esakal | नवस फेडायला सायब राजकीय पक्ष कार्यालयात !
sakal

बोलून बातमी शोधा

नवस फेडायला सायब राजकीय पक्ष कार्यालयात!

सर्वसाधारणपणे राजकीय नेत्यांचं, लोकप्रतिनिधींचं इतकंच नव्हे तर मंत्रिमहोदयांसाठी एखाद्या अधिकाऱ्यानं राजकीय पक्ष कार्यालयात जाणं हे संकेताच्या दृष्टीनं लईच चुकीचं हाय.

नवस फेडायला सायब राजकीय पक्ष कार्यालयात !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सर्वसाधारणपणे राजकीय नेत्यांचं (Political Leaders), लोकप्रतिनिधींचं इतकंच नव्हे तर मंत्रिमहोदयांसाठी एखाद्या अधिकाऱ्यानं राजकीय पक्ष कार्यालयात जाणं हे संकेताच्या दृष्टीनं लईच चुकीचं हाय... जरी हे लोकप्रतिनिधी असले तरी राजकीय कार्यालयाचा उंबरठा ओलांडणं सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी समाजाच्या दृष्टीनं हितावह नसतंया.. ह्यो इषय निघाला त्ये मामाचं स्वागत करायला गेलेल्या जिल्हा परिषदेच्या "त्या' तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसदर्भात..!

हेही वाचा: मुलगी झाल्याने घडविला कोरोनाबाधित पत्नीचा मृत्यू!

आमदार मामा काही ना काही कामानिमित्त नेहमीच सोलापुरात येत असत्यात... त्ये काय लोकांना नवं नाय... तरी पतुर यायेळी लईच येगळं वाटलं... मामा आलं अन्‌ राष्ट्रवादीच्या कार्यालयात म्हंजी कार्याध्यक्ष भाऊच्या संपर्क कार्यालयात बसलं... तवा जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी तिथं मामाचं स्वागत करायला बुके घेऊन गेले हुते... ज्ये अधिकारी गेले हुते त्यांची बदली मामाच्या शिफारशीनं झाल्याचं त्याचयेळी जगजाहीर झालं... नायतर तसं फारसं कुणाला समजलं नसतं... त्यात महसूल परशासनातलं अधिकारी लईच हुशार निघालं... त्येंच्यामधल्या अधिकाऱ्यांचीबी बदली मामांच्या शिफारशीनंच झाली हाय... तरीही मामा कलेक्‍टर हाफिसला आल्यावर त्येंनी तिथं बुके देऊन स्वागत केलं...

सोलापूर जिल्ह्यात सध्या मामाची चलती हाय... हे सांगणं काय नवं नाय... शहरातबी मामा आता घुसू लागलंया... महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हळूहळू काम सुरु केलंया... मंत्रालय पातळीवर मतदारसंघाबरुबर ग्रामीण भागातील कामं मामाकडून लई फास्ट हुत्यात असं सगळ्यांना समजलं हाय... म्हनूनशान सगळेच मामाचा निमगावमधल्या बंगल्याचा उंबरठा झिजवू लागल्यात... ज्यांचा मंत्रालयात वट्ट त्येंच्या मागं अधिकारी मंडळी असत्यात... वाऱ्याची दिशा त्ये वळकतात...(हे त्रिकालाबाधीत सत्य).

हेही वाचा: किडनी देण्याचे आमिष; एक लाख 70 हजार रुपयांचा गंडा! मेव्हण्यासह दोघांवर गुन्हा

सोलापूर जिल्हा परिषदेत मामाकडनं शिफारस मिळवून बदलून आलेल्यांना त्ये सोलापुरात आल्याचं समजलं... अन्‌ त्येंनी थेट भाऊचं कार्यालय म्हंजी राष्ट्रवादीचंच संपर्क कार्यालय गाठलं... मामांचं भलामोठ्ठा बुके देऊन तिगांनीबी (येगयेगळं) स्वागत केलं... सोलापुरात पोस्टींग मिळण्यासाठी केलेला नवस फेडण्यासाठी राजकीय कार्यालयात जाणं चुकीचंच हाय... कारण राजकीय पक्षाला पूरक भूमिका घेणारे अधिकारी असा शिक्कामोर्तब हुतोया... राजकीय कार्यालयात गेल्यानं संकेत पायदळी तुडवलं जातंया हे या तिगास्नी समजलंच कसं नाय... आमदार, खासदारांच्या कार्यालयात जायला कायबी अडचण नाय... पन्‌ ह्ये राजकीय कार्यालयात हजेरी लावण्यानं चर्चेला लईच उधाण आलंया...

बरं, या सायबांना बोलावून घेत त्येंच्याकडून बुके घेणं अन्‌ त्येंचे फोटू काढून सोशल मीडियावर पसरवण्याचं उद्योगबी करण्यात आलं.... ह्याच्यामागं कार्यकर्त्याचा हात हाय का मामांचं गणित येगळं हाय हे मात्र समजलं नाय. राष्ट्रवादीच्या फेसबुक पेजवरबी तिघांनी मामांचे स्वागत करतानाचे फोटू झळकू लागल्याती... तरीबी सरकारी अधिकाऱ्यांनी आपली मर्यादा ओलांडू नये... नायतर ह्ये मामाचं माणूस... ह्ये राष्ट्रवादीचं कार्यकर्ता अशीच त्येंची वळख होण्यास येळ लागणार नाय...!

- थोरले आबासाहेब

loading image
go to top