मिरजेतून विशेष किसान रेल्वे  धावणार आठवड्यातून दोन दिवस 

शंकर भोसले 
Thursday, 27 August 2020

रेल्वे कृती समिती, रेल्वे प्रवासी संघटना आणि शेतक-यांच्या मागणीस अनुसरून रेल्वे प्रशासनाकडून विशेष किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ही गाडी मिरज स्थानकातून आठवड्यातून दोन दिवस धावेल.

मिरज : रेल्वे कृती समिती, रेल्वे प्रवासी संघटना आणि शेतक-यांच्या मागणीस अनुसरून रेल्वे प्रशासनाकडून विशेष किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ही गाडी मिरज स्थानकातून आठवड्यातून दोन दिवस धावेल. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पादित जीवनावशक वस्तूंना किसान रेल्वे द्वारे चालना मिळणार आहे. 

सांगली जिल्ह्यात शेतमाल उत्तर भारतात पोहचवण्यासाठी मिरज स्थानकातून विशेष किसान रेल्वे गुरूवारी आणि सोमवारी सायंकाळी सुटेल. त्यासाठी मिरज पार्सल कार्यालयात बुकींग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो गावे सर्वात जास्त कृषी उत्पादन व निर्यात करणारी आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वेची संख्या वाढवली जाणार आहे. फळे व भाजीपाल्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. नाशवंत माल जसेकी सिमला मिरची, शेवगा, द्राक्ष, बोर यासह भाजीपाला व फळांना परराज्यात मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मालवाहतूक रेल्वे सुरू करण्याची मागणी होती. अखेर ती पूर्ण झाली.

शेतीविषयक पालेभाज्या, फळ भाज्यांची संख्या वाढल्यास वातानुकुलीत बोगीची सोय करण्यात येणार आहे. सध्या मिरज स्थानकातून किसान रेल्वे गाडीस प्रतिसाद मिळत आहे. अल्पदरात ही गाडी उपलब्ध असल्यामुळे व्यापारी वस्तूंची देवाण-घेवाण करणे सुलभ होणार आहे. 

सांगली जिल्ह्यातील शेतीसह अन्य माल उत्तर भारतात पाठवण्यासाठी रेल्वे विषयक विविध संघटनांच्या मागणी नुसार रेल्वे प्रशासनाकडून किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. मिरज स्थानकातील पार्सल कार्यालयात बुकींग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

- संजीतकुमार झा, मुख्य वानिज्य निरीक्षक, मिरज रेल्वे स्थानक 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A special farmer train will run from Miraj two days a week