esakal | गुड न्यूज ! यवतमाळचे तिन्ही रुग्ण झाले बरे
sakal

बोलून बातमी शोधा

गुड न्यूज ! यवतमाळचे तिन्ही रुग्ण झाले बरे
  • यवतमाळचे तिन्ही रुग्ण झाले बरे : 15 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना दिला डिस्चार्ज
  • पोखरापूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील डॉ. अच्युत नरुटे यांचे अथक परिश्रम
  • स्वाईन फ्यू अन्‌ मलेरियावरील औषधांचा कोरोना रुग्णांसाठी यशस्वी वापर
  • कोरोनाबाधित रुग्णांच्या घशातील लाळ तर नाकातील एक नमुना पाठविला जातो पडताळणीसाठी
  • रुग्णांची दिवसातून चारवेळा तपासणी तर रुग्णांवर 24 तास डॉक्‍टरांची नजर

गुड न्यूज ! यवतमाळचे तिन्ही रुग्ण झाले बरे

sakal_logo
By
तात्या लांडगे
सोलापूर : परदेशातून यवतमाळ येथे आलेल्या 14 पैकी तीन रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. तिन्ही रुग्णांची पहिली टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्यावर 10 डॉक्‍टरांच्या पथकाने उपचार सुरु केले. आता तिन्ही रुग्ण बरे झाले असून त्यांना 14 दिवसांसाठी घरी थांबण्याच्या सूचना केल्या असून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे. या पथकात पोखरापूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील डॉ. अच्युत भास्कर नरुटे यांचा समावेश आहे.केंद्र व राज्य सरकारने केलेल्या लॉकडाउनमुळे आता कोरोना या विषाणूच्या संक्रमणाची साखळी खंडीत होऊ लागली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यांना बरे करण्यासाठी एमडी मेडिसिन करणाऱ्या डॉक्‍टरांसह तज्ज्ञ डॉक्‍टर अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नातून कोरोनाबाधित रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. चीन, अमेरिकेसह युरोपियन देश आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याबाबत पोखरापुरचे (ता. मोहोळ) असलेले डॉ. नरुटे हे यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांनी सकाळशी बोलताना अनुभव सांगितले.
कोरोनाबाधितांकडून घेतले जाते प्रतिज्ञापत्र
देशातील डॉक्‍टरांच्या अथक परिश्रमातून कोरोनाबाधित रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका रुग्णाला डायबेटीस, ब्लडप्रेशर असतानाही तो बरा झाला आहे. डॉ. चंद्रशेखर दुर्वे, डॉ. बाबा येलके यांच्या नेतृत्वाखाली 10 डॉक्‍टरांच्या टीमने कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केले. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. पुढील 14 दिवस स्वत:च्या घरात कोणाच्याही संपर्कात न येता सुरक्षित राहीन, असे त्यामध्ये नमूद केले जाते. त्याच्यावर पोलिस, डॉक्‍टरांची नजर असते.अशी केली जाते कोरोनाबाधितांची तपासणी
सर्दी, ताप, खोकला, घसा दुखतो अथवा श्‍वास घ्यायला त्रास होणाऱ्या रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री पाहीली जाते. त्यानंतर त्याच्या घशातून लाळीचा नमुना तपासणीसाठी पाठविला जातो. त्याचवेळी त्याच्या नाकातूनही एक नमुना घेऊन तोही तपासणीसाठी पाठविला जातो. ते नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार रुग्णांवर उपचार केले जातात. पुढील 14 दिवसानंतर त्याचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविले जातात. दरम्यान, रुग्णाच्या नाडीचे ठोके, ब्लडप्रेशर, छातीत निमोनियाची लक्षणे आहेत का, याची वारंवार तपासणी केली जाते. 14 दिवसानंतर त्याचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर त्याला काही दिवसांत डिस्चार्ज दिला जातो. तत्पूर्वी, 24 तासांच्या अंतराने त्या रुग्णांच्या दोन तपासण्या पूर्ण केल्या जातात.


आई-वडिल दररोज दोनवेळा करतात कॉल
डॉ. अच्यूत नरुटे हे यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमडी मेडिसीन पदवीचे शिक्षण घेत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या टिममध्ये त्यांचा समावेश आहे. कोरोना हे वैश्‍विक संकट असल्याने त्याची अनेकांमध्ये भिती आहे. त्यामुळे माझे आई- वडिल दिवसांतून दोनवेळा कॉल करुन प्रकृतीची विचारपूस करतात. मात्र, कोरोनाला हद्दपार करण्यात तुझा महत्त्वाचा सहभाग असावा, अशी प्रेरणाही त्यांनी सातत्याने दिली. त्यामुळे मला या वैश्‍विक संकटाचा मुकाबला करण्याचे बळ मिळाले, असेही डॉ. नरुटे यांनी सांगितले. कोरोनावर यशस्वी उपचार होत असून त्यासाठी डॉक्‍टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची मेहनत खूप मोठी आहे. त्यामुळे हा विषाणू काही दिवसांत देशातून हद्दपार होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.
loading image
go to top