सांगलीत गावगाडा सांभाळण्यासाठी 'महाआघाडी'चे बळ ; भाजपचा प्रभाव कायम

विष्णू मोहिते
Wednesday, 20 January 2021

भाजपकडे विधानपरिषदेचे दोन आणि विधानपरिषदेवर दोन आमदार आहेत

सांगली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन वर्षाचा कालावधी लोटला. जिल्ह्यात महाविकास आघाडीचे आठ आमदार आहेत, तरीही जिल्ह्यात 152 मिनी मंत्रालयाच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रभाव कमी झालेला नाही, हे निकालावरून स्पष्ट झाले. राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेसचे विधानसभेवर सहा, तर विधान परिषदेचे दोन असे आठ आमदार आहेत. अद्यापही महाआघाडीला काम करण्याची मोठी संधी आहे. भाजपकडे विधानपरिषदेचे दोन आणि विधानपरिषदेवर दोन आमदार आहेत, तरीही ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले यश घवघवीत नसले तरी चांगली परस्थिती आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक 34 ग्रामपंचायती झेंडा फडकवला आहे. कॉंग्रेस 33, राष्ट्रवादी 29, शिवसेना 17 तर इतर स्थानिक आघाड्यांनी 39 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीकडे एकत्रित 79 ग्रामपंचायतींत सत्ता आहे. आता गावगाडा चालवणाऱ्यांकडून विकासकामांसाठी पाठपुरावा महत्त्वाचा ठरेल. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील त्यांच्यासह आमदार सुमन पाटील, आमदार मानसिंगराव नाईक व विधानपरिषदेवर आमदार अरुणआण्णा लाड सध्या आहेत, तरीही राष्ट्रवादीला 29 ग्रामपंचायतींवर यश हा आकडा काहीसा वाढण्याची गरज आहे.

हेही वाचा - फायर ऑडिटमध्ये सांगली, मिरज सिव्हिल फेल -

कॉंग्रेसचे मंत्री डॉ. विश्‍वजित कदम, आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रमसिंह सावंत अशी संख्या असतानाही पलूस, कडेगाव व जतमध्ये चांगले यश मिळाले. मिरज तालुक्‍यात अद्यापही कॉंग्रेसला ताकद मिळू शकलेली नाही. 
भाजपचे विधानसभेवर सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, विधानपरिषदेवर सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर चार आमदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी 34 ग्रामपंचायतींवर स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यात कडेगाव-पलूस तालुक्‍यात यंदा बरीच ताकद घटली अन्यथा पक्षाला आणखी उभारी घेता आली असती. 

ग्रामपंचायत निवडणूक निकालात महाविकास आघाडीने एकतर्फी वर्चस्व मिळविल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असले, तरी काही गावांत ते आमने-सामने उभे होते. मोजक्‍याच गावात निवडणूक पूर्व युती जाहीर केलेली होती, तरीही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राज्यातील सत्ता गेल्यानंतरही मिरज, जत, तासगाव तालुक्‍यात प्रभाव कमी झालेला नाही. केंद्रातील भाजप सत्तेत असल्याचा फायदा आजही होत आहे. कडेगाव, पलूसने साथ दिली असती तरी आणखी बळ वाढले असते. शिवसेनेचे एकमेव आमदार अनिल बाबर यांनी मतदारसंघात ताकद कायम आहे. 

पलूस व कडेगाव तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस नेते व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी एकहाती वर्चस्व निर्माण केले. पलूसमधील 14 पैकी 11 ठिकाणी कॉंग्रेसने, तर तीन ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ता मिळवली. कडेगाव तालुक्‍यातील नऊच्या नऊ ग्रामपंचायती कॉंग्रेसने राखल्या. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यात भाजपचे खासदार संजय पाटील, राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांच्यात यांच्यात काट्याची लढत झाली. तासगावात 39 पैकी 17 राष्ट्रवादीला, भाजपला 12, तर अन्य आघाड्यांना 10 ठिकाणी सत्ता मिळाली. कवठेमहांकाळच्या 11 पैकी राष्ट्रवादीला 6, भाजप 2 आणि शिवसेना 2 आणि इतर आघाडीला एका ग्रामपंचायतीवर सत्ता मिळाली. 

हेही वाचा -  गाव जिंकलं, आता सरपंच कुणाचा?; 29 जानेवारीला होणार सोडत -

जत तालुक्‍यातील 30 पैकी कॉंग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना 11, माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील भाजपला 9 आणि इतर आघाड्यांना 10 ठिकाणी सत्ता मिळाली. मोठी गावे मात्र भाजपच्या ताब्यात आहेत. खानापूर, आटपाडी तालुक्‍यात शिवेसेना आमदार अनिल बाबर यांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले. खानापूमधील 13 पैकी 8 सेनेला, तर राष्ट्रवादी 3 व कॉंग्रेसला एका ठिकाणी सत्ता मिळाली. आटपाडीत 10 पैकी 6 शिवसेना, 2 भाजप आणि इतर आघाड्यांना 2 ठिकाणी सत्ता मिळाली. मिरजेतील 22 पैकी 9 ठिकाणी भाजप, स्थानिक आघाड्या 10, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका ग्रामपंचायतीत सत्ता मिळवता आली. 

वित्त आयोग आणि गावगाडा... 

पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना निधी मिळत आहे. शिवाय अन्य योजनांतून निधी आणूण गावगाडा ओढण्याचे आव्हान नव्या कारभाऱ्यांपुढे असेल. ज्या-त्या तालुक्‍यातील लोकप्रतिनिधी आमदारांनी आपापले गड राखण्याच्या प्रयत्नांना यश आले, मात्र गावातील कारभाऱ्यांपुढे आता विकासाचे आव्हान आहे. त्यामुळे उपलब्ध निधी आणि शासनाच्या माध्यमातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. झेडपी, पंचायत समिती, राज्य सरकारकडून विकासकामांसाठी ग्रामपंचायतींना मोठा निधी मिळत असल्याने गावे आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special article of vishnu mohite on the grampanyat election analysis in sangli