मुलगा आणि आई एकाच वर्षी झाले दहावीची परीक्षा उत्तीर्ण

शिवाजी चौगुले
Tuesday, 4 August 2020

शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथील मंगल महादेव मोरे यांनी 38 व्या वर्षी दहावीची परीक्षा बहिस्त विद्यार्थी म्हणून देत 63 टक्के गुणांसह उत्तीर्ण होऊन सिद्ध केले.

शिराळा : मनात आणलं तर आकाशाला गवसणी घालू शकतो.. हे शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथील मंगल महादेव मोरे यांनी 38 व्या वर्षी दहावीची परीक्षा बहिस्त विद्यार्थी म्हणून देत 63 टक्के गुणांसह उत्तीर्ण होऊन सिद्ध केले. विशेष म्हणजे, मुलगा व आई एकाच वर्षी दहावी उत्तीर्ण झाले. 

शिराळे खुर्द येथील महादेव मोरे पत्नी व मुलांसह मुंबई येथे राहतात. लॉकडाउनमुळे ते गावीच आहेत. महादेव मोरे यांच्या पत्नी मंगल (पूर्वीचे नाव मंगल शामराव चोपडे) यांचे माहेर इंगरुळ. त्या शिवशंकर विद्यालयातून सन 1998 मध्ये आठवी उत्तीर्ण झाल्या. अडचणीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. शिराळे खुर्द येथील महादेव मोरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दोन मुले झाली, नोकरीनिमित्त कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. 

दरम्यान, मंगल यांनी शिवण क्‍लास केला. कुर्ला येथील प्रथम लर्निंग लॅब क्‍लासमध्ये शिक्षण घेतले. मुलगा ऋषिकेशही यावर्षी दहावीला गेला. त्याचा अभ्यास घेता घेता आपणही मुलाबरोबर दहावीची परीक्षा बहिस्त विद्यार्थी म्हणून द्यावी, असे त्यांच्या मनाने ठरवले. 

38 व्या वर्षी त्यांनी दहावीची परीक्षा बहिस्त विद्यार्थी म्हणून फॉर्म भरून शिक्षणाचा पुन्हा श्रीगणेशा केला. मायलेकरांनी एकत्र अभ्यास सुरु केला. मंगल यांना पती महादेव व मैत्रिणींनी प्रोत्साहन दिले. यशाला गवसणी घालत त्या दहावीची परीक्षा 63 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाल्या. मुलगा ऋतुराजने सेमी इंग्रजी माध्यमातून नियमित दहावीची परीक्षा दिली. त्याला 70.40 टक्के गुण मिळाले. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The son and mother passed the matriculation examination