esakal | लालपरीला प्रवाशांची प्रतीक्षा; तोट्याचा फेरा संपता संपेना 
sakal

बोलून बातमी शोधा

ST bus is still waiting for passengers; loss never ends

राज्यातील एसटी वाहतूक सध्या तोट्यातच आहे. तो भरून काढण्यासाठी एसटीने प्रथमच माल वाहतूक देखील सुरू केली. तसेच सुरू असलेल्या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद अपवाद वगळता फारच कमी आहे.

लालपरीला प्रवाशांची प्रतीक्षा; तोट्याचा फेरा संपता संपेना 

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : केंद्र सरकारने "अनलॉक 4.0'ची घोषणा केल्यानंतर कर्नाटक राज्य शासनाने प्रवासी क्षमतेची अट मागे घेतली. त्यामुळे तेथे पूर्ण क्षमतेने बसेस धावण्यास सुरवात झाली आहे. महाराष्ट्रात अद्याप निम्म्या क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू आहे. तशातच काही मार्गांवर प्रवासी नसल्यामुळे फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. सांगली जिल्ह्याचा विचार केला, तर विविध भागांतील लॉकडाउन व जनता कर्फ्यूमुळे प्रवासी वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्यामुळे एसटीचा तोट्याचा फेरा अद्यापही सुरूच आहे. 

केंद्र सरकारने अनलॉकची घोषणा केल्यानंतर सुरवातीला जिल्हांतर्गत बसेस वाहतुकीला, नंतर आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी मिळाली; परंतु अद्यापही निम्म्या आसन क्षमतेनेच प्रवासी वाहतूक सुरू आहे. सध्या सर्व प्रकारच्या गाड्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. प्रत्येक गाडीत 22 प्रवासी घेतले जातात. त्यासाठी पूर्वीइतकेच भाडे आकारले जाते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक फेरीनंतर बसेस निर्जंतुकीकरण केल्या जातात. 

राज्यातील एसटी वाहतूक सध्या तोट्यातच आहे. तो भरून काढण्यासाठी एसटीने प्रथमच माल वाहतूक देखील सुरू केली. तसेच सुरू असलेल्या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद अपवाद वगळता फारच कमी आहे. काही वेळा 22 प्रवासीदेखील भरले जात नाहीत. त्यामुळे काही फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. काही भागांत लॉकडाउन व जनता कर्फ्यूमुळे तेथील फेऱ्या बंद आहेत. 

राज्यात एकीकडे हे चित्र असले तरी शेजारील कर्नाटक राज्यात "अनलॉक 4'मध्ये तेथील चार महामंडळांनी शासनाकडे पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मागितली होती. त्याला परवानगी दिल्यानंतर तेथील बसेस पूर्ण प्रवासी क्षमतेने धावू लागल्या आहेत. याच धर्तीवर राज्यातदेखील पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी मिळण्याची आणि प्रवासी येण्याची एसटीला प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

लॉकडाउन व कर्फ्यूचा परिणाम

कर्नाटकातील महामंडळांनी मागणी केल्यानंतर पूर्ण प्रवासी क्षमतेला परवानगी मिळाली. आपल्याकडील चित्र उलट आहे. काही मार्गांवर प्रवासी नसल्यामुळे फेऱ्या कमी कराव्या लागत आहेत. निम्म्या संख्येप्रमाणे 22 प्रवासीदेखील काही फेऱ्यांमध्ये मिळत नाहीत. स्थानिक लॉकडाउन व कर्फ्यूचादेखील परिणाम होत आहे. 
- अशोक खोत, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना 

जिल्ह्यातील चित्र 

  • 850 पैकी केवळ 154 बसेस सुरू 
  • दिवसभरात 676 फेऱ्या 
  • प्रवाशांची सरासरी संख्या 12 हजार 500 
  • दिवसभरात 37 हजार किलोमीटर अंतर 
  • भारमान 30 टक्के

संपादन : युवराज यादव