गाव माझं वेगळंः दारूबंदी ४० वर्षे टिकवणारे गाव

शिवाजीराव चौगुले
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि काेकणात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारी आणि आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अनेक गावं आहेत. अख्ख्या जगात ‘गाव माझं वेगळं’ असं अभिमानानं मिरविणाऱ्या या आगळ्यावेगळ्या गावांविषयी ‘हटके’ माहिती देणारी ही मालिका...

व्यसनमुक्त गावाचे संकल्प अनेक होतात; मात्र त्याची तड थोडीच गावे लावतात. सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम टोकाला सह्याद्री रांगांमधील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कुशीत वसलेल्या खुंदलापूरने हा संकल्प केवळ केला नाही तर गेली ४० वर्षे तो काटेकोर पाळला आहे. या संकल्प दिनाचा वाढदिवसही दरवर्षी धूमधडाक्‍यात साजरा केला जातो. गेल्या २५ वर्षांपासून इथली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत असते. वाद-तंट्यापासून गाव शासनाच्या योजना सुरू होण्याआधीपासून मुक्त आहे.

शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागातले शेवटचे गाव म्हणजे खुंदलापूर. धनगरवाडा अशीच मूळची ओळख. या गावाचे सर्वात मोठे आणि अनुकरणीय वेगळेपण म्हणजे व्यसनमुक्ती संकल्प दृढनिर्धाराने तडीस नेणारे हे गाव आहे. गेल्या चार दशकांपासून त्यांचा हा संकल्प टिकला आहे. १९७९ मध्ये गावातील अशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन हा संकल्प केला. तेव्हापासून गाव पूर्ण दारूमुक्त झाले. या दारूमुक्तीचा वाढदिवस दिमाखात साजरा होतो. एप्रिलमध्ये हनुमान जयंतीनंतरच्या पहिल्या शनिवारी हा वाढदिवस साजरा होतो. यादिवशी गावात घरोघरी लग्न समारंभासारखे वातावरण असते. मात्र तेथे ध्वनी प्रदूषणाला थारा नसतो.

दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमानंतर रात्रभर सोंगी भारुडाच्या स्पर्धा रंगतात. या कार्यक्रमासाठी शिराळा, शाहूवाडी, पाटण तालुक्‍यातून धनगर समाजातील अनेक चमू सहभागी होतात. हे सारे पै पाहुणेच असतात. त्यांच्यासाठी गोड जेवणाचे बेत होतात. तिथे नशेला थारा नसतो. हा महाप्रसाद असतो.
१९७९ पूर्वी इथे दारूचा सुकाळ होता. त्याची सर्वाधिक झळ कष्टकरी महिलांना बसायची. 

गावातच दारुभट्टया होत्या. अनेक कुटुंबाची ही परवड सुरू होती. यातल्या काही तरुणांनी मुंबई गाठली होती. तिथे त्यांची पुणे येथील भिकाजी गारगोटे या वारकरी देवमाणसाशी भेट झाली. भजन कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यांनी खुंदलापूर येथे येऊन कीर्तनाच्या माध्यमातून गावात प्रबोधन केले. त्याचा प्रभाव विशेषतः तरुणांवर पडला. सर्वांनी व्यसनमुक्तीला संमती दिली. जो वाड्यात दारू पिऊन येईल त्यास १०० ते ५०० रुपये दंडाचा निर्णय झाला. जो आपला ठेका सोडणार नाही त्यास ठोकून काढण्याचे फर्मानही सुटले. त्यामुळे व्यसन मुक्तीला संकल्प ठोक्‍यात झाला. गावच्या या कामगिरीची दखल घेत २००३ मध्ये शासन दरबारी दिला जाणारा व्यसनमुक्त गावाचा पुरस्कार मिळाला.

खुंदलापूर म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातले हे आदिवासी गाव. धुवाँधार पावसाचा सामना करीत जशा सह्याद्रीच्या रांगा आजही उभ्या आहेत, त्याप्रमाणेच ही माणसे या भागात पिढ्यान्‌ पिढ्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत उभी ठाकली आहेत. चांदोली धरणामुळे खुंदलापूरचे पुनर्वसन झाले. गावातले विस्थापित म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणीव विसावले; मात्र या गावचा शेजारचा धनगरवाडा असेलला मात्र तिथेच राहिला. तो धनगरवाडाच पुढे १९९२ पासून ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आला. तेव्हापासून आज अखेर येथे कधीही निवडणूक झालेली नाही.

अगदी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुकांवेळीही इथे गट तट नसतात. ग्रामस्थ एकत्र बसून मतदानाचा निर्णय करतात आणि गुपचूपणे अंमलातही आणतात. एकदा ठरले की वाद नाही की तंटा नाही. कोणती तक्रार पोलिस ठाण्यापर्यंत शक्‍यतो येत नाही. त्याआधीच गावपातळीवर तिची सोडवणूक होते. त्यामुळे हे गाव कायमच तंटामुक्त असते. पोलिस दप्तरीही त्याची अशीच नोंद आहे. 

गाव छोटे. ४०० लोकसंख्येचे. ६२ कुटुंबाचे गाव. लोक गरीब; मात्र तरीही घर-पाणी पट्टीची वसुली १०० टक्के. गावच्या या कामगिरीला आजवर शासनाने नेहमीच गौरवले आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानालगत गाव  असल्याने वनविभागाच्या योजनांमधून या गावासाठी धूरमुक्त गाव करण्यासाठी योजनांचा लाभ मिळाला आहे. घरगुती गॅस, सौरदिवे, पाणी तापवण्यासाठी बंब अशा अनेक सुविधांसाठी शासनाकडून मदत मिळाली आहे. त्यामुळे हे गाव आता शंभर टक्के धूरमुक्त झाले आहे.

या गावात रोजगाराची साधने दुर्मिळच. करवंदे, जांभळे, तोरणे असा रानमेवा विक्रीसाठी इथली मंडळी शंभर सव्वाशे किलोमीरचा प्रवास करून सांगली-कोल्हापूर गाठतात. हे उत्पन्न हंगामीच. शेती उदरनिर्वाहाचे साधन आहे; मात्र आता या गावातून अनेक तरुण मुंबईला रोजगारासाठी गेले आहेत. तिथे ते प्रामुख्याने फुल विक्रीच्या व्यवसायात आहेत.

विक्रेत्यांना रोखले
गावात ४५ वर्षांपूर्वी एखाद-दुसरी व्यक्ती येऊन दारू विकत होती. गावात दारूबंदी झाल्यानंतर तो दारू येऊन विकण्याचा प्रयत्न करीत असे. त्यावेळी त्याला या तरुणांनी समज दिली. दारू विकणारा आणि ती घेणारा अशा दोघांनाही दंड आकारण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू या प्रकारालाही आळा बसला आणि त्यानंतर गाव पूर्ण दारूमुक्त झाले.

व्यसनमुक्तीचे प्रेरणास्रोत
खुंदलापूरच्या व्यसनमुक्तीचे प्रेरणास्रोत भिकाजी महाराज गेली चाळीस वर्षे गावात येतात. व्यसनमुक्तीच्या वाढदिवसासाठी त्यांची न चुकता उपस्थिती असते. आता ते ऐंशीकडे झुकले आहेत; मात्र गावातील तरुण पिढी त्यांना आदर्श मानते. महाराजांसोबत संकल्प केलेले अनेक जण आता पंच्याहत्तर-ऐंशी वयोगटात आहेत. या सर्वांचाच नव्या पिढीवरील प्रभाव कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Specialty Of Village Khundalapur 40 years ban on Liquor