esakal | चालक नेमल्यावरच घंटागाड्या सुरू करा : नगरसेवक खंदारे
sakal

बोलून बातमी शोधा

चालक नेमल्यावरच घंटागाड्या सुरू करा : नगरसेवक खंदारे

नगरसेवक विनोद खंदारे यांनी पालिकेत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आग्रह धरला. 

चालक नेमल्यावरच घंटागाड्या सुरू करा : नगरसेवक खंदारे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा ः पालिकेचे सुमारे एक कोटी रुपये वाचविण्यासाठी विविध विकासकामांसाठी मागविलेल्या निविदा या सन 2018-19 प्रमाणेच्या डीएसआरद्वारे निश्‍चित कराव्यात, असा आग्रह नगरसेवक विनोद खंदारे यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत धरला, तसेच पालिकेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या 40 घंटागाड्या या चालकांच्या नेमणुकीनंतरच कार्यरत कराव्यात, अशी सूचना केली. विषयपत्रिकेवरील 144 विषयांपैकी बहुतांश विषयांवर खंदारे यांनी सूचना मांडल्याने सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची कोंडी झाली; परंतु चर्चेअंती सर्व विषय मंजूर करण्यात आले.
 
नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज स्थायी समितीची सभा झाली. या सभेत प्रारंभापासून नगरसेवक खंदारे यांनी प्रशासनाच्या कारभाराविषयी टीका केली. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य, अतिक्रमण, बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांवर ताशेरे ओढले. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य रस्त्यांवरील, तसेच विसर्जन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे भरणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नसल्याचा आरोप खंदारे यांनी केला. आरोग्य विभागाने नव्या 40 घंटागाड्या रस्त्यावर आणण्यापूर्वी त्या गाड्यांवरील चालकांची नेमणूक करणे आवश्‍यक असल्याची सूचना केली. त्याबाबत तातडीने निविदा काढा आणि मगच गाड्या रस्त्यांवर आणा. विविध विकासकामांसाठी मागविलेल्या निविदा जुन्या डीएसआरप्रमाणे 25 टक्के वाढवून आल्याने पालिकेचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे सन 2018- 19 प्रमाणेच्या डीएसआरद्वारे निश्‍चित कराव्यात, असा आग्रह खंदारे यांनी धरला.
या सभेस स्थायी समितीच्या सदस्यांसह मुख्याधिकारी शंकर गोरे, विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, सभेनंतर खंदारे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पालिकेने नव्या डीएसआरप्रमाणे निविदा निश्‍चित केल्यास पालिकेचे सुमारे एक कोटी रुपये वाचणार आहेत. त्यासाठी सभागृहात आग्रह धरला. सर्व विषयांमध्ये सखोल चर्चा झाल्याने नेहमीप्रमाणे सभा लांबली एवढेच असे नमूद केले. 

loading image
go to top