बापाच्या खूनप्रकरणी मुलाला जन्मठेप; चिकुर्डेतील घटना

पोपट पाटील
Wednesday, 30 December 2020

दारूच्या व्यसनापोटी स्वतःच्याच वडिलांचा खून करणाऱ्या लक्ष्मण हरी पाटील-वाघमारे (वय 30, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) याला आज येथील जिल्हा सत्र न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

इस्लामपूर (जि. सांगली) : दारूच्या व्यसनापोटी स्वतःच्याच वडिलांचा खून करणाऱ्या लक्ष्मण हरी पाटील-वाघमारे (वय 30, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) याला आज येथील जिल्हा सत्र न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी ही शिक्षा सुनावली. लक्ष्मण याने त्याचे वडील हरी कोंडिबा पाटील यांचा जुलै 2019 मध्ये खून केला होता. कुरळप पोलिस ठाण्यात घटनेची नोंद होती. पोलिसपाटील सुधीर विजय कांबळे यांनी फिर्याद दिली होती.

लक्ष्मणला दारूचे व्यसन होते. या त्रासामुळे त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती. 19 जुलै 2019 रोजी सकाळी सात वाजता लक्ष्मण याने म्हैस विकून मिळालेल्या पैशांतील दोन हजार रुपये देण्याची मागणी आईकडे केली. तागाबाई पाटील यांनी त्याला विरोध केला. त्यावर लक्ष्मण त्यांना धमकावत निघून गेला. तू पैसे दिले नाहीस, तर तुझे आणि पप्पाचे काही खरे नाही, असे त्याने धमकावले होते.

यानंतर सकाळी 10 वाजता त्याची आई शेतात गेली. त्यावेळी लक्ष्मण मागे आला व आईने पैसे न दिल्याचा राग मनात धरून घरात झोपलेल्या वडिलांना लाकडी दांडका व छत्रीने डोक्‍यात तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्यांचे वय 81 वर्षे होते. 

याप्रकरणी लक्ष्मण हरी पाटील याच्यावर कुरळप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात सरकारी वकील विजय कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. तपासी अंमलदार विनय काटे व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे यांनी तपास केला. तपासात संदीप पाटील, शरद पाटील यांनी मदत केली. 

संपादन : युवराज  यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son sentenced to life imprisonment for father's murder; Incidents in Chikurde