दक्षिण भारत जैन सभा उभारणार 40 बेडचे कोविड सेंटर

बलराज पवार 
Tuesday, 8 September 2020

कोविड रुग्णांसाठी दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने चोपडे मेमोरियल हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे कोविड सेंटर सुमारे 50 लाख खर्चाचे व 40 बेडचे असेल.

सांगली : कोविड रुग्णांसाठी दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने चोपडे मेमोरियल हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे कोविड सेंटर सुमारे 50 लाख खर्चाचे व 40 बेडचे असेल. तेथे रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती चेअरमन रावसाहेब जिनगोंड पाटील यांनी दिली. 

दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकाऱ्यांची बैठक चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जैन बोर्डिंगमध्ये झाली. ते म्हणाले, ""दक्षिण भारत जैन सभेने वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपत समाजावर आलेल्या संकटात लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे. आज कोविड संसर्गाची तीव्रता वाढत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी बेड शिल्लक नाहीत. अशावेळी रुग्णांच्या सेवेसाठी हे कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.'' 

रविंद्र माणगावे म्हणाले, दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था, ट्रस्ट यांच्या माध्यमातून कोविड सेंटरसाठी निधी उभा करण्यात येणार आहे. जैन व जैनेतर समाजातील दानशूर मंडळींनी या मानवतावादी कार्यास मदत करावी. या आर्थिक मदतीतून आवश्‍यक ती मशिनरी व औषधासाठी खर्च करण्यात येणार आहे. चोपडे मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष चोपडे यांनी हे कोविड सेंटर सुरू करण्यास व आवश्‍यक तो स्टाफ व कर्मचारी उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली. कोविड सेंटरच्या व्यवस्थापनासाठी सहकार्य करण्याची तयारी डॉ. देवपाल बरगाले यांनी दर्शवली. 

या सेंटरसाठी आजच्या बैठकीतच 18 लाखांची देणगी स्वीकृत झाली. दक्षिण भारत जैन सभेच्या कर्मवीर आरोग्य अभियानकडून पाच लाख तसेच कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेकडून व्हेंटीलेटरसाठी पाच लाखाची देणगी देण्यात आली. याबरोबरच बाबासाहेब कुचनुरे पतसंस्थेकडून सहा ऑक्‍सीजन मशीनसाठी तीन लाख रुपये अशी देणगी मिळाली. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South India Jain Sabha to set up 40-bed Kovid Center