आश्रमशाळेत जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kailash Aadhe and Mallesha Arkeri

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात सुमारे 977 आश्रम शाळा चालवल्या जातात.

Ashram School : आश्रमशाळेत जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण उपक्रम

मरवडे (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) - आश्रमशाळा म्हणजे विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजातील मुलांना फक्त पोटभर जेवण देत पोसणाऱ्या शाळा असे सर्वसाधारण मत नेहमीच समाज मनातून व्यक्त होत असते. हा गैरसमज दूर करून आश्रमशाळेतील मुलांमध्ये ज्ञानवृद्धी व कौशल्य विकास साधत आधुनिक शिक्षण देत त्यांची जागतिक स्तरावर मान उंचावली जाईल यासाठी आश्रमशाळांमध्ये जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण हा उपक्रम राबविला जात आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात सुमारे 977 आश्रम शाळा चालवल्या जातात. आश्रमशाळातून पहिली ते बारावी च्या वर्गासाठी निवासी व अनिवासी स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार असलेल्या एकविसाव्या शतकात आश्रमशाळेतील वंचित घटकातील मुलांना शिक्षण देत असताना ही मुले कोणत्याही बाबतीत कमी पडू नयेत म्हणून केंद्र सरकारच्या निपुण भारत या उपक्रमाच्या धर्तीवर आश्रमशाळात दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी राज्यभरातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील मरकळ, तळेगाव दाभाडे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे पार पडलेल्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरात शिक्षकांनी भविष्यवेधी शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रिटीकल थिकींग, क्रिएटिव्ह थिकींग, कोलॅबोरेशन, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, कंम्पॅसन हे सहा सी विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगून यासाठी शिक्षकांनी पुढीलप्रमाणे सहा पायऱ्यांचा उपयोग करावा. मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग, सेल्फी विथ सक्सेस अशा सहा पायऱ्यांचा वापर करुन मुलांच्या शिकण्याच्या गतीमध्ये वाढ होईल. यासोबतच टेक्झॉनॉमी ब्लुमजी, हावर्ड गार्डनरच्या नऊ बुध्दिमत्ता, सहा सी शिदोरी वेध आदी बाबींचा समावेश करावा.

आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षणातील तज्ञ मार्गदर्शकांनी दिलेल्या ज्ञानाचा फायदा घेत शिक्षकाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःपासून सुरुवात करत विद्यार्थ्यांना शिकण्याच्या नवनवीन संकल्पना आत्मसात करण्यासाठी प्रेरणा दिली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, अतिरिक्त मुख्य सचिव श्री नंदकुमार (भारतीय प्रशासन सेवा), संचालक जयंत जनबंधू, उपसचिव कैलास साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या जागतिक दर्जाचे भविष्य वेधी शिक्षण या उपक्रमामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला निश्चितच चांगली अशी दिशा मिळणार असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरावरतून कौतुक करण्यात येत आहे. हा उपक्रम आश्रम शाळेबरोबरच शिक्षण विभागाच्या शाळांमध्येही राबवणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण तज्ञाकडून व्यक्त केले जात आहे.

आकडे बोलतात -

सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळांची संख्या -

  • प्राथमिक आश्रमशाळा -44

  • माध्यमिक आश्रमशाळा -33

  • उच्च माध्यमिक आश्रमशाळा -21

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची संख्या -

  • प्राथमिक आश्रमशाळा -6193

  • माध्यमिक आश्रमशाळा -7179

  • उच्च माध्यमिक आश्रमशाळा -3037

कर्मचारी संख्या

  • मुख्याध्यापक -64

  • अधीक्षक -65

  • शिक्षक -798

आश्रमशाळेतील मुलांना जागतिक दर्जाचे भविष्यवेधी देण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून आता आश्रमशाळेत शिक्षण देण्याच्या पद्धतीत नवनवीन मार्गाचा अवलंब केला जात आहे. आश्रम शाळेतील शिक्षण पद्धतीत निश्चितच चांगले बदल जाणवत आहे त्यामुळे भविष्यात आदर्शवत काम झालेले पहावयास मिळेल.

- कैलास आढे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, सोलापूर

प्रशिक्षणाच्या आधी पारंपारिक पद्धतीने शिकवित असताना विशेष बुद्धिमत्ता असलेली मुले प्रतिसाद देत होती. परंतु आता जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षण पद्धतीनुसार वर्गातील सर्वच मुले प्रतिसाद देत आहेत. अप्रगत मुलांमध्येसुद्धा मी शिकू शकतो हा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे.

- प्रा. मल्लेशा अरकेरी, सहशिक्षक, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, बालाजीनगर

टॅग्स :educationashram school