
विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसला मिळालेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत कॉंग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
सांगली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना जी चर्चा झाली, त्यानुसार विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसला मिळालेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही कुणाचे यावर काही म्हणणे असेल, तर कॉंग्रेसचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी निश्चित ऐकून घेतील असे मत कॉंग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
सांगलीत आज गॅस, डिझेल आणि पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनात मंत्री डॉ. विश्वजित कदम सहभागी झाले होते. आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना, विधानसभेचे अध्यक्ष कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता विधानसभा अध्यक्षपद खुले झाल्याची टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली होती.
या पदावर शिवसेनेच्या आमदाराची वर्णी लागेल अशीही चर्चा सुरू आहे, यावर कॉंग्रेस नेते मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
त्यामुळे अध्यक्षपद रिकामे असले, तरी महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना आणि सरकार स्थापन होताना हे पद कॉंग्रेसला मिळालेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, निश्चित स्वरूपात याबद्दल कुणाचे काही म्हणणे असेल, तर आमचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी त्यांचे म्हणणे ऐकून घेतील.
संपादन : युवराज यादव