सातबाऱ्यावर नोंद नाही, मग सोयाबीनची विक्री कशी करायची?

विष्णू मोहिते 
Wednesday, 7 October 2020

राज्य सरकारने हमाभावाने सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र बागायती पट्ट्यात ऊसासह काही पिकांत आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतले जाते.

सांगली : राज्य सरकारने हमाभावाने सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र बागायती पट्ट्यात ऊसासह काही पिकांत आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतले जाते. ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर त्या पिकाची नोंद नाही. त्यामुळे सोयाबिनची हमी भावाने विक्री कशी करायची असा प्रश्‍न जिल्ह्यात निर्माण झाला आहे. 

सरकारने हमी भाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी पिकाची नोंद असलेल्या सातबारा उताऱ्याची अट घातली आहे. मात्र मुख्य पिकांत आंतरपीक घेतल्यास त्याची ऑनलाइन सातबाऱ्यावर नोंद करण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा पिकांची नोंद करता येत नाही. केवळ मुख्य पिकांचीच नोंद केली जाते. त्यामुळे सोयाबीन हमीभावाने विकण्यात अडचण येत आहे. 

हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र त्या पिकांची नोंद असलेला सातबारा असणे आवश्‍यक आहे. तसा नियम शेतकऱ्याला अडचणीचा ठरत आहे. जून, जुलै महिन्यात आडसाली उसाची लागण व सोयाबीनची पेरणी केली जाते. सातबारावर पिकांची नोंद करण्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरवात होते. पिक नोंदीसाठी आजही शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय गाठावे लागते. हस्तलिखत सातबारा बंद आहेत. सातबारा ऑनलाइन पध्दतीने सुरु केलेत. ऑनलाइनवर पिकांची नोंद असेल, तरच सातबारा उपयोगी ठरतो. 

ऑनलाइन उताऱ्यावर एकच पीक नोंदवले जाऊ शकते. दुबार पीक तसेच मुख्य पिकातील आंतरपीक नोंदवण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. आंतरपीकाच्या नोंदीसाठी एक एकरपैकी ऊस व सोयाबीन अर्धा अर्धा एकर अशी नोंद करावी लागणार आहे. शेतकऱ्यांने एकर उसाची लागवड केली, तर सातबारावर अर्धा एकराचीच नोंद होणार. शेतीसाठी कर्ज हवे असल्यास पिकाचे क्षेत्र कमी आहे, असे कारण पुढे देऊन कर्ज देण्यास बॅंका टाळाटाळ करणार हे स्पष्ट आहे. 

कार्यालयातच बसून नोंद 
ऑगस्ट महिन्यापासून पिकाची नोंद करण्यास सुरवात होते. तलाठ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नोंद करावी, असा नियम आहे. मात्र तलाठी शेतात जात नाहीत. शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतलीत, याची माहिती अंदाज घेऊन कार्यालयातच बसून पिकाची नोंद केली जाते. त्यामुळे सातबारावर किती टक्के पिकांची नोंद खरी असते, असाही प्रश्न आहे.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybeans are not listed on Satbari, so how to sell?