शंभरीतील सोनाबाईंचे आवाहन बाळांनाे नेहमी मतदान करा हं

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

सातारा जिल्ह्यातील विधानसभा निहाय झालेल्या मतदानाची स्थिती.
सातारा 34.90 टक्के, फलटण - 35.40 , कराड दक्षिण - 36.20, कराड उत्तर 29.38, काेरेगाव 35.85, वाई - 26.70 , फलटण 32.25, माण - 29.05

कऱ्हाड : वडगाव हवेलीमधील शंभरीतील सोनाबाई कुंभार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या म्हणाल्या बाळांनाे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. ते आपले कर्तव्य आहे. सातारा जिल्ह्यात रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस होता. त्याचा परिणाम मतदानावर होईल अशी भिती कार्यकर्त्यांमध्ये होती. परंतु आज पावसाने उघडीप दिल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.

कऱ्हाड, सातारासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍यांत सकाळी ढगाळ वातावरण तर दुपारी बारा नंतर स्वच्छ निरभ्र आणि उन्हाच्या वातावरणाने मतदानास गती आली होती. सकाळी धिम्या गतीने सुरू असलेले मतदान दुपारनंतर मात्र गतीने सुरू होते. तिन्ही नेत्यांचे गट त्यांच्या परीने लोकांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. कार्यकर्त्यांकडून मतदारांसाठी रिक्षा, वडाप जीप, दुचाकी गरज पडली तर मिनी बसची सोय करण्यात आली होती. यामध्ये शंभर मीटर अंतराचे पालन केले जात नव्हते असे चित्र होते.
 
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात तितक्‍याच चुरशीने मतदान होत आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसाने आज उघडीप दिली. त्यामुळे तालुक्‍यात मतदानाला उत्साहात लोक बाहेर पडत होते. काले, ओंड, उंडाळे, घोगाव, विंगसह मलकापूर, आगाशिवनगर, वडगाव हवेली भागात मतदानास रांगा लागल्या होत्या. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होता.एका मतदान केंद्रावर एक अधिकारी, तीन पोलिस व एक होमगार्ड बंदोबस्तास तैनात केला होता. सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र दुपारी बारानंतर उन्ह पडल्याने लोकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. ज्येष्ठ मतदारांनाही मताचा अधिकार बजावण्यासाठी आणले जात होते. वडगाव हवेली येथे शंभरीतील सोनाबाई कुंभार यांनाही रिक्षातून आणण्यात आले. त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मतदान केलेच पाहिजे असे त्यांनी नमूद केले. वडागव हवेलीतील गावातील एकाच ठिकाणी चार मतदान केंद्र आहेत. तेथे गर्दी होती.

कापील गोळेश्वर व कार्व भागातही लोकांची गर्दी होती. कऱ्हाड शहरात 61 मतदान केंद्रावर लोकांची गर्दी होती. शाळा क्रमांक तीनमध्ये लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण तर मंगळवार पेठेत आमदार बाळासाहेब पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. नगरसेवक, स्थानिक नेते यांची मतदारांना बाहेर काढण्यासठी धावपळ सुरू होती. बाहेर गावातील मतदारांना आणण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली होती. 

पाटण विधानसभा मतदारसंघात मतदानास उत्साह 

पाटण : रविवारी दिवसभर पावसाने झोडपलेल्या पाटण तालुक्‍यात रात्रीपासून पावसाने घेतलेले विश्रांती व सकाळ पासून पूर्ण उघडिप घेतल्यामुळे दुपारनंतर पाटण विधानसभा मतदारक्षेत्रात मतदानासाठी उत्साह होता. सकाळी दहा पर्यंत मतदानाचा वेग कमी होता मात्र दहा नंतर मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडल्याने मतदान केद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या.
 
रविवारी दिवसभर मतदारांना घेऊन मुंबई पूण्यातील वाहने तालुक्‍यांत दाखल झाली होती. आज (सोमवार) सकाळपासून परगावाहून येणाऱ्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत होत्या. दुपारी एक वाजेपर्यंत मुंबईचा मतदार पाटणकडे रवाना होत होता. घरातील व शेतीची कामे आवरल्यानंतर महिला मतदार मतदानासाठी बाहेर पडल्या. पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजवणार्या युवा वर्गाने सकाळी लवकरचं मतदान केंद्रांवरती हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला.
 
आमदार शंभूराज देसाई यांनी मरळी येथे तर सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण येथे मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सकाळ पासून आमदार शंभूराज देसाई पाटण शहरातील मतदान केंद्रावरती तर सत्यजितसिंह पाटणकर नाटोशी जिल्हा परिषद गटात ठाण मांडूण होते. सत्यजितसिंह पाटणकर यांनी मरळी मतदार केंद्रावरती काही काळ घालवला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonbai's appeal for youngsters always vote