esakal | "प्रवाशांच्या सेवेसाठी' तामिळनाडूत प्रथमच "एसटी' पोहोचली
sakal

बोलून बातमी शोधा

msrtc.jpeg

सांगली- "प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य खऱ्या अर्थाने एसटी बसने सार्थ ठरवले. "लॉकडाउन' मुळे जिल्ह्यात अडकलेल्या तामिळनाडूतील 480 जणांना हजार किलोमीटरचे अंतर कापून सुखरूप पोहोच केले. या निमित्ताने राज्य परिवहनची बस प्रथमच तामिळनाडूमध्ये गेली. चालकांच्या मनात "कोरोना' ची धास्ती असताना देखील त्यांनी ही कामगिरी पार पाडली. 

"प्रवाशांच्या सेवेसाठी' तामिळनाडूत प्रथमच "एसटी' पोहोचली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली- "प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य खऱ्या अर्थाने एसटी बसने सार्थ ठरवले. "लॉकडाउन' मुळे जिल्ह्यात अडकलेल्या तामिळनाडूतील 480 जणांना हजार किलोमीटरचे अंतर कापून सुखरूप पोहोच केले. या निमित्ताने राज्य परिवहनची बस प्रथमच तामिळनाडूमध्ये गेली. चालकांच्या मनात "कोरोना' ची धास्ती असताना देखील त्यांनी ही कामगिरी पार पाडली. 


"कोरोना' मुळे "लॉकडाउन' केल्यानंतर गेले दीड महिने जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय तसेच कारखाने बंद पडले होते. नोकरी नसल्यामुळे कामानिमित्त आलेले परप्रांतिय कामगार घरी बसूनच होते. प्रशासनाने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. परंतू कामगारांना घरी जाण्याचे वेध लागले होते. "लॉकडाउन' च्या तिसऱ्या टप्प्यात शिथिलता आल्यानंतर तामिळनाडूतून आलेले कामगार घरी जाण्यासाठी उत्सुक होते. दोन्ही जिल्ह्यातून प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर एवढे अंतर जायचे कसे? असा प्रश्‍न निर्माण झाला. तेव्हा सर्वांना "एसटी' ची आठवण झाली. एसटीच्या प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी जाण्याची तयारी दर्शवली. 

सांगली आणि मिरजेतील 16 बसेस तामिळनाडूकडे जाण्यासाठी निर्जंतुकीकरण करून सज्ज ठेवल्या. तामिळनाडूत आपली एसटी यापूर्वी कधी धावली नसल्यामुळे तसेच "कोरोना' च्या संकटामुळे चालकांमध्ये धास्ती होती. तिकिट काढण्याची पूर्तता झाल्यामुळे वाहकाचा प्रश्‍नच नव्हता. मात्र हजार किलोमीटर जायचे आणि परत यायचे असा दूरवरचा पल्ला असल्यामुळे एका बसमध्ये दोन चालक ठेवण्यात आले. परवानगी मिळाल्यानंतर 8 मे रोजी रात्री बसेस धावल्या. दूरवरचा पल्ला होता. कोल्हापूर सोडल्यानंतर कर्नाटकात हुबळी, चित्रदुर्ग, बेंगलोर हुत्तूर मार्गे सर्व गाड्या 9 रोजी रात्री पोहोचल्या. वाटेत जवळपास 30 चेकपोस्टवर थांबवण्यात आले. प्रत्येकवेळी कागदपत्रांची पाहणी करूनच पुढे सोडले जात होते. त्यामुळे जाण्यासाठी उशिर लागला. 


शनिवारी रात्री विश्रांती घेतल्यानंतर रविवारी दुपारी सर्व चालक परतीच्या मार्गावर निघाले. त्यावेळी सेलम येथे अडकलेल्या जळगाव येथील मजुरांना बसमध्ये घेतले. सर्व बसेस आज दुपारी बाराच्या सुमारास सांगली व मिरजेत पोहोचल्या. त्यानंतर सर्व चालकांची वैद्यकीय तपासणी करून घराकडे सोडण्यात आले. तब्बल तीन दिवस दोन हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या चालकांमुळे "प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य सार्थ ठरवले. 
 

जळगावला 8 बसेस रवाना- 
सेलमला गेलेल्या बसेसमधून येताना जळगावच्या मजुरांना आणण्यात आले. या मजुरांना घेऊन सांगली-मिरजेतील 8 बसेस आज दुपारी येथे पोहोचल्या. या आठ बसेस घेऊन अन्य चालक दुपारनंतर रवाना झाले. चालकांनी "लॉकडाउन' मध्ये अडकलेल्या मजुरांना सोडण्यासाठी बजावलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. 
 

""तामिळनाडूमध्ये आम्ही सर्व चालक प्रथमच गेलो. सर्वांच्या मनात धास्ती होती. परंतू तेथील परिवहन विभागाने चालक-वाहकांना पीपीए किट दिल्याचे आढळले. तसेच हॅन्डग्लोव्हज आणि चांगल्या प्रतीचे मास्क दिले आहेत. त्या धर्तीवर राज्य परिवहन विभागाने चालक-वाहकांना या काळात सुविधा द्याव्यात.'' 
-एक चालक 
 

loading image