esakal | तिढा अकरावी प्रवेशाचा ! मूल्यांकनानंतरच प्रवेश; सायन्ससाठी होईल अंतर्गत चाचणी

बोलून बातमी शोधा

Exam
तिढा अकरावी प्रवेशाचा ! मूल्यांकनानंतरच प्रवेश; सायन्ससाठी होईल अंतर्गत चाचणी
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या गुणांच्या आधारे जाहीर होणार, सायन्स शाखेसाठी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळणार, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीतच आहेत. आर्टस्‌ व कॉमर्स शाखेकडे विद्यार्थ्यांचा कमी-अधिक कल असतो; परंतु विज्ञान शाखेला आता गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रवेशावेळी संबंधित महाविद्यालयांना अंतर्गत चाचणी घेता येईल का, यादृष्टीने विचारविनिमय सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

अकरावी प्रवेशावेळी दरवर्षी शहरातील अथवा ग्रामीणमधील नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थी प्रयत्न करतात. त्यामुळे आता तशा महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्यास संबंधित विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेतला जाणार, हा मोठा प्रश्‍न सध्या भेडसावू लागला आहे. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचे (प्रात्यक्षिक) 20 गुण दिले जाणार आहेत. तर बोर्डाच्या परीक्षेपूर्वी बहुतांश शाळांनी त्या विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा घेतली आहे. निकालात त्या गुणांचाही विचार बोर्डाकडून केला जाईल, अशीही शक्‍यता वर्तविली जात आहे. दहावीनंतर काही विद्यार्थी डिप्लोमाला तर काहीजण आयटीआयला प्रवेश घेतात. दुसरीकडे सायन्स, आर्टस्‌ व कॉमर्स शाखेची प्रवेश क्षमता पुरेशी आहे. अजून महाविद्यालये वाढणार आहेत. त्यामुळे प्रवेश सर्वच विद्यार्थ्यांना मिळेल, परंतु काही नामवंत महाविद्यालयांमध्येच अडचणी निर्माण होतील, असे शिक्षण विस्ताराधिकारी अशोक भांजे यांनी सांगितले.

हेही वाचा: "नांगरे पाटील व मंडळी फडणवीसांना भिऊ नकोस!... तुझ्या पाठीशी आहे!'

आर्टस्‌ कॉलेजेसची वाढली चिंता

तीन विषयांत अनुत्तीर्ण झाल्यास त्या विद्यार्थ्याला प्रमोट करून पुढील वर्गात प्रवेश मिळतो. त्यातील बहुतांश विद्यार्थी आर्टस्‌ व कॉमर्स शाखेलाच प्रवेश घेतात, हा अनुभव दरवर्षीचा आहे. मात्र, आता दहावीची परीक्षा रद्द करून सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना पास केले जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला प्रमोट करण्याची वेळ येणार नाही. या पार्श्‍वभूमीवर आर्टस्‌ शाखेला विद्यार्थी मिळणार का, सोलापूरसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधील आर्टस्‌ कॉलेजेस बंद पडतील, अशी शक्‍यता शिक्षण तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दुसरीकडे, आर्टस्‌ कॉलेजेसना विद्यार्थी न मिळाल्यास अकरावी, बारावीच्या वर्गातील शिक्षकांचे काय होणार, याची चिंता लागली आहे.

सोलापूर जिल्ह्याची स्थिती

  • अकरावी-बारावीची महाविद्यालये : 342

  • आर्टस्‌ शाखेची प्रवेश क्षमता : 18000

  • कॉमर्स शाखेची क्षमता : 24,700

  • सायन्स शाखेची प्रवेश क्षमता : 52,000

  • दहावीचे विद्यार्थी : 61,300