नाना पाटील क्रांतिसिंह झाले त्याची गोष्ट 

e
e

सांगली : स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीश सत्तेला सळो की पळो करून सोडणारे नाना पाटील म्हणजे धगधगती मशाल. प्रशंसक कमी, त्यांचे टीकाकारच जास्त. त्यांच्या कार्याची दखल ज्येष्ठ पत्रकार "मराठा' कार प्र. के. अत्रे यांनी घेतली. मुंबईत ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मावळत्या सूर्याच्या साक्षीने सत्कारही केला. त्यावेळी त्यांना "क्रांतिसिंह' ही पदवी बहाल केली. आणि नाना पाटील "क्रांतिसिंह नाना पाटील' झाले. ही घटना 26 मे 1946 ची. आज घटनेला 75 वर्षे झाली. 
श्री. अत्रे यांनी नाना पाटील यांच्यासह प्रतिसरकारमधील सहकाऱ्यांना क्रांतिवीर म्हणून संबोधले. त्यांचाही उचित गौरव व सत्कारही केला. 
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव घेतले, की, पहिल्यांदा समोर येतो, तो त्यांचा ब्रिटिशांबरोबरचा प्रखर संघर्ष. त्यांनी निर्माण केलेले साताराचे ऐतिहासिक प्रतिसरकार. त्या सरकारने आपल्या कार्यक्षेत्राच्या छोट्याशा परिघात जवळपास 700 ते 750 गावे इंग्रजांचे जुलमी सत्तेपासून स्वतंत्र केलेली. इथे चालत होता प्रतिसरकारचा कायदा. 
नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली या गावात प्रतिसरकाने न्यायपंचायती निर्माण केल्या. तिथल्या सावकार, गावगुंडांचा बीमोड केला. सावकारशाही मोडून काढली. स्त्रियांचा सन्मान दिला. प्रतिसरकारची तुफान सेनेच्या सैनिकांनी स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या ठावठिकाण्याची माहिती देणाऱ्या फितूर ब्रिटीश धार्जिन्या चुगलखोरांना पत्र्या मारल्या.(पाय बांधून तळवे सोलून काढले.) 
असे असले तरी 1946 पर्यंत नाना पाटील व त्यांच्या सहकार्याचे कार्य उपेक्षितच राहिले होते. त्यांच्या विरोधात अपप्रचार करणारे अनेकजण सक्रिय होते. या पार्श्‍वभूमीवर आचार्य अत्रे यांनी त्यांच्या ऐतिहासिक कार्याची दखल घेतली. 
मुंबई येथे शिवाजी पार्कवर प्रतिसरकारमधील सहकाऱ्यांचा भव्य सत्कार आयोजित केला होता. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी व्यासपीठाची रचना व सजावट केली केली होती. ज्या ट्रकमधून नाना पाटील व सहकाऱ्यांची मिरवणूक काढली त्याची सजावटपण शांतारामबापूंनी केली होती. 
येडेमच्छिंद्रचे नाना पाटील यांच्या नावामागे क्रांतिसिंह लागले त्याला 75 वर्षे झाली. क्रांतिसिंहांची मुलगी हौशाक्का व नातू ऍड. सुभाष पाटील हणमंतवडिये (ता. खानापूर) येथे राहतात. 

वडील नाना पाटील व सहकाऱ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठं काम केलंय. त्यांनी निर्माण केलेल्या प्रतिसरकारने सातारा जिल्हा ब्रिटीश जोखडातून मुक्त केला होता. मात्र शहरी लोकांत गैरसमज होते. आचार्य अत्रेंनी स्वतः सातारा भागात येऊन माहिती घेतली. मुंबईत शिवाजी पार्कवर भव्य सत्कार केला. "क्रांतिसिंह' पदवी जाहीर समारंभात दिली. क्रांतिसिंहांच्या कार्याची महती सांगणारा साप्ताहिक नवयुगचा विशेषांकही प्रसिद्ध केला. सत्कार समारंभाला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. त्याचे वर्णन ऐकून मुलगी म्हणून आजही अभिमान वाटतो. आज 75 वर्षांनंतरही आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. 

हौसाताई पाटील (क्रांतिसिंहांच्या कन्या, वय 95). 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com