#Specialtyofvillage कलाकुसरीच्या अडकित्त्यांचं बागणी

#Specialtyofvillage  कलाकुसरीच्या अडकित्त्यांचं बागणी

गेली तीन पिढ्यांहून अधिक काळ बागणीतील शिकलगार घराण्याने अडकित्ता बनवण्याचे कसब आजही कायम ठेवले आहे. अडकित्ता म्हणजे बागणीचा ही ओळख या कारागिरांच्या दर्जेदार कामातूनच रूढ झाली आहे. दीर्घकाळ लोटला तरी या व्यवसायाची छाप ग्राहकांच्या मनात अजूनही कायम स्वरूपी टिकवली आहे.

बागणी म्हटलं की कलावंतांच गाव. वारणा नदीच्या कुशीत वसल्यामुळे गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती. शेतीला जोड धंदा म्हणून गावातील अवघ्या सहा ते सात शिकलगार कुटुंबांनी अडकित्ता बनविण्यास सुरवात केली. या पूर्वांपार व्यवसायांची धार राज्यांत नव्हे, देशात नव्हे तर परदेशातही तळपत आहे. अमेरिका, दुबई, कुवेत, सैदी, अफगाणीस्तान आदी देशांतील चाहत्यांनी बागणीचा अडकित्ता वापरून आपली हौस पूर्ण केली आहे. त्याचबरोबर बिहार, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक विशेषतः विजापूर, तमिळनाडू येथून आजही बागणीच्या अडकित्त्याला मोठी मागणी आहे.

अडकित्त्यांमध्ये सरळ मांडी, बाकाचा, राघुमार, बेडकी माठ, बाकाची नक्षी, माला असे विविध प्रकार आहेत. बागणीतल्या कारागिरांनी असे विविध प्रकारचे अडकित्ते बनवताना आपले कसब वापरून ते सातासमुद्रापार पोचवले आहेत. शेती उपयुक्त अवजारेही या कारागिरांनी कल्पकतेने तयार केली आहेत. खुरपे, विळा, विळती, धनगरी कुऱ्हाड, बैल मशागतीचे अवजारे, नारळ सोलणी यंत्र, तासणी, द्राक्षे छाटणी यंत्र, केशकर्तनासाठीच्या कात्र्या, पानपट्टीसाठी लागणारे मोठे अडकित्ते अशी अवजारे येथील शिकलगार कुटुंबीय तयार करतात. 

शिकलगार कुटुंबातील तरुणांनी परंपरागत व्यवसायाला प्राधान्य देत आपली आवड जोपासली आहे; परंतु हत्यारे तयार करण्यासाठी सान, कोळसा या दोन आवश्‍यक घटकांचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या हा व्यवसाय विजेवर चालणाऱ्या यंत्राच्या आधारे केला जातो.  व्यवसाय करण्यासाठी शासन पातळी वरून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने हा व्यवसाय जोपासणे अवघड आसल्याचे कारागीर सांगतात.

ग्राहकांची पसंती बागणीलाच
गेल्या तीन पिढ्यांपासून आमच्या कलेला ग्राहकांनी पसंती दिली आहे. आमच्यातील एक कारागीर एक अडकित्ता तयार करण्यासाठी पाच तास मेहनत घेतो. महिन्याकाठी २५ ते ३० अडकित्ते तयार करून विक्री होतात. खाऊचे पान खाणाऱ्या शौकिनांचीही पहिली  पसंती बागणीच्या अडकित्त्यालाच आहे.

ऊस तोडी सुरू होण्याआधीच महिन्याभरापासून ऊस थासणी, खुरपे, विळा या साहित्याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. ग्राहकांच्या मागणी नंतरच आम्ही पंधरा दिवसांच्या आत साहित्य तयार करून देतो.
- समीर शिकलगार,
अडकित्ता व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com