तरुणांचा सोशल मीडियात #onlyMPSC चा नारा 

Youth slogan only MPSC on social media
Youth slogan only MPSC on social media

सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व परीक्षा विभागस्तरावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विविध पदांच्या भरतीसाठी खासगी एजन्सीचीही नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी याला कडाडून विरोध केला आहे. याला विरोध करण्यासाठी ट्‌विटरवर दोन दिवसांपासून #onlyMPSC हा हॅशटॅग सुरू आहे. तसेच 2 मार्च रोजी आंदोलन करण्याचा इशाराही काही संघटनांनी दिला आहे. 

महापरीक्षा पोर्टल बंद करून विभाग स्तरावर परीक्षा घेणे म्हणजे आणखी मोठ्या गैरप्रकाराला आमंत्रण देण्याचा प्रकार असल्याची भावना परीक्षार्थींमध्ये आहे. त्यामुळे मेगाभरतीत पारदर्शकपणा आणण्यासाठी सर्व विभागाच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात व भ्रष्टाचारला आळा घालण्यात यावा, परीक्षा कोणत्याही खासगी कंपनीमार्फत घेऊ नयेत, अशी परीक्षार्थींची अपेक्षा आहे. 

नोकरभरतीच्या सर्व परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून घ्याव्यात यासाठी गेल्या दोन दिवसांपासून ट्‌विटरवर #onlyMPSC हा हॅशटॅग सुरू आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून तरुणांनी विभागस्तरावर परीक्षा घेण्याचे तसेच खासगी कंपनी नियुक्ती करण्याचे धोके शासनाच्या निदर्शनाला आणून दिले आहेत. शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षा खूप वेळखाऊ आहेत, तसेच ऑनलाइन पद्धत पारर्दशक नाही. त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने एमपीएससीच्या वतीने परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. शासनाने विभागस्तरावर परीक्षा घेण्याच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. 

परिक्षार्थी, संघटना म्हणतात... 

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा घटनात्मक आयोग आहे, तसेच तो सर्व परीक्षा सक्षमपणे घ्यायला तयार आहे, सर्व विद्यार्थ्यांचाही एमपीएससीवर विश्‍वास आहे, राजकीय नेत्यांचीही हीच मागणी आहे, तरीही सरकारला याबाबत निर्णय घ्यायला काय अडचण आहे? असा सवाल परिक्षार्थी व संघटना विचारत आहेत. 
  • विभागीयस्तरावर परीक्षा घेतल्या गेल्यास राज्यभर घोटाळा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सुशिक्षित तरुणांना जर न्याय मिळत नसेल तर तुम्ही महाराजांचा कसला आदर्श घेताय, सर्व गोष्टी माहीत आहेत, ऑनलाइन परीक्षा घेतली की घोटाळे होतात म्हणून एमपीएससीतर्फे परीक्षा घ्याव्यात. 
  • आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून गट - क आणि ड सरळसेवा भरती ही एमपीएससीकडे द्यावी. कोणत्याही खासगी कंपनीवर आमचा विश्‍वास नाही. 
  • गोरगरीब मुलांसाठी सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घ्याव्यात. आमचा एमपीएससीवर विश्‍वास आहे, एमपीएससीकडे परीक्षा दिल्यास विरोधकांना मुद्दा राहणार नाही. आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळेल. याबद्दल महाराष्ट्रातील तमाम युवक सरकारचा ऋणी राहील. 

आंदोलनाचा इशारा 
महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व परीक्षा विभागस्तरावर घेण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा आहे. नोकरभरतीच्या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात याव्यात अन्यथा 2 मार्च रोजी पुणे येथे उपोषण करण्याचा इशारा एमपीएससी स्टुडंट राईट आणि एमपीएससी समन्वय समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या संघटनांच्या माध्यमातून या प्रश्‍नाला वाचा फोडण्यासाठी 24 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत सोशल मीडियात #onlyMPSC हा हॅशटॅग चालविण्यात येणार आहे, याची दखल न घेतल्यास दोन मार्च रोजी आंदोलन करणार असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. याबाबतचे एक पत्रही या संघटनांनी सोशल मीडियात प्रसिद्ध केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com