बालदिन विशेष : सहा वर्षांचा देवांश सांगतोय सोलापूरची महती!

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

छत्रपती शिवाजी महाराज यासह विविध विषयांवर बोलण्याचे कौशल्य

सोलापूर : माझं सोलापूर व छत्रपती शिवाजी महाराज यासह विविध विषयांवर बोलण्याचे कौशल्य आत्मसात केलेल्या सहा वर्षांच्या देवांश क्षीरसागरचे सर्वत्र कौतुक होत आहे. देवांशचे शिक्षण सोलापुरातील नू. म. वि. प्रशालेत पहिलीत सुरू आहे. बालवयातच त्याने आतापर्यंत विविध ठिकाणच्या 42 वक्तृत्व स्पर्धा व कार्यक्रमांत सहभाग नोंदविला आहे. त्याला विविध ठिकाणी बालवक्ता म्हणून आमंत्रित केले जात आहे. 

देगाव येथे खासगी शाळेत शिक्षक असलेले मौजे पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथील वडील विजय क्षीरसागर आणि आई सुरेखा क्षीरसागर यांनी देवांशचे बालमन सुसंस्कारीत केले आहे. देवांशचा सभाधिटपणा, सोलापूरची असलेली वैविध्यपूर्ण माहिती आणि कोणत्याही विषयावर अचानक आणि दिलेल्या वेळेतच बोलण्याचा त्याचा गुण कौतुकास पात्र ठरत आहे. एवढ्या छोट्या वयात देवांशला असलेली माहिती ऐकून आपणही थक्क होतो. आतापर्यंत त्याने महाराष्ट्रातील विविध स्पर्धेत सहभागी होऊन मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक, सन्मान मिळविले आहेत. 

माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांसमोर देवांशने आपली कला सादर केली आहे. देवांशच्या माहितीपूर्ण व उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्यामुळे अन्य मुलांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याची आजी राजश्री महादेव केवटे (रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) यांनाही देवांशचे कौतुक आहे. 
-- 
हे आहे स्वप्न.. 
देवांशला आयएएस होण्याची इच्छा आहे. त्याला वेळोवेळी श्री. संतू महाराज यांचे व लेखक विजय खाडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भविष्यात देवांशला राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसमोर माझं सोलापूर व छत्रपती शिवाजी महाराज हे विषय सादर करायचे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A special story of the boy Devansh Kshirsagar