेवायचे? असा प्रश्‍न राठोड गुरुजींना पडला. ज्या पालकांजवळ अँड्रॉइड मोबाइल फोन आहेत. त्यांचे व्हाट्‌सअप्प ग्रुप बनवले आणि रोजचे वेळापत्रक बनवले. ज्या मुलांजवळ अँन्ड्रॉइड मोबाइल नाही त्यांनी त्या वेळेस ज्यांच्याजवळ अँन्ड्रॉइड मोबाईल आहे, त्यांच्या घरी जाऊन व्हाट्‌सऍप वर पाठवलेले स्मार्ट पीडीएफ मधील शिक्षण पूर्ण करणे आणि काही अडचणी निर्माण होत असल्यास फोन करण्यास त्यांनी सांगितले. 

स्मार्ट पीडीएफमध्ये पाठ्यपुस्तकात असलेल्या पाठाच्या पानावरील क्‍यू आर कोडसुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या लक्षात येईल असे व्हिडिओ प्ले करता येतात. त्याकरिता प्रथम विद्यार्थ्यांना "दीक्षा' नावाचे ऍप त्यांना लिंक पाठवून डाऊनलोड करण्यासाठी सांगितले होते. विद्यार्थी त्यांनी केलेल्या अभ्यासाचा फोटो काढून ग्रुपवर पाठवतात आणि ते व्हॉट्‌सऍपवर तपासून त्यातील चुका काढून गुरुजी त्यांना परत पाठवतात. दहा पंधरा दिवसातून एकदा प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा अभ्यास तपासून गुरुजी तपासून घेतात. काही विद्यार्थी गावापासून लांब शेतात वस्तीवर राहतात आणि त्यांच्याजवळ अँन्ड्रॉइड मोबाइल नाही त्यांचे शिक्षण कसे चालू ठेवायचे? असा प्रश्‍न होता. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याचा स्वाध्याय प्रिंट काढून दिल्या आहेत. काही अडचण आली तर फोन करण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी सोडवलेला स्वाध्याय तपासण्यासाठी 10-15 दिवसातून गुरुजी वस्तीवर जाऊन तपासतात. सर्व सोय असूनही काही विद्यार्थी अभ्यास करत नाहीत, अशा तक्रारी पालक करत असतात. तेव्हा त्या मुलांची समजूत काढणे, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मनोरंजनात्मक अभ्यास देण्याचे काम राठोड गुरुजी करत आहेत. 

loading image