कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

- शेखर जोशी
Monday, 17 August 2020

सांगली ः जिल्ह्यात कोरोनामुळे सध्या उद्‌भवलेली परिस्थिती भयावह आहे. "मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया'' (संत तुकाराम) हा प्रशासनाचा वैद्यकीय सेवेचा अनुभव सर्व सामान्यांसकट ज्याची आर्थिक स्थिती आहे त्यालाही येतो आहे. अर्थात, हे कटू पण सत्य आहे. सत्ता कोणाची असो, विरोधक कोणही असो, हा अनुभव या घडीला मान्यच करावाच लागेल. मरणाने किती स्वस्थ व्हावे, जगण्यासाठी धडपडणाऱ्याला साधे बेड मिळू नये... गंभीर रुग्णांना घेवून किती डॉक्‍टरांच्या दारात भिक मागायची? या शोकांतिकेला शब्द उरत नाहीत, असे अनेक प्रसंग या आठवड्याभरात उद्‌भवले ते ऐकून कोणाही पाषाणहृदयी डोळ्यातही पाणी येईल. एवढी भयावह अवस्था आहे. गेल्या बारा दिवसात 2627 रुग्ण वाढले आहेत.

सांगली ः जिल्ह्यात कोरोनामुळे सध्या उद्‌भवलेली परिस्थिती भयावह आहे. "मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया'' (संत तुकाराम) हा प्रशासनाचा वैद्यकीय सेवेचा अनुभव सर्व सामान्यांसकट ज्याची आर्थिक स्थिती आहे त्यालाही येतो आहे. अर्थात, हे कटू पण सत्य आहे. सत्ता कोणाची असो, विरोधक कोणही असो, हा अनुभव या घडीला मान्यच करावाच लागेल. मरणाने किती स्वस्थ व्हावे, जगण्यासाठी धडपडणाऱ्याला साधे बेड मिळू नये... गंभीर रुग्णांना घेवून किती डॉक्‍टरांच्या दारात भिक मागायची? या शोकांतिकेला शब्द उरत नाहीत, असे अनेक प्रसंग या आठवड्याभरात उद्‌भवले ते ऐकून कोणाही पाषाणहृदयी डोळ्यातही पाणी येईल. एवढी भयावह अवस्था आहे. गेल्या बारा दिवसात 2627 रुग्ण वाढले आहेत. 
----------------- 
प्रशासन आपल्यापरीने काम करत असले तरी गोंधळ आहे, हे मान्य करावे लागते. तयारी अपूर्ण आहे, हे देखील मान्य करावे लागते. या पार्श्‍वभूमीवर खासदार संजय पाटील यांनी या कोंडीवर हल्लाबोल केला. त्यानंतर विशाल पाटील यांनी पुढाकार घेत रुग्णालय उभा करण्याचे सूतोवाच केले आणि त्यानंतर अनेकांनी रुग्णालयांच्या घोषणा केल्या, पण जनतेतून एक सवाल उठला आहे, की हे सर्व तहान लागल्यावर विहीर खोदण्यास सारखे झाले आहे. तरीसुद्धा तात्पुरती असेनात सर्व सोयीयुक्त बेड्‌स हवी आहेत. यासाठी तज्ञ डॉक्‍टर्स आणि आणि अन्य स्टाफ कुठून आणणार?, असा सवाल काही डॉक्‍टरनीच केला आहे. 

कोरोनामुळे वृद्ध रुग्ण, व्याधीग्रस्त मृत्युमुखी पडलेच, मात्र या आठवड्यात तर अत्यंत तरुण मुलं अकाली मृत्यू पडत आहेत, हे अस्वस्थ करणारे आहे. त्यांची कुटुंबे अनाथ झाली आहेत. याचे गांभीर्य प्रशासनाला असल्याचे दिसत नाही. डॉक्‍टर पेशंटला घेत नाहीत म्हणून नुसत्या नोटिसा देऊन तरी काय होणार आहे? मग डॉक्‍टर म्हणतील आमच हॉस्पिटल बंद करा. कारण या डॉक्‍टर्स म्हणणं आहे, की कोविड पेशंट हाताळण्यासाठीचे काही प्रशिक्षण लागते. ते गेल्या चार महिन्यात दिले नाही. त्यामुळे खासगी डॉक्‍टर देखील हात वर करत आहेत. गंभीर रुग्णांना हाताळण्यासाठी कोणी तयार नाही, याचं मोठं उदाहरण सुद्धा माजी महापौरांना तीन हॉस्पिटल्समध्ये घेतले नाही. 

सध्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कालच रात्री पाच रुग्णांना बेड मिळाले नाही. जिल्ह्यातील एक हॉस्पिटलमध्ये तर निरीक्षक नेमलेला नाही. लोकांनी तक्रारी कुठे करायच्या? पुन्हा बिलाची गोष्ट आहे. बिले पाहूनसुद्धा सामान्य लोकांनी हे पैसे कसे उभे करायचे, असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. महात्मा जोतिबा फुले योजना आहे, मात्र ही योजना काही ठिकाणी लागू नाही. सांगलीच्या आजच्या स्थितीला पालकमंत्र्यांनी येथे तळ ठोकून राहणे गरजेचे आहे. 

कोरोनाने खासगी यंत्रणेची हवाच काढली आहे. त्यामुळे आपण आरोग्य या विषयाकडे केलेले दुर्लक्ष महागात पडले आहे. खासगी डॉक्‍टरांनाही आता दबाव आणून रुग्ण घेण्याचा अट्टहास करतो आहे. पण त्यांचा प्रश्‍न आहे की त्यांनी नॉन कोविड रुग्णांना कोठे ठेवायचे? कोरोनाची टेस्ट करून घेणेही सोपे नाही. ती शासकीय यंत्रणेकडून करायची? कोणती करायची? रॅपीड की आणखी कुठली? खासगी टेस्टला काही अर्थ आहे का? प्रश्‍न अन्‌ प्रश्‍नच. 

गेले पाच महिने यंत्रणा या भूताशी लढत आहे. एवढे दिवस रुग्णसंख्या खूप आटोक्‍यात होती. ती आता झपाट्याने वाढतेय. महापालिका क्षेत्रात वेग प्रचंड आहे. इस्लामपूर किंवा सांगली पॅटर्नच्या नावे प्रशासनाने पाठ थोपटून घेतली. इस्लामपूरचे संकट मोठे होते, ते हाताळण्यासाठी स्पेशल टिम पाचारण करण्यात आली. त्या टिमनेही या सर्व रुग्णांना बरे केले. ती निघून गेली. संकट कायम आहे, पुढे काय? आता आव्हान बेडची संख्या वाढवणे, ऑक्‍सिजन पुरवठा वाढवणे, व्हेटिलेटर उपलब्ध करण्याचे आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 900 बेड आहेत. पण गेल्या पंधरा दिवसात रुग्णांना बेडच मिळत नाहीत. एकट्या महापालिका क्षेत्रात साडेतीन हजार पॉझिटिव्ह रुग्ण आणि बेड मात्र कमी आहेत. एक रुग्ण ऍडमिड झाला तर किमान दहा दिवस तो तेथे राहतो. रोज तीनशे रुग्ण वाढत आहेत, 100 खाटांचे रुग्णालय कुठे पुरायचे? आता रुग्णांसाठी 100 पासून 400 बेड पर्यंत हॉस्पिटल उभारण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. खूप वेळ झालाय. यापूर्वीच हॉस्पिटल उभा करायला हवी होती. 

पहिली घोषणा विशाल पाटील यांनी केली. त्यानंतर महापालिका आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी 200 बेड करणार, अशी घोषणा केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी 15 ऑगस्ट च्या मुहूर्तावर चारशे बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्यात घोषणा केली. कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी सिव्हिल मध्येच आणखी 50 बेड वाढून घेतले. या सर्वांची बेरीज केली तर सातशे बेड तयार होतील. त्याला काळ जाईल. त्याआधी प्रश्‍न आहे, तेवढे डॉक्‍टर आणि नर्सेस आहे का? व्हेंटिलेटर फक्त 60 आहेत. त्याचे काय? ऑक्‍सिजन नेमकी गरज किती लागणार आहे, या सगळ्या बाबतीत एक एक गांभीर्य सरकारला हवे, ते कुठेही दिसत नाही. मध्यंतरी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात तळ ठोकून राहावे, असा सल्ला दिला होता. राजकीय टीकाटिप्पणी बाजूला ठेवली तरी जनतेला असे वाटते की, जयंत पाटील एफ अनुभवी मंत्री आहेत आणि त्यांना जिल्ह्याकडे जिल्ह्यात लक्ष घालण्यासाठी सांगण्याची गरज नाही. 

सांगली मिरजेतील आयएमएच्या नोंदीनुसार 800 डॉक्‍टर आहेत. एमबीबीएस सुमारे आठशे डॉक्‍टर महापालिका क्षेत्रातच आहेत. इस्लामपूर, विटा, तासगाव येथील वैद्यकीय शक्तीचाही विचार आणि वापर करता येईल. चारशे-पाचशे बेडची हॉस्पिटल उभा करता येतील, पण या ठिकाणी लागणारा स्टाफ महत्वाचा आहे. अंदाजे वीस बेडमागे एक एमडी डॉक्‍टर तसेच चार नर्सेस आणि अन्य कर्मचारी लागतात. याशिवाय अतिदक्षता विभागासाठी तज्ञ लागतात. बेड वाढवून लोक जातील? ही वेळ राजकारणाची नसली तरी अप्रत्यक्ष राजकारण सुरू आहे. यातून जनतेला उपयोग होईल अशी यंत्रणा उभी राहावी ही सांगलीकरांची अपेक्षा आहे 

महापालिकेला गांभीर्य नाही... 
महापालिकेत अनेकांच्या सत्ता आल्या, गेल्या. अनेक आयुक्त आले गेले. एक गोष्टीची कमतरता या महापालिकेत कायमची आहे ती म्हणजे गांभीर्य नसणे... आता एवढे लोक मरत असताना, रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही, कोरोनाशी मोठी लढाई करावी लागत असताना महापालिकेने वादग्रस्त कचरा प्रकल्पाची निविदा या काळातच काढली? त्यात इंटरेस्ट कोणाचे? महापालिकेची सध्याची प्रायॉरिटी काय? संपूर्ण जिल्ह्यात महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण आहेत आणि याच ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्ण सापडला की त्याठिकाणी पत्रे मात्र तातडीने मारले जातात. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर दरवर्षी 25 ते 30 कोटी रुपये खर्च होतात तरीसुद्धा या महापालिकेला गेल्या चार वर्षात पूर्णवेळ अधिकारी मिळत नाही. आहेत त्यांची पात्रता काय? मनपाचे स्वतःचे रुग्णालय नाही, त्याचे राहिले बाजूला, ह्यांना कचऱ्याचे टेंडरच कशाला हवे आहे? 

संपादन ः अमोल गुरव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Someone's burden on someone's shoulders