दोन महिन्याच्या प्रलंबित वेतनासाठी एसटी कामगारांचे आत्मक्‍लेश 

घनश्‍याम नवाथे 
Saturday, 10 October 2020

एसटी कामगारांना थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी एसटी कामगार संघटनेच्यावतीने आज विभागीय कार्यालयासमोर आत्मक्‍लेश उपोषण करण्यात आले. 

सांगली : एसटी कामगारांना थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी एसटी कामगार संघटनेच्यावतीने आज विभागीय कार्यालयासमोर आत्मक्‍लेश उपोषण करण्यात आले. 

एसटी कामगारांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन प्रलंबित होते. दोन महिन्याचे प्रलंबित वेतन आणि सप्टेंबरचे वेतन 7 ऑक्‍टोबरपर्यंत मिळावे अन्यथा 9 रोजी आंदोलन करण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला होता. प्रशासनाने जुलै महिन्याचे वेतन कामगारांना देत पुन्हा ऑगस्ट व सप्टेंबरचे वेतन प्रलंबित ठेवले. त्यामुळे आज विभागीय कार्यालयासमोर आत्मक्‍लेश उपोषण करण्यासाठी एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी एकवटले होते. 

एक महिन्याचे वेतन देऊन कामगारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कामगारांच्या दैनंदिन गरजा व उधारी-उसनवारी भागवणे अशक्‍य बनले आहे. त्यामुळेच आत्मक्‍लेश उपोषणाचा मार्ग संघटनेला स्विकारावा लागत आहे. एसटी महामंडळाचा अत्यावश्‍यक सेवा म्हणून 70 वर्षापासून वापर होत आहे. ना नफा-ना तोटा तत्वावर एसटी चालते. खासगी वाहनाच्या टप्पा वाहतुकीमुळे महामंडळाचा संचित तोटा सहा हजार कोटीहून अधिक वाढत चालला आहे. त्यामुळे महामंडळ शासनात विलिन करावे. 

कामगारांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून वेतन व भत्ते द्यावेत. त्यामुळे एसटीला चांगले दिवस येतील. दोन महिन्याचे थकीत वेतन तातडीने द्यावे आणि दैनंदिन अडचणींची सोडवणूक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. विभागीय अध्यक्ष अशोक खोत, कार्याध्यक्ष शमू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सचिव नारायण सूर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST workers 'self-pity for two months' pending salary