शेतमालाच्या घसरत्या किंमतीवर राज्यस्तरीय बैठक घेणार

दिपक सुर्यवंशी
Friday, 30 October 2020

बाजारात शेतमालाच्या घसरत चाललेल्या किंमती संबंधी पणन संचालक व शेतकरी संघटना प्रतिनिधींची राज्यस्तरीय बैठक घेणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी दिली. 

ढालगाव : बाजारात शेतमालाच्या घसरत चाललेल्या किंमती संबंधी पणन संचालक व शेतकरी संघटना प्रतिनिधींची राज्यस्तरीय बैठक घेणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी दिली. 

पणन संचालकासोबत शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची 20 ऑक्‍टोबरला पुणे येथील पणन सह संचालक विनायक कोकरे यांच्यासोबत बैठक झाली. शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला राज्यस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले. राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधींची बैठक लावणे, शासकीय खरेदी केंद्र व शेतमाल तारण कर्ज सुरू करण्यात यावे बाबत निवेदन देण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. माने व विजय पाटील यांनी दिली. 

बाजारात शेतमालाचे बाजारभाव घसरत चालल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असतानाही केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सन 2019 / 20 साठी हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी बाजारात शेतमालाची खरेदी करीत असतील तर प्रशासकीय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकाऱ्यांनी पणन कायदा कलम 34 आणि 94 (ड) नुसार गुन्हा नोंदवला पाहिजे. राज्यभर उडीद, मूग, सोयाबीन, बाजरी, मका, भुईमुग, सूर्यफूल, ज्वारी, हरभऱ्याचे बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक लुट राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. विविध बाजार समित्यांच्या आवारात शेतकऱ्यांनी शेतमाल विकलेल्या पावत्या बघून एका दुकानात दर कमी मिळतोय म्हटल्यावर दुसऱ्या दुकानात शेतकरी शेतमाल घेऊन जात असताना गुंडप्रवृतीचे व्यापारी शेतकऱ्यांना दमदाटी करतात. अशा व्यापाऱ्यांचे व्यापार परवाने रद्द करावेत. 

बाजार समितीच्या आवारात शेतमाल सोडून इतर व्यवसायासाठी दिलेले व्यापारी गाळे सुरू असल्याचे पुरावेही पणन सहसंचालक विनायक कोकरे यांच्यासमोर सादर केले. त्यांनी मागणीची दखल घेऊन राज्यभरातील शेतकरी प्रतिनिधींची व जिल्हा उपनिबंधक, बाजार समितीच्या सक्षम अधिकारी व सचिवांची शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन पणन सह. संचालक विनायक कोकरे यांनी सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. राज्यभर शासकीय शेतीमाल खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांचे कमी दरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बाजारात चांगला दर येईपर्यंत शेतमाल तारण कर्ज व्यवस्था तातडीने सुरू करू, असे आश्वासन दिले. 

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने व क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय पाटील, विकास जाधव, संजय थोरात, हिंदुराव पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ भेटीसाठी गेले होते.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A state level meeting will be held on falling prices of agricultural commodities