
एफआरपीचे तुकडे पाडणाऱ्या कारखानदारांनी पुढील रणसंग्रामासाठी तयार राहावे, असा इशारा स्वाभिमानीचे माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला. ते नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकरी जनजागृती मेळाव्यात बोलत होते.
तुंग : एफआरपीचे तुकडे पाडणाऱ्या कारखानदारांनी पुढील रणसंग्रामासाठी तयार राहावे, असा इशारा स्वाभिमानीचे माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला. ते नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकरी जनजागृती मेळाव्यात बोलत होते. नांद्रे येथे राजू शेट्टीनी साखर कारखानदारांचा पुतळा दहन करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली. सर्व गावात पुतळे जाळून आंदोलनाची सुरवात करण्याचे आवाहन केले.
शेट्टी म्हणाले,""कारखानदारांनी एफआरपीचे तुकडे पाडण्याचे कारस्थान केले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही कारखान्यांना एकरकमी एफआरपी देण्यास जमते मग इतर कारखाने का देत नाहीत. बैठकीमध्ये दिलेला शब्द कारखानदारांनी पाळावा. कारखानदारांची परिस्थिती वाईट नाही. गेले वर्षभर साखरेचे भाव स्थिर आहेत. इथेनॉलचे भाव वाढलेले आहेत. साखर निर्यात करण्यास सरकारने सबसिडी दिलेली आहे. पण यांची पैसे देण्याची इच्छा नाही.''
ऊस तोडणारे, वाहनचालक यांच्या सोबत हातमिळवणी करुन शेतकऱ्याला लुटायचे धंदे संबंधितांनी बंद करावे. काटामारीचा प्रकार थांबवावा अन्यथा परिणाम भोगावे लागतील. कारखानदारांनी मुकाट्याने हिशोब टाकावा अन्यथा कारखान्याचे धुराड बंद पाडू, असा इशारा शेट्टींनी दिला. कार्याध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले,""सांगली जिल्ह्यात सोनहिरा उदगिरी व दालमिया कारखाने वगळता इतर कारखाने एक रकमी एफआरपी देऊ नये, यासाठी झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका कोणी बजावली हे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळून चुकले आहे.''
जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे व पक्षाचे अध्यक्ष महेश खराडे यांचे मनोगत झाले.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, शमशुद्दीन संदे, धन्यकुमार पाटील, राजकुमार कोथळे, सावकर पाटील, संजय भोरे, मुकेश पाटील, संतोष शेळके, तानाजी साठे, रोहीत पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार