संभाजी पवारांवर "तो' अन्याय नव्हता का? समर्थकांचा भाजपला सवाल

SAMBHAJI PAWAR
SAMBHAJI PAWAR
Updated on: 

सांगली ः विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमधील निष्ठावंत गटाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता माजी आमदार, ज्येष्ठ भाजप नेते संभाजी पवार यांच्या समर्थकांना या उमेदवारीवरून भाजपला आणि पर्यायाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक गंभीर सवाल केला आहे.


संभाजी पवार यांनी 2014 च्या लोकसभेला संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आणि त्यासाठी त्यांची विधानसभेची उमेदवारी कापली गेली. त्यानंतर भाजपला पवार गटाला दूर सारले. पवार यांना हा न्याय आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल टोकाची भाषा ज्यांनी वापरली त्या पडळकर यांना उमेदवारी कशी दिली? असा सवाल केला आहे. अर्थात, पडळकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही, मात्र तत्त्वाने वागणारी भाजप असा निर्णय कशी घेत आहे. त्यात पवार यांचे झालेले राजकीय नुकसान कसे भरून काढणार? असा सवालही यानिमित्ताने करण्यात आला आहे.


संभाजी पवार हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यात भाजप रुजवली, वाढवली. सांगलीच्या राजकारणात त्यांचा प्रभाव नेहमीच लक्षवेधी राहिला आहे. त्यांनी सन 2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजपने संजयकाका पाटील यांना सांगलीची उमेदवारी दिल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पक्षाविरोधात बंडाची भूमिका घेतली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी पवार यांच्या घरी येऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. खुद्द गोपीनाथ मुंडे यांनी त्यांची भेट घेतली, मात्र संभाजी पवार भूमिकेवर ठाम राहिले. नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेला मात्र त्यांनी यायची तयारी दर्शवली होती, मात्र तोवर भाजप पुढे निघून गेली होती.


त्यानंतर पवार आणि भाजपमध्ये दरी निर्माण होत गेली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तर पवार गटाची कोंडी झाली आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत संभाजी पवार यांचे चिरंजीव पृथ्वीराज पवार यांची उमेदवारी कापली गेली. त्यावेळी एबी फॉर्मवर सही करणारे देवेंद्र फडणवीसच होते. पृथ्वीराज शिवसेनेकडून लढले आणि पराभूत झाले. आता ते परत भाजपमध्ये परतले असले तरी या गटाचे मोठे राजकीय नुकसान झाल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे.


हाच मुद्दा पकडून संभाजी पवार समर्थकांनी भाजपला काही प्रश्‍न केले आहेत. ते सोशल मिडियातून जोरदार फिरत आहेत. संभाजी पवार यांना तो न्याय योग्य होता का? तो योग्य असेल तर मग आता गोपीचंद यांच्याबाबतचा निर्णय चुकीचा आहे का? गोपीचंद यांच्याबाबतचा निणय योग्य असेल तर मग आप्पांवर अन्याय झाला, हे भाजपला मान्य आहे का? त्यांच्या राजकीय वाटचालीला त्या निर्णयाने धक्का दिला, तो आता कसा भरला जाणार, अशा अनेक प्रश्‍नांना आता तोंड फुटले आहे. दुसरीकडे भाजपच्या निष्ठावंतांनीही पडळकर यांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com