राज्याची तिजोरी रिकामी असल्याचं सोंग थांबवा...प्रवीण दरेकरांचा आघाडी सरकारवर हल्ला बोल

pravin darekar.jpg
pravin darekar.jpg

सांगली- राज्याची तिजोरी रिकामी असल्याचे सोंग राज्य सरकारने थांबवावे. सत्ता ताब्यात घेताना हे कळत नव्हते का? असली कारणे सांगणे याचा अर्थ राज्यातील आघाडी सरकार चालवायला सक्षम नाही, असा अर्थ होतो. राज्याची कर्ज घेण्याची क्षमता 1 लाख 20 हजार कोटी रुपयांची आहे. आता 50 हजार कोटींचे कर्ज असून अजून 60 ते 70 हजार कोटी रुपये कर्ज उचलणे शक्‍य आहे. ते उचला, पण अतिवृष्टीने, पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव आणि मिरज तालुक्‍यातील काही आपत्तीग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पंचनामे पूर्ण करण्याची मागणी केली. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""राज्यात भीषण चित्र आहे. शेती उद्‌ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांना खाण्याची भ्रांत आहे. कर्जाचे डोंगर आहेत, हप्ते मानुगटीवर बसले आहेत. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी दौरे करून, पंचनामे करून वेळ वाळा घालवू नये. एवढे मोठे संकट आहे की तत्काळ मदतीशिवाय शेतकरी जगणार नाही. डाळिंबासाठीचा सलग पाच दिवस पाऊस पडला पाहिजे तरच नुकसान भरपाई मिळेल, हा निकष बाजूला ठेवावा लागेल. इथे 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालाय.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ तरी करा किंवा त्यांना तत्काळ कर्जाचे पुनर्गठण तरी करून द्या. त्यांना नव्याने कर्ज घेऊन पुन्हा शेती उभी करावी लागेल. माती वाहून गेलीय, विहीरी भरल्या आहेत, बांध फुटले आहेत. या साऱ्याच्या डागडुजीसाठी भरीव मदत द्यायला हवी. किमान पाच लाखापर्यंतचे कर्ज माफ केले पाहिजे. भाजपचे सरकार असताना आम्ही महापुराचे पंचनामा, आढावा, करत बसलो नाही. तत्काळ मदत दिली. लोकांना तुमचे दौरे नको आहेत. वडेट्टीवारांना तसा अनुभव आला आहे, मुख्यमंत्र्यांना लोक काय बोलत आहेत, याचा अनुभव आला आहे. त्यामुळे दौरा करत बसण्यापेक्षा मंत्रालयात बसा, मातोश्रीवर बसा, पण तत्काळ मदत द्या.'' 

 पवारसाहेबांचे ऐका 
श्री. दरेकर म्हणाले, ""शरद पवार यांनीही राज्याला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हटले आहे. ते महाविकास आघाडीचे सल्लागार आहेत. तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने चालता, मग अडलय कशात? राज्याची कर्ज काढण्याची क्षमता आहे. सर्वच राज्ये कर्ज काढत असतात. तिन्ही पक्षांची बैठक घ्या, कर्ज काढायचा निर्णय घ्या. त्यासाठी वेळ का लावताय?'' 

0 कडक कपडे, पुलावर स्टेज 
श्री. दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची खिल्ली उडवली. ते म्हणाले, ""कडक इस्त्रीचे, खळीचे कपडे घालून तुम्ही दौरे केले तर शेतकऱ्यांना तुम्ही आपले कसे वाटणार? तुम्ही पुलाची पाहणी करताय, त्यावर स्टेज मांडला जातोय. काय प्रकार आहे हा? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बांधावर जाताहेत, पाण्यातून वाट काढत पाहणी करताहेत.'' 
0 दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांनी दरेकर यांच्यासाठी कार्यकर्त्यांकरवी बेदाणा पाठवून दिला. तासगाव येथे माळावर तो देण्यात आला. स्वतः आमदार सुमनताई यांनी फोनवरून संवाद साधला, असे आमदार पडळकर यांनी सांगितले. 
पत्रकार परिषदेत आमदार सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, माजी आमदार व जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, नितीन शिंदे, शहराध्यक्ष दीपक शिंदे, शेखर इनामदार, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते. आमदार गाडगीळ यांनी त्यांचा सत्कार केला. 

ठाकरे शब्दाला जागा 
प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या शब्दाची आठवण करून दिली. ते म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांनी कोरडवाहू शेतीला 25 हजार, बागायती शेतीला 50 हजार, फळबागांना एक लाख रुपयांची मदत देऊ असा शब्द दिला आहे. त्यांनी विश्‍वास जपावा. वचनपुर्ती करावी. ठाकरे हे शब्दाला जागणारे आहात, असा राज्यातील जनतेचा विश्‍वास आहे. तो मोडू नका.''  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com