बेभरवशाची नोकरी सोडून उपळाई येथील तरुण कमावतोय गांडूळ खत निर्मितीतून महिन्याला लाखो रुपये !  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Bhange

काही असेही तरुण आहेत जे हताश न होता "लाथ मारेन तिथे पाणी काढीन' म्हणत अपार कष्ट करतात. असेच उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील एका पदवीधर तरुणाने कारखान्यावरील नोकरी परवडत नसल्याने राजीनामा देऊन शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत स्वतःचा उद्योग सुरू केला असून, सध्या महिन्याकाठी दीड लाख रुपयाहून अधिक उत्पन्न घेत आहे. महादेव अनिल भांगे असे त्या तरुणाचे नाव आहे. 

बेभरवशाची नोकरी सोडून उपळाई येथील तरुण कमावतोय गांडूळ खत निर्मितीतून महिन्याला लाखो रुपये ! 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढताना दिसत आहे. अशात पदवीचे शिक्षण पूर्ण असताना देखील शासकीय नोकरी मिळत नसल्याने नाइलाजास्तव युवक कमी पगारात कारखान्यांवर किंवा कंपनीत काम करताना दिसत आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये नोकरीबाबत नैराश्‍याचे प्रमाण वाढत आहे. परंतु, काही असेही तरुण आहेत जे हताश न होता "लाथ मारेन तिथे पाणी काढीन' म्हणत अपार कष्ट करतात. असेच उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील एका पदवीधर तरुणाने कारखान्यावरील नोकरी परवडत नसल्याने राजीनामा देऊन शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत स्वतःचा उद्योग सुरू केला असून, सध्या महिन्याकाठी दीड लाख रुपयाहून अधिक उत्पन्न घेत आहे. महादेव अनिल भांगे असे त्या तरुणाचे नाव आहे. 

महादेव भांगे यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले असून, शासकीय नोकरीची अपेक्षा न बाळगता ते कारखान्यावर महिन्याकाठी सात हजार रुपयांत नोकरी करत होते. परंतु एवढ्या रुपयांत घरचे भांडवल चालत नसल्याने त्यांनी नोकरीची अपेक्षा न करता घरच्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीत लक्ष देण्याचा विचार केला. या वेळी वडील शेतात सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत निर्मिती करत होते. त्यामुळे शेतीत चांगले उत्पन्न देखील येत होते. सध्या रासायनिक खताचा वापर वाढत असल्याने सेंद्रिय शेतीचे महत्त्व कमी होत चालले आहे. सेंद्रिय शेतीसाठी लागणारे गांडूळ खत उपलब्ध होत नाही, हे मुख्य कारण लक्षात घेऊन महादेव यांनी गांडूळ खताबाबत अधिक माहिती घेत गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभा केला. 

प्रथमतः काही महिने त्यांना यात अपेक्षित असे यश मिळाले नाही. परंतु त्यांनी जिद्द व चिकाटी सोडली नाही. प्रतिकूलतेशी कल्पकतेने दोन हात करत वर्षभरातच साध्या पद्धतीने गांडूळ खत निर्मिती करत भरारी घेतली आहे. 

गांडूळ खत निर्मितीसाठी नुसत्या शेणखताचा ते वापर करतात. लागणारे शेणखत ते परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. महादेव भांगे महिन्याकाठी चाळीस टनाहून अधिक गांडूळ खत तयार करत असून, त्याचबरोबर आधुनिक पद्धतीने व्हर्मिव्हाश काढून त्याचेही ते मागणीप्रमाणे विक्री करतात. गांडूळ खताची प्रत व निर्मितीत सातत्य असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह सांगली, मराठवाडा या भागातील शेतकरी देखील या खताची मागणी करत आहेत. ते एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गांडूळ खत प्रकल्प बनवून देतात. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत साधारणपणे 15 हजार शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय शेतीचा वापर सुरू केला आहे. यातून शेतकऱ्यांना व महादेव भांगे या दोघांनाही फायदा होत आहे. 

शेती करायची झाल्यास काय करावे, या विचारात बसलेल्या तरुणांसाठी महादेव भांगे यांनी एक आदर्श उभा केला आहे. अल्पावधीच्या काळातच त्यांच्या गांडूळ खत प्रकल्पाने उंच भरारी घेतली असून, महिन्याला ते दीड लाख रुपयाहून अधिक उत्पन्न घेत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत उपळाई बुद्रूक येथील अनेक युवक शेतकरी सध्या शेतात गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू करताना दिसत आहेत. 

सेंद्रिय शेती करण्याच्या उद्देशाने गांडूळ खत प्रकल्पाची उभारणी केली. त्यामुळे शेतीतही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू लागले. याचा प्रत्यय येऊ लागल्याने, गांडूळ खत प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावर उभारणी करून इतर बागायतदार व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना गांडूळ खत देत आहोत. यातून रोजगाराची एक संधी उपलब्ध झाली आहे. 
- महादेव भांगे, 
गांडूळ खत प्रकल्प निर्मिती प्रमुख 

संपादन : श्रीनिवास दुध्याल