
सोलापूरचे निर्बंध शिथिल कधी? शहरात अवघे तीन रुग्ण; ग्रामीणमधील रुग्णही घटले
सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट आता पूर्णपणे ओसरल्याची स्थिती शहरात पहायला मिळत आहे. मागील तीन दिवसांत शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे ग्रामीणमधील रुग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे. सध्या शहरात तीन तर ग्रामीणमध्ये 64 सक्रिय रुग्ण आहेत. संसर्ग घटत असतानाही राज्य सरकारने सोलापूर शहर-जिल्ह्यातील निर्बंध हटविले नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता सगळे निर्बंध कधी शिथिल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: HSC, SSC Exam : दहा मिनिटे अगोदर मिळणार प्रश्नपत्रिका
ग्रामीणमध्ये बुधवारी (ता. 2) नवीन 16 रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर शहरात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. दक्षिण सोलापूर हा तालुका कोरोनामुक्त झाला असून बहुतेक तालुके कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. सध्या शहरात एक पुरुष तर तीन महिला आणि ग्रामीणमधील 64 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तिसऱ्या लाटेत विशेषत: लस न घेतलेले व ज्येष्ठ नागरिक (को-मॉर्बिड रुग्ण) हेच सर्वाधिक कोरोनाचे बळी ठरले आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सर्व व्यवहार आता पूर्वपदावर आल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये पहायला मिळत आहे. मास्कविना फिरणारेच सर्वाधिक पहायला मिळत आहेत. कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या जिल्ह्यातील नागरिक आता मास्कमुक्तीची मागणी करू लागले आहेत. मास्क नसल्याने होणारा पाचशे रुपयांचा दंड करू नये, अशीही मागणी करीत आहेत.
हेही वाचा: शहर कॉंग्रेसमध्ये गटबाजी! युवकाध्यक्षांनी मागितला शहराध्यक्ष, कार्याध्यक्षांचा राजीनामा
अडीच लाख डोस शिल्लक
जिल्ह्यातील जवळपास 34 लाख व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित घ्यावी, असे अपेक्षित होते. त्यापैकी 30 लाख 73 हजार व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. अजूनही जवळपास चार लाख व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. कोरोनाचा धोका व प्रादुर्भाव कमी झाल्याने तब्बल साडेआठ लाख व्यक्ती पहिला डोस घेतल्यांनतर दुसरा डोस टोचायला आलेच नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या कोवॅक्सिनचे 19 हजार 515 तर कोविशिल्डचे दोन लाख 16 हजार 670 डोस शिल्लक आहेत. बुस्टर असो वा पहिला, दुसरा डोस टोचायला लोक समोर येत नसल्याने आता त्या लसीचे करायचे काय, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
हेही वाचा: HSC, SSC Exam : दहा मिनिटे अगोदर मिळणार प्रश्नपत्रिका
कोरोना कमी, तरीही निर्बंध जैसे थेच
राज्यातील 14 जिल्ह्यातील निर्बंध राज्य सरकारने आज (बुधवारी) शिथिल केले आहेत. सोलापूर शहरात मागील तीन दिवसांपासून एकही रुग्ण आढळलेला नाही. ग्रामीणमधील रुग्णही मागील काही दिवसांपासून 20 पेक्षा कमीच रुग्ण आढळले आहेत. शहर-ग्रामीणमधील सक्रिय रुग्ण घटले आहेत. तरीही, सोलापूर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल झालेले नाहीत. राज्य सरकार कधी निर्बंध शिथिल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Title: When Will The Restrictions Of Solapur Be Relaxed Only Three Patients In The City The Number Of Patients In Rural Areas Also
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..