लस उपलब्ध झाल्यानंतरच शाळा सुरू करा

बलराज पवार 
Saturday, 21 November 2020

शासनाने अटी, शर्तींसह सोमवारपासून (ता. 23) शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे; मात्र शाळेचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती यांसह विविध प्रश्‍न उपस्थित होणार आहेत.

सांगली : शासनाने अटी, शर्तींसह सोमवारपासून (ता. 23) शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे; मात्र शाळेचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती यांसह विविध प्रश्‍न उपस्थित होणार आहेत. त्यामुळे कोरोनावरील लस बाजारात उपलब्ध झाल्यानंतर शाळा सुरू करणे योग्य ठरेल. याचा विचार करून शासनाने शाळा सुरू करू नयेत, असे निवेदन जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, कार्यवाह नितीन खाडिलकर, सहकार्यवाह शिवपुत्र आरबोळे, अरुण दांडेकर, आर. एस. चोपडे, विनोद पाटोळे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अध्यक्ष पाटील म्हणाले की, शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे; मात्र त्यासाठी अटी, शर्ती घातल्या आहेत. शाळेत थर्मल स्कॅनर, ऑक्‍सिमीटर, सॅनिटायझर उपलब्ध करावे लागणार आहे. शाळा व परिसर निर्जंतुकीकरण करून स्वच्छ ठेवायचा आहे. याची पूर्तता करण्यासाठी शासन वेगळे अनुदान देणार की नाही हे स्पष्ट नाही. 

जिल्ह्यात एकूण 620 माध्यमिक शाळा आहेत. काहींना कनिष्ठ महाविद्यालये जोडली आहेत. चार वर्ग सुरू करायचे झाले तरी आठ ते दहा खोल्या दररोज दोन वेळा निर्जंतुकीकरण कराव्या लागणार आहेत. ही खर्चिक बाब आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून हमीपत्र मिळेल याची खात्री देता येत नाही. विद्यार्थी शाळेत येतील का, याबाबतही साशंकता आहे. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना संसर्ग होऊन त्यांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी शासन घेणार का, असे विविध प्रश्‍न उपस्थित होत असल्याने कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर शाळा सुरू करावी, अशी आमची मागणी आहे.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start school as soon as the vaccine is available