Video : खास 'तिच्या'साठी गृह राज्यमंत्री थेट शाळेच्या दारात

Video : खास 'तिच्या'साठी गृह राज्यमंत्री थेट शाळेच्या दारात

सातारा : इयत्ता दहावीच्या परीक्षेस नुकताच प्रारंभ झाला आहे. आपल्या पाल्यस पेपरला जाताना दडपण येऊ नये, त्याला शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी पालक परीक्षा केंद्रावर पाल्यासमवेत जात असतात. त्यामुळे पेपर सुरु हाेण्यापुर्वी आणि सुटण्यापुर्वी पालकांची शाळा परिसरात माेठ्या प्रमाणात गर्दी असते. आज (साेमवार) सातारामधील एका परीक्षा केंद्रावर तसेच परिसरातही अशीच पालकांची गर्दी हाेती. याच गर्दीत महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई हे आपल्या गृह मंत्र्यांसमवेत (पत्नी) उभे राहून मुलांना न्याहळत हाेते. काही कालावधीनंतर केंद्रावर आलेल्या कन्येस शुभेच्छा दिल्या आणि शाळेच्या आठवणीत रमले.        
     
आज येथील अनंत इंग्लिश स्कूल परीक्षा केंद्रावर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई आले हाेते. तेथेही माध्यमांनी त्यांना गाठले. तेव्हा ते म्हणाले अधिवेशनास दोन दिवस सुट्टी आहे. मी कुटुंबासाठी खास वेळ काढला आहे. माझी कन्या ईश्वरी दहावीत असून तिची परीक्षा सुरू झाली आहे. पहिल्या दाेन पेपरला तिची माझी आणि माझी गाठ पडली नाही म्हणून मुद्दामहून आज तिला शुभेच्छा देण्यासाठी स्वतः परीक्षा केंद्रावर आलाे आहे. दरम्यान तेवढ्यात देसाई यांची कन्या ईश्वरी परीक्षा केंद्र परिसरात पाेहचली. तिला देसाई आणि त्यांच्या पत्नी स्मितादेवी यांनी शुभेच्छा दिल्या.  

यावेळी शंभूराज देसाई यांच्या दहावीतील आठवणी ताज्या झाल्या. आमच्या लहानपणी सोयी सुविधा नव्हत्या. आमचे आई वडील आम्हाला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी येत नव्हते. आमचे आम्हीच मित्रांसोबत परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दिली. यानिमित्ताने आमच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या असून माझा दहावीच्या परीक्षेसाठी सुशीलादेवी हायस्कुल येथील केंद्रावर नंबर आला होता, असे त्यांनी सांगितले.


कऱ्हाड-चिपळूण लोहमार्गासाठी पाठपुरावा करू 

कऱ्हाड-चिपळूण लोहमार्गासाठी सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांच्याकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला होता. त्याच्या सर्व्हेचेही काम सुरू झाले होते. मात्र, त्यानंतर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. त्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती करून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे त्या मार्गासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन गृह व वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिले. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी अर्थराज्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासाचा समतोल राखण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला असल्याचे सांगून मंत्री देसाई म्हणाले, ""कऱ्हाड-चिपळूण लोहमार्ग व्हावा, या बाजूने मी आहे. मध्यंतरी सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांच्याकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर त्याच्या सर्व्हेचेही काम सुरू झाले होते. मात्र, त्यानंतर हे काम का रखडले आहे, याची माहिती घेतली जाईल. मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती करून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे त्या मार्गासाठी पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी मिळून त्याचा पाठपुरावा करू.'' 

ते म्हणाले, ""अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणीसह कोयना परिसरातील पर्यटन विकासासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयासाठी 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेला शतकमहोत्सवी वर्षासाठी 11 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील डोंगरी विभागातील तालुक्‍यांच्या विकासकामांसाठी स्वतंत्र 95 कोटी देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पाटणच्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.'' 
इंडस्ट्रीयल कॉरिडॉर करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली आहे, असे सांगून मंत्री देसाई म्हणाले,"" जिल्ह्यात उद्योग यावेत आणि तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील व आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहोत. विधानसभा अधिवेशन झाल्यानंतर कॉरिडॉर कोठे असावा, त्यासाठी कोणती जागा निश्‍चित करावी, त्यासाठी नैसर्गिक उपलब्धता काय हवी आहे, यासाठीची सर्व कार्यवाही सुरू होईल.'' 

 
45 वर्षांनंतर साताऱ्याला संधी 

जिल्ह्याचे सुपुत्र यशवंतराव मोहिते यांनी 45 वर्षांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यांच्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 45 वर्षांनी राज्याच्या सर्वोच्च सभागृहात वित्तराज्यमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडण्याची संधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामुळे मिळाली. माझ्याकडे जबाबदारी होती. त्याचे पालन करून मी अर्थसंकल्प मांडला आहे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com