शिक्षकांचे कार्य समाजासाठी नेहमीच आदर्शवत ; अनिल बेनके

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

आव्हानात्मक काळात त्यांना जीवनाची योग्य दिशा दाखवतात. त्यामुळेच शिक्षकांचे कार्य समाजासाठी नेहमीच आदर्शवत आहे 

बेळगाव : विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच कोविड 19 च्या संकट काळातही शिक्षकांनी पुढे येऊन कार्य केले आहे.  शिक्षक केवळ आपल्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिकवत नाहीत, तर आव्हानात्मक काळात त्यांना जीवनाची योग्य दिशा दाखवतात. त्यामुळेच शिक्षकांचे कार्य समाजासाठी नेहमीच आदर्शवत असल्याचे प्रतिपादन बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी केले. 

हेही वाचा - .......नाहीतर इच्छामरणास परवानगी द्या

शनिवारी सेंट अँथनी हायस्कूल येथे जिल्हा पंचायत, सार्वजनिक शिक्षण विभाग आणि गट शिक्षणाधिकारी  कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शिक्षक दिन कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. यावेळी बेनके यांनी कोरोना संक्रमणामुळे यावर्षी शिक्षक दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र यावेळी कोरोनामुळे साध्या पध्दतीने शिक्षक दिन साजरा करण्यात येत असून कोरोना मुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील संवाद बंद झाला आहे. अशा वेळी प्रत्येकाने कोरोना दूर करण्यासाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. 

जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी शिक्षक प्रत्येकाच्या जीवनात ज्ञान दानाचे कार्य करीत असतात. देशाचे भवितव्य घडविण्याचे कार्य शिक्षक करत असल्याचे सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन आमदार बेनके व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूर्याजी पाटील, जयश्री पाटील, विलास देसाई, रेखा बांदिवडेकर, भालचंद्र पाटील, रेखा रेणके यांच्या सह बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 34 शिक्षकांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन यांनीही मनोगत व्यक्त केले. 

हेही वाचा -  कोल्हापूरच्या माजी खासदारांना कोरोनाची बाधा

शहर गट शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी प्रास्ताविक केले. कोरोनाच्या संकटामुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम अतिशय साध्या पध्दतीने करण्यात आला तसेच सामाजिक अंतर राखण्यावर भर देण्यात आला. यावेळी शिक्षकांसह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शिक्षक दिनाच्या कार्यक्रम आमंत्रण पत्रिकेत नाव न घातल्याने प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला तसेच विविध कारणांनी शिक्षणाधिकारीही कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special event for today's teachers day in belgaum but education officer not attend this event