चष्मा, दृष्टी आणि दान... 

 Spectacles, vision and donations ...
Spectacles, vision and donations ...

परवा चष्म्याच्या दुकानात गेलो होतो. ते दुकान इतके कोपऱ्यात आणि कडेला होते, की डोळ्यांना दिसेचना. खरे तर डोळ्यांना इतकाही नंबर नव्हता, की चष्म्याचे दुकानही दिसू नये. दुकानात पोचलो तर माझ्यापुढे अनेक नंबर होते. कोणाजवळ दूरदृष्टीचा अभाव होता. तर कोणाला जवळचेही दिसणे अवघड होऊन बसले होते. बहुतेक सारे शिकले सवरलेले दिसत होते. पण चार ओळी काही, न अडखळता वाचू शकत नव्हते. खरे तर स्वच्छ दृष्टी देण्यासाठी अनेक चष्मे सेवेला सज्ज होते. पण लगेच कुणाचीही सेवा घेऊन चालत नाही. तिथेही प्लस- मायनस असतेच. 

सुरवातीला डोळे तपासताना त्या छिद्रातून आतून लाइट लावलेल्या समोरच्या पाटीवर नजर टाकायला लागले, की आधी धूसर दिसते. भ आणि थ, प आणि म ही अक्षरे चकवा देतात. मग काचा जशा बदलत जातात, तसतसा मजकूर स्पष्ट दिसायला लागतो. पुन्हा काच काढून घेतली, की अक्षरे तेलुगू लिपीत जाऊन बसल्यासारखी दिसतात. एकदम कडबोळे आणि जिलेबी फॉंट. एकदा नंबर निश्‍चित झाला, की डोळ्यांच्या दृष्टीने काम संपते. आपली नजर मग उत्तम फ्रेम शोधू लागते. हर तऱ्हेच्या फ्रेम्स डोळ्यांवर लावून आपण कसे दिसतो, या प्रश्‍नाचे उत्तर आरसा देऊ लागतो.

स्वतःच स्वतःला नकार द्यायचा हा बहुतेक एकमेव प्रसंग. काही फ्रेम चेहऱ्याला साजूकपण बहाल करतात, तर काही गब्बरपण. स्मार्ट आणि बावळट अशा दोन्ही भावना निर्माण करणारी चष्मा ही एकच वस्तू असावी. कितीही नाही म्हटले तरी दिसणे महत्त्वाचे ठरतेच. काळी जाडी फ्रेम, सोनेरी साजूक फ्रेम, रिमलेस, स्टायलिश कलर फ्रेम किंवा अगदी लेन्स निवडा. समोरचे स्पष्ट, छान दिसले पाहिजे हे नक्की. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे कसे पाहता हे इथे गौण ठरते. कारण, आपण स्वतःलाच आरशात पाहत असतो. कपडे मळखाऊ आणि वस्तू टिकावू असावी असे म्हणतात. म्हणून मी जाड चौकटीची काळी फ्रेम डोळ्यांवर लावली. वयाचा काटा पंधरा-वीस वर्षे पुढे सरकला. आपण छान दिसतो हा अनेकांचा गैरसमज, आपलेच आधार कार्डावरचे छायाचित्र पाहिले, की जसा दूर होतो, तसेच काहीसे या फ्रेमनी झाले. मी ती फ्रेम कानावरून काढायला लागलो, त्या क्षणी ती माझ्याशी बोलायला लागली. 

काय, मी फार जुनाट वाटत असेन. मग कॉन्टॅक्‍ट करा, की लेन्सला. ती तुम्हाला अडचणीची वाटणार नाही, कारण तिला सोल्यूशनमध्ये राहायची सवय आहे. आमची गोष्ट वेगळी आहे. आमचे वंशज सुवर्ण वर्णाचे. महात्माजींबरोबर वावरलेले. पुढे काळाबरोबर अनेक चांगल्या गोष्टींचा ऱ्हास झाला. समोरच्याकडे स्वच्छ, पारदर्शीपणे पाहण्याची माणसाची दृष्टीच नाहीशी झाली आणि म्हणून ही काळी चौकट आमच्या नशिबी आली. आमच्या काळ्या चौकटीला स्पर्धक फार. आमच्यामधेही रोज नवे नवे रंगीबेरंगी स्ट्रगलर्स येत असतात; पण रोल मॉडेल न दिसल्यामुळे लवकरच नाहीसे होतात. आमचा लूक भले वेगवेगळा असेल. पण उद्देश मात्र एकच. मानवाला सुस्पष्ट दृष्टि देणे. आता माणूस आमच्यावरही सहज मात करतो, आपली दृष्टी दान करून.

तुमच्यापश्‍चात तुमचे अस्तित्व राहील ते डोळ्यांच्या रूपाने. दोन व्यक्तींच्या आयुष्यातील अंधार नाहीसा करू शकतात तुमचे डोळे. मरणोत्तर नेत्रदान या संकल्पनेचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला हवा. असे आमच्या तमाम चष्मा संघटनेचे म्हणणे आहे. असे काय बघता, हा कोण सांगणारा म्हणून! तुम्हाला स्वच्छ दृष्टी देण्याचे काम मी नेहमीच जबाबदारीने पार पाडतो. म्हणून थोडे अधिकारवाणीने सांगितले. अहो, असे लगेच उतरवू नका मला चेहऱ्यावरून. थोडे ऐका, नीट माझ्याकडे बघा. अनेक समाजसुधारकांच्या डोळ्यांवर मला स्थान होते. म्हणून सामाजिक जाणिवेतून दृष्टिदानाबद्दल आज तुम्हाला सांगितले.

नेत्रपेढी आणि नेत्रदान हे दोन महत्त्वाचे शब्द विसरू नका, हेच मला सांगायचे होते इतकेच. हं, आता मला काढून ठेवा. चष्म्याचे हे मनोगत ऐकल्यावर मी चकितही झालो आणि आनंदीही. आता नवा विचार, नवी फ्रेम आणि नवीन दृष्टी घेऊन मी चष्म्याच्या दुकानातून बाहेर पडतो.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com