‘गाव माझं वेगळंः ‘फॅन्सी नंबर’चा नादच खुळा!

‘गाव माझं वेगळंः ‘फॅन्सी नंबर’चा नादच खुळा!

गाडीवरून त्या माणसाचा रुबाब आणि गाडी क्रमांकावरून त्याचा छंद ओळखता येतो. या दोन्हींतही कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली (ता. करवीर) या गावाने राज्यात आघाडी घेतली आहे. गाव छोटे असले, तरी गाड्यांच्या फॅन्सी क्रमांकांबाबत कुठलेही गाव चिखलीकरांशी स्पर्धाच करू शकत नाही.

‘गाव तसं चांगलं; पण वेशीला टांगलं’; याउलट ‘गावच चांगलं; पण वेगळेपणावरून गाजलं’, असं एक गाव आहे. कोल्हापूरपासून सहा किलोमीटरवरील प्रयाग चिखली. इथल्या ग्रामस्थांना मात्र भलतंच वेड आहे. हे वेड म्हणजे वाहनांना आकर्षक क्रमांक घेण्याचं. आकर्षक क्रमांकाच्या गाडीवरून फिरण्याचा नादच प्रयाग चिखलीकरांना लागला आहे.

पाच नद्यांच्या संगमामुळे गावची ‘प्रयाग’ अशी ओळख. संगमामुळे सुपीक, कसदार जमीन, अर्थात इथले गावकरी कष्टकरी. सुपीक जमिनीतील इथला गुळाचा गोडवा लई भारी आणि जगभर प्रसिद्धही. पंचगंगाकाठच्या गवताळ कुरणांमुळे पशुपालनाचा जोडधंदाही येथे तितक्‍याच नेटाने गावकऱ्यांनी जपलेला. पहाटेपासून राबून कष्टातूनच गावकऱ्यांनी येथे समृद्धता आणि सधनता फुलवलली आहे. गावात प्रवेश केला, की सहाखणी, आठखणी टुमदार लाकडी नक्षी असलेल्या गच्चीची  घरं पाहिली, की गावची समृद्धता नजरेत भरते. हीच समृद्धता इथल्या राहणीमानात, वागण्यात जाणवते.

गावात १९५२ मध्ये न्यॉर्टन कंपनीची (मेड इन इंग्लंड) पहिली मोटरसायकल सोसायटीचे सचिव पांडुरंग कळके यांनी आणली.
दादू कांबळे ऊर्फ पिटर यांनी १९५५ मध्ये रॉयल एनफिल्ड कंपनीची क्रुसेडर ही मोटरसायकल आणली. १९६२ मध्ये दादासाहेब यादव यांनी बुलेट प्रथम आणली, तिचा क्रमांक होता १४४. दरम्यान आनंदा शंकर पाटील यांनी नवी कोरी जावा गाडी आणली.

१९६४ मध्ये बाबूराव यादव यांनी गावात दुसरी बुलेट आणली. त्यानंतर पांडबा यादव यांनी १९७१ मध्ये पहिली चारचाकी ॲम्बेसिडर आणली. त्यांनी तिला ६४६४ असा क्रमांक घेतला. यानंतर एकामागोमाग एक बुलेट आल्या. बळवंत चौगले, दिलीप पाटील, महादेव पाटील यांनी त्या आणल्या. राजाराम कवठेकर यांनी लॅब्रेडाची स्कुटर आणली. तिला ५५६६ क्रमांक घेतला आणि तेथूनच मग आकर्षक क्रमांक घेण्याची सकारात्मक ईर्ष्या चिखलीकरांत रुजली. आकर्षक क्रमांकाची गाडी म्हटलं, की ती प्रयाग चिखलीचीच असणार! हे समीकरण पक्के झाले.

गावात ५० वर्षांपूर्वी वाहनांना आकर्षक क्रमांक घेतला. सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांशी ओळख झाली. ओळखीतून वाहनांना आकर्षक क्रमांक घेतले आणि यातून नवे वाहन घेणाऱ्यांना फॅन्सी क्रमांक घेण्यासाठी प्रोत्साहित केले; पण केवळ छंद आणि हौस म्हणूनच. यात ईर्ष्या नाही.
-पांडबा यादव, ज्येष्ठ नागरिक 

गाडी घेतानाच फन्सी क्रमांकासाठी पैशाची तरतूद करतो. भविष्यात दुसरी गाडी घेण्यासाठी पहिली गाडी विकताना फॅन्सी क्रमांकांमुळे चांगली रक्कम मिळते. त्यामुळे सर्वजण फॅन्सी नंबरवर भर देतात.
- युवराज माने, दूध संस्था कर्मचारी

कॉलेजमध्ये माझ्या गाडीचा क्रमांक १६०० आहे. या फॅन्सी क्रमांकामुळे वेगळीच छाप पडली. यामुळे चिखलीच्या आकर्षक क्रमांकांची कॉलेजमध्ये वेगळीच ओळख तयार झाली आहे.
-सपना पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थिनी.  

७५ ते ८० लाखांचा महसूल दिला
गावात सध्या ५५०० दुचाकी, तर तर ४०० चारचाकी आहेत. पूर्वी ओळख, वशिल्यावर आकर्षक क्रमांक मिळविले जात होते. ‘आरटीओ’ने २००० नंतर महसुलासाठी फॅन्सी क्रमांकांना वेगळी रक्कम आकारण्यास सुरवात केली. गावाने गेल्या १८ वर्षांत ७५ ते ८० लाखांचा महसूल ‘आरटीओ’ला दिल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले.

वाट पाहीन; पण... 
फॅन्सी क्रमांकासाठी गाडी घेतल्यानंतर एक ते तीन महिने थांबण्याची तयारीही गावकऱ्यांची असते. येथील विलास माने यांनी ५० हजार रुपये मोजत तब्बल चार महिने थांबून आपल्या गाडीला ९९९९ हा क्रमांक घेतला. 

चेअरमन ते शिपाईही 
फॅन्सी क्रमांकाचे वेड केवळ श्रीमंतांमध्येच नाही तर प्रगतशील शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य, सेट्रिंग कामगार ते गावातील सेवा संस्था, सरपंच, डेअरी चेअरमनपासून ते शिपायाच्या वाहनांनाही फॅन्सी क्रमांक आहे.

क्रमांकावरून कुटुंबांची ओळख  
गावात यादव - (७७७७, ३३३३), एस. आर. पाटील (१६००, ९४००), कळके (९५९६, २१००), मांगलेकर, दळवी, कुरणे यांच्यात (३४३४, ३५३५, ७६७६), तर रघू पाटील  (३५००), वरुटे (३२३२), चौगले (९८९८, १०००), कुरणे (११००), रजपूत  (५१५१), पै. संभाजी पाटील (२४००) असे क्रमांक हीच अनोखी ओळख ठरली आहे.

सुरेश वाडकरही प्रेमात
प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचे नातेवाईक चिखलीत असल्यामुळे त्यांचे नेहमी येथे येणे-जाणे असते.यातून यादव कुटुंबीयांशी असलेल्या सबंधांतून आणि चिखलीकरांच्या प्रेमातून त्यांनाही सुरवातीला वाहनाला आकर्षक क्रमांक घेण्याची इच्छा झाली. आज त्यांच्या सर्व वाहनांना ५००० च क्रमांक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com