World Tourism Day : लाख रुपयांत करू शकता परदेशात पर्यटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Tourism Day

World Tourism Day : लाख रुपयांत करू शकता परदेशात पर्यटन

सोलापूर : आध्यात्मिक पंढरी म्हणून सोलापूरची ओळख असलेल्या या जिल्ह्यात पर्यटनासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून अनेक भाविक येतात तसेच सोलापुरातील अनेक पर्यटक पर्यटनासाठी परदेशात जातात. श्रीलंका, नेपाळ यासह शेजारील देशांमध्ये एक लाख रुपयांमध्ये दोन पर्यटकांचे परदेशातील पर्यटन होते. त्यासाठी विविध टूर्स कंपन्यांच्यावतीने खास ऑफरही दिल्या जातात.

सोलापुरातील डॉक्‍टर, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी या वर्गातील घटक परदेशी पर्यटनाला प्राधान्य देत आहे. सोलापुरात विमानसेवा सुरू नसल्याने परदेशात पर्यटनासाठी जाण्याकरिता त्यांना मुंबई, पुणे, हैदराबाद येथील विमानतळावरून जावे लागत आहे. युरोपियन देशांत आठ दिवसांसाठी दोन जणांना साधारणतः आठ लाख रुपये खर्च येतो. दुबईसाठी चार दिवसांकरिता दोन जणांना दीड लाख रुपयांचा खर्च येतो. कोरोना महामारीमुळे परदेशात पर्यटनासाठी जाण्यावर काही बंधने आली होती. आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने पुन्हा एकदा परदेशात जाणाऱ्या सोलापुरातील पर्यटकांची संख्या वाढत आहे.

तीन महिन्यांतून एकदा परदेशात पर्यटनाला जाणारे पर्यटक सोलापुरात आहेत. काही उद्योजकांचे व्यवसाय परदेशात असल्याने व्यावसायिक कामानिमित्त परदेशी पर्यटनाचाही आनंद घेतात. सोलापुरातील परदेशी पर्यटक तथा उद्योजक सुहास आदमाने म्हणाले, पर्यटन कोणत्याही ठिकाणी असो, सहकुटुंब पर्यटनातून सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यातून नात्यातील गोडवा अधिक वाढतो.

कोरोना महामारीपूर्वी आम्ही तीन महिन्यांतून एकदा परदेशात पर्यटनासाठी जात होतो. कोरोना महामारीमुळे परदेशी पर्यटनावर बंधने आली. आता सहा महिन्यांतून एकदा जातो. जवळपास १८ देश आम्ही पाहिले आहेत. सोलापुरातील साधारणतः एक हजार जण परदेशात पर्यटनासाठी जातात. परदेशातील पर्यटनातून तेथील शिस्त, जीवनशैली, खाद्यसंस्कृती शिकायला मिळते.

- सुहास आदमाने, उद्योजक

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यावर्षीही २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन इंडोनेशियातील बाली येथे साजरा करणार आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या संकल्पनेनुसार आपण पर्यटन कसे करतो, याचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. जागतिक पर्यटन दिन हा भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो.

- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ