
Solapur News : नदीपात्रातील पाण्यात वीज प्रवाह उतरून म्हशीचा मृत्यू तर एका महिलेला ही बसला शॉक
मोहोळ : पाणबुडी मोटारीच्या केबलच्या जोडीतून इलेक्ट्रिक करंट नदीच्या पाण्यात उतरून विजेचा शॉक बसल्याने एका म्हशीचा मृत्यू झाला, तर एका महिलेला शॉक बसला. ही घटना आष्टे ता मोहोळ येथील सीना नदी पात्रात शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजता घडली. या प्रकरणी पाणबुडी मोटर मालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, आष्टे येथील सौदागर नाना खरात यांची पत्नी म्हशीला पाणी पाजण्यासाठी सीना नदीत घेऊन गेली होती. पाणी पीत असताना म्हैस अचानक पाण्यात बसली.
म्हैस पाण्यात अचानक का बसली म्हणून पाहण्यासाठी खरात यांची पत्नी पाण्यात उतरली. पाण्यात उतरताच पत्नीच्या पायाला शॉक बसुन मुंग्या आल्या. खरात यांच्या पत्नीने म्हशीला बांधलेली दोरी हातातून सोडून दिली व तातडीने पाण्याबाहेर आल्या व घडलेली हकीगत पतीला घरी जाऊन सांगितली.
पत्नीने घडलेली घटना सांगताच सौदागर खरात, बंडू वसंत गावडे, तानाजी अण्णा वाघमोडे, अभिमान नाना खरात हे नदीजवळ गेले असता त्यांना म्हैस पाण्यात पडल्याचे दिसले. दरम्यान आष्टे येथीलच रहिवाशी बबन सूर्यभान मेलगे यांनी त्यांच्या शेतात पाणी घेऊन जाण्यासाठी पाणबुडी मोटार नदीवर बसविली आहे.
दरम्यान सौदागर खरात यांनी मेलगे यांना तुमच्या केबलची जोड दिसत आहे, ती व्यवस्थित करून घ्या असे वेळोवेळी सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळेच माझी म्हैस विजेचा धक्का लागून मयत झाली आहे. पत्नीच्या पायाला ही विजेचा धक्का बसला परंतु ती लगेचच बाहेर आल्याने वाचली अन्यथा तिची ही गत म्हशी सारखीच झाली असती. या घटनेची फिर्याद सौदागर नाना खरात यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे.