वस्त्रोद्योगासमोर संकटांचा फेरा; निर्यातीवर परिणाम, स्थानिक बाजारपेठ ठप्प

शैलेश पेटकर
Friday, 11 September 2020

राज्यासह सांगली जिल्ह्यातील वस्त्रोद्योग क्षेत्र मोठ्या संकटात आहे. वार्षिक सहा हजार कोटी उलाढाल असलेल्या या उद्योगाने कोरोना संकटकाळात गटांगळी खाल्ली आहे.

सांगली ः राज्यासह जिल्ह्यातील वस्त्रोद्योग क्षेत्र मोठ्या संकटात आहे. वार्षिक सहा हजार कोटी उलाढाल असलेल्या या उद्योगाने कोरोना संकटकाळात गटांगळी खाल्ली आहे. निर्यातीवर थेट 35 टक्के परिणाम झाला असून, दुसऱ्या बाजूला स्थानिक बाजारपेठेतील उठावही थांबला आहे. तयार माल गोदामात पडून आहे. वीजदरातील दुप्पट वाढ, रखडलेले कर परतावे आणि या साऱ्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याबाबत सरकारची अनास्था, यामुळे हा व्यवसाय अंतिम घटका मोजत आहे. 

शेतीनंतर मोठा रोजगार देणारे क्षेत्र वस्त्रोद्योगाचे आहे. जिल्ह्यात कुपवाड, मिरज, सांगली, विटा, कडेगाव या ठिकाणी यंत्रमाग आहेत. जिल्ह्यात एकूण 10 हजार विजेवर चालणारे यंत्रमाग असून, एक हजार अत्याधुनिक यंत्रमाग आहेत. प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे दहा हजार कुटुंबांची उपजीविका यावर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये येथे अडचणी सतत वाढत आहेत. लॉकडाउनमध्ये तर व्यवसाय पूर्णतः बंद होता. अनलॉक प्रक्रियेनंतर व्यवसाय सुरू झाला.

निर्यात सुरू असली तरी मागणीत घट झाली. दुसऱ्या बाजूला स्थानिक बाजारपेठ ठप्प असल्याने मोठा फटका बसला. शासनाकडून तांत्रिक अत्याधुनिकीकरण निधी दिला जात होता. त्यात 15 टक्के अनुदान आणि 6 टक्के व्याजाचा परतावा दिला जायचा. या अनुदानात 5 टक्के घट करून ते 10 टक्‍क्‍यांवर आणले गेले. व्याजाचा परतावा रद्द करण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून एकही रुपया दिला गेला नाही. 

उद्योगासमोर अडचणींचा फेरा वाढतच चालला आहे. ठप्प असलेली बाजारपेठ आणि बॅंकांचे व्याज यामुळे काहींवर कायमची टाळेबंदी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या क्षेत्रात जिल्ह्यात मासिक 500 कोटींची, तर एक हजार कोटींची निर्यातीची उलाढाल आहे. खचलेल्या वस्त्रोद्योगाला बूस्टर देण्यासाठी शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे. 

एका सत्रामुळे कामगार कपात 
कुपवाड औद्योगिक वसाहतीत सद्यःस्थितीत एका सत्रात काम सुरू आहे. कडेगावमधील काही वस्त्रोद्योगांना टाळे लागले आहे. विट्यात वस्त्रोद्योगात 30-35 टक्‍क्‍यांनी घट आली आहे. यामुळे सर्वत्र कामगार कपातीचे धोरण अवलंबले जात आहे. याचा मोठा फटका या व्यवसायाला बसतो आहे. त्यातच कच्च्या मालाचे दर वधारले आहेत. लॉकडाउननंतर कच्च्या मालाचे दर 25-30 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत, तसेच वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. 

सकारात्मक निर्णय घेण्याची गरज

वस्त्रोद्योग अडचणीत सापडला आहे. गेल्या काही वर्षांपासून समस्यांचा फेरा वाढत चालला आहे. शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. टेक्‍निकल अपग्रेड फंड तत्काळ द्यावेत. मार्च महिन्यापासूनच्या व्याजदरात पन्नास टक्के सूट द्यावी. जेणेकरून उद्योग उभारी घेईल. 
- सतीश मालू, अध्यक्ष, कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stability Crisis in textile industry; Impact on exports, local market stagnates