सूत दरवाढीमुळे यंत्रमाग व्यवसाय आणखी अडचणीत : किरण तारळेकर 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 December 2020

विटा (सांगली)-  गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांमुळे अडचणीत असणारा यंत्रमाग व्यवसाय सूत दरवाढीमुळे अधिकच अडचणीत आला आहे अशी माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिली. 

विटा (सांगली)-  गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांमुळे अडचणीत असणारा यंत्रमाग व्यवसाय सूत दरवाढीमुळे अधिकच अडचणीत आला आहे अशी माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिली. 

ते म्हणाले, ""कापूस दर स्थिर आहे व कापडास मागणी नसताना होत असलेली सूत दरवाढ अनाकलनीय आहे. केंद्र शासनाने शेती उत्पादकांचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध शेतीउत्पादनांचे किमान हमी भाव वाढवून जाहीर केले आहेत. वस्त्रोद्योगाचा पाया व प्रमुख कच्चा माल असलेल्या कापसाचा किमान हमी भाव केंद्रांने एकदम दीडपट वाढवल्याने सुतगिरण्या, विकेंद्रित यंत्रमाग, कापड रंगप्रक्रिया उद्योग, तयार कपडे बनवणारे उद्योग या कापसावर अवलंबून असलेल्या वस्त्रोद्योग साखळीवर कमालीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. वाढलेल्या किमान हमी भावाचा गैरफायदा बडे कापूस व सूत व्यापारी घेताना दिसत आहेत. कापूस व सुताची बाजारपेठ पुर्णपणाने बड्या भांडवलदार व्यापाऱ्यांनी काबिज केली आहे. यामध्ये प्रत्यक्ष सुतापासुन कापड तयार करणारा राज्यातील विकेंद्रित यंत्रमाग विभाग दोन्ही बाजूंनी भरडला जात आहे.''

ते पुढे म्हणाले, ""केंद्राच्या हमीभावानुसार कॉटन कार्पोरेशन देशभर शेतकरी वर्गाकडून कापूस खरेदी करतो. तरीपण कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर असल्याने कापसाचे भाव वाढून गेल्या पंधरा दिवसांपासून स्थिर आहेत. मात्र दिवाळीपासून बड्या सूत व्यापाऱ्यांनी सुतदरात दररोज वाढ करीत सुताचे दर प्रचंड वाढवले आहेत. या वाढलेल्या सुत दराच्या तुलनेत कापडास वाढीव दराने मागणी नसल्याने यंत्रमाग उद्योजकांपुढे पुन्हा नुकसानीत जाण्याचा प्रसंग आला आहे. उत्पादनाचा उद्योग व कामगारांचा प्रश्न असल्याने यंत्रमाग लगेच बंदही करता येत नाहीत. यंत्रमागधारकांनी नाईलाजास्तव सूत खरेदी कमी केली आहे. तसेच कापड दर वाढण्याची प्रतिक्षा करत आहेत. सध्या सुतगिरण्या व सूत व्यापारी वर्गाकडे सुताचे प्रचंड साठे पडुन आहेत तरीही गेल्या पंधरा दिवसांपासुन दररोज सूत दरवाढ आश्‍चर्यकारक आहे. गिऱ्हाईकाअभावी सुताचे दर थोडे जरी कमी झाले तर त्याचा परिणाम पुन्हा कापड मागणीवर आणखी प्रतिकुल होईल. कापड कमी दराने मागितले जाईल अशी परिस्थिती आहे. एकुणच बड्या व्यापाऱ्यांच्या तेजी मंदीच्या या खेळात दोन्ही बाजुने नुकसान हे यंत्रमागधारकांच्या माथी मारले जात आहे. त्यामुळे यंत्रमाग व्यवसाय मोडीत निघू लागला आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spinning business in trouble due to increase in yarn price: Kiran Tarlekar