शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डसाठी सांगलीत विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

सांगली ः केंद्र शासनाने पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची मोहिम सुरू केली आहे.

सांगली ः केंद्र शासनाने पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची मोहिम सुरू केली आहे.

किसान क्रेडीट कार्ड सुविधेची उपयुक्तता व शेतकऱ्यांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद विचारात घेवून शेतकऱ्यांसाठीच्या पंतप्रधान आत्मनिर्भर धोरणांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसह दुग्ध, कुक्कुटपालन व मत्स्य व्यवसायासाठी अल्पमुदती खेळती भांडवली कर्ज पुरवठा किसान क्रेडीट कार्ड सुविधा मार्फत उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार दूध संघ व दूध उत्पादक कंपन्यांचे संलग्न असणाऱ्या शेतकऱ्यांना केसीसी उपलब्ध करून देण्यासाठी 31 जुलै 2020 या कालावधीत विशेष मोहीम सुरू केलेली आहे.

सर्व शेतकरी बांधवांनी दूध उत्पादकांनी दूध संस्थामार्फत तात्काळ विहीत नमुन्यातील किसान क्रेडीट कार्ड फॉर्म बॅंकेत जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी केले आहे. या विशेष मोहिमेंतर्गत सर्व सहकारी दूध संस्थाच्या सर्व सभासदांना बॅंकांमार्फत किसान क्रेडीट कार्ड वाटप करावयाचे आहे. ज्याच्याकडे किसान क्रेडीट कार्ड नाही त्यांना कार्ड वितरीत करावयाची आहेत. ज्यांच्याकडे कार्ड आहेत. त्यांची कर्जमर्यादा वाढवली जाणार आहे. त्यांना 2 टक्के व्याज परतावा आणि मुदतीत कर्ज फेडणाऱ्यांना अतिरिक्त 3 टक्के व्याज परतावा मान्य करण्यात आला आहे. संघाच्या सभासदांना दूध उत्पादक सहकारी संस्थांचे सभासद कोणत्या बॅंकेकडे जोडले आहेत व त्यांचे किसान क्रेडीट आहे का याची खातरजमा होणार आहे.

संघ, संस्थामाफत फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरु असून ते फॉर्म संबंधित बॅंक शाखेकडे जमा करावयाचे आहेत. ज्या उत्पादक सभासदांचे विकास सेवा संस्था किंवा जिथे पीक कर्ज खाते आहे तेथे, भूमिहीन दूध उत्पादक सभासदांनी ज्या ठिकाणी बॅंक खाते तेथेच अर्ज सादर करावा. त्याचप्रमाणे दूध संघाने सदर सभासदाकडे किती जनावरे आहेत व तो सभासद दूध संस्थेस किती दूध पुरवठा करतो याचे प्रमाणपत्र देवून सदर दूधाचे पेमेंट डी. बी.टी. मार्फत त्यांच्या फॉर्ममध्ये नमूद खात्यात जमा करण्यात येते हे प्रमाणित करणे आवश्‍यक आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special campaign in Sangli for Kisan Credit Card to farmers