राज्य शिक्षक संघटनेची फुटीची परंपरा शि.द. पाटील यांच्या घरापर्यंत : 50 वर्षापासून फुटीचा इतिहास... वाचा सविस्तर 

shikshak.jpg
shikshak.jpg

इस्लामपूर (जि. सांगली)- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेत गेल्या 50 वर्षापासून पद, पैसा, वर्चस्व यावरुन सुरु असलेल्या फुटीचा व हकालपट्टीचा आदर्श माजी आमदार कै. शिवाजीराव पाटील यांच्या अनुयायांनीही पुढे चालू ठेवला. आचार्य दादासाहेब दोंदे, प्रा. अरुण दोंदे, शिवाजीराव पाटील, संभाजीराव थोरात व्हाया माधवराव पाटील व धैर्यशील पाटील असे या संघटनेचे नेतृत्व केलेल्या नेत्यांची नावे आहेत. संघटनेत वर्चस्व कोणाचे या एकमेव मुद्द्यावर आजपर्यंत अनेकवेळा फुट पडली. याला स्व. आमदार शिवाजीराव पाटील यांचे नातेवाईक सुध्दा अपवाद ठरले नाहीत. 

सुमारे 3 ते 4 लाख प्राथमिक शिक्षकांचे संघटन असलेली राज्यातील एकमेव मोठी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडे पाहिले जाते. या संघटनेची स्थापना आचार्य दादासाहेब दोंदे यांनी 1914 साली केली. त्यावेळी या संघटनेचे नाव मुंबई इलाका प्राथमिक शिक्षक संघ असे होते. दादासाहेब दोंदे यांच्याबरोबर आचार्य भिसे, आचार्य अत्रे, पुणे येथील डॉ. ग. श्री. खैर हे संघटनेत आघाडीवर होते. त्यानंतर या संघटनेची धुरा आचार्य दोंदे यांचे सुुपुत्र प्रा. अरुण दोंदे यांच्याकडे गेली. राज्यभरात संघटनेची व्याप्ती वाढली. पश्‍चिम महाराष्ट्रातून शि. द. पाटील हे संघटनेवर काम करु लागले. संघटनेचे नेतृत्व हे प्राथमिक शिक्षकाकडेच असावे यातून शि. द. पाटील व अरुण दोंदे यांच्यात वाद झाला. अरुण दोंदे हे प्राध्यापक असल्याने शि. द. पाटील यांनी संघटनेत बंड करुन 1978 ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ स्थापन केला. या संघाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. 

शिक्षकांचे अनेक प्रश्‍न अधिवेशनाच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडून सोडवून घेण्यात शि. द. पाटील यशस्वी झाले. शि. द. पाटील यांचे शिष्य संभाजीराव थोरात हे संघटनेत शि. द. पाटील यांच्या बरोबर आघाडीवर काम करु लागले. संघटनेचा वाढता दबदबा पाहुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संघटनेला म्हणजेच संघटनेचे नेते शि. द. पाटील यांना दोनवेळा विधानपरिषदेवर संधी दिली. या काळात प्राथमिक शिक्षक संघाचा तत्कालीन राज्य सरकारवर मोठा प्रभाव होता. संघटनेचे वाढते स्वरुप व असलेल्या दबदब्यातून परत शि. द. पाटील व संभाजीराव थोरात या गुरु-शिष्यात वितुष्ट निर्माण झाले. या दरम्यान शि. द. पाटील यांनी माध्यमिक शिक्षक असलेले आपले सुपुत्र माधवराव पाटील यांना पदवीधर मतदारसंघात संघटनेचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूकीला उभे केले. 14 सप्टेंबर 2008 ला संभाजीराव थोरात यांनी शि. द. पाटील यांच्या विरोधात बंड पुकारले. 

संघटनेत उभी फुट पडली. शि. द. पाटील यांची वेगळी व संभाजीराव थोरात यांची वेगळी संघटना शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी काम करु लागली. या दरम्यान पैसा, पद व भानगडी बाहेर काढून दोन्ही बाजूकडून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. याचा नेमका फायदा शासनात काम करणाऱ्या धुरंधर नेत्यांनी उचलला व महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेची धार बोथट झाली. शि. द. पाटील यांनी आपले सुुपुत्र माधवराव पाटील यांना संघटनेचे राष्ट्रीय पातळीवरील फेडरेशनचे अध्यक्ष केले. या दरम्यान नातू धैर्यशील पाटील ही संघटनेत कार्यरत झाले. त्यानाही जुन्या पेन्शन योजनेचे अध्यक्षपद देण्यात आले. 16 डिसेंबर 2019 ला माजी आमदार शि. द. पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात सुपुत्र माधवराव पाटील व धैर्यशील पाटील हे संघटनेचे काम पाहु लागले. मात्र एक वर्षाच्या आतच माधवराव व धैर्यशील यांच्यात फुट पडली. 1978 पासून शिक्षक संघटनेत वर्चस्व वादावरुन सुरु असलेले बंड शि. द. पाटील यांच्या घरात सुध्दा शमले नाही. प्राथमिक शिक्षकांचे मुलभूत प्रश्‍न व अडीअडचणी या अलीकडच्या काळात बाजूला पडल्या असून सत्ता व पद यासाठी सुरु असलेला संघर्ष शि. द. पाटील यांच्यात घरापर्यंत पोहचला आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com